सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ सांगून ठेवते… भाग-२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(तो संपूर्ण बरा होऊ शकतो. फक्त अवधी फार लागतो. कदाचित तीन—चार— पाच वर्षेही लागू शकतात. घरातील लहान मुले आणि इतरांचा विचार करता दादीला तुम्ही…”) – इथून पुढे —
डॉक्टर जसजसे बोलत होते तस तसे माझ्या नसानसात ठोके घणघणत होते. मी पार ढेपाळून गेलोय् असं वाटत होतं. एखादा जुना वृक्ष कडकडून कोसळतोय, नाहीतर दूरच्या त्या पर्वताचा कडाच तुटून घरंगळत खाली येतोय असं भासत होतं.
डॉक्टरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता,” मी तुझी मानसिक स्थिती समजू शकतो. समाजात या रोगाबद्दल अजून खूप गैरसमज आहेत. तो अनुवंशिक आहे, संसर्गजन्य आहे वगैरे वगैरे.”
पण मी दादीला घरी घेऊन आलो तेव्हा अगदी विचित्र मनस्थितीत होतो. आमच्या कुटुंबावर आलेलं हे एक धर्म संकटच वाटलं मला. मी याच समाजाचा एक घटक होतो आणि त्या अनुषंगानं माझ्याही मनात एक अनामिक भय दाटलं होतं. एकीकडे दादीवरचं अपार प्रेम तर, दुसरीकडे स्वतःचच हित, स्वतःच स्वास्थ, प्रतिष्ठा वगैरे. खरोखरच काय बरोबर, काय योग्य, काहीच सुचत नव्हतं. आमच्या कुटुंबाचा कणाच डळमळीत झाला होता.
दादीची मात्र गडबड चालूच होती.
“ काय म्हणाले डॉक्टर ?इतका का तुझा चेहरा उतरलाय? आणली आहेस नाही औषधं? मी घेईन हो ती वेळेवर, जरा सुद्धा टाळणार नाही बघ.”
“ दादी ही औषधं तुला बरीच वर्ष घ्यावी लागतील. घेशील ना?”
एवढेच मी कसंबसं म्हणालो.
“ काय झाले आहे मला?तो कॅन्सर झालाय का? मरणार आहे का मी?”
मग मात्र दादीला मी कडकडून मिठी मारली.” नाही ग दादी तसं काहीच झालेलं नाही तुला. तू मरणार नाहीस. पण “
पुढे माझे ओठ उघडलेच नाहीत. मग तिनेच माझ्या केसातून मायेने हात फिरवला. दादीचा तो मायेचा स्पर्श अजून मला माझं लहानपण आठवून देतो.
“ तू असाच रे बाबा! हळवा लहानपणापासून. पायात बोचलेला काटा हि कुणाला काढू द्यायचा नाहीस. कसा रे तू? चांगली आहे मी. बरीच होईल मी. मला काय झालंय?”
पण त्या दिवशी दुपारभर ती झोपून होती. पोटाशी पाय दुमडून. आज ती खरंच थकलेली वाटत होती त्या सर्व वैद्यकीय चाचण्यांमुळे., कुठे कुठे टोचलेल्या सुयांनी ती बेजार झाली होती. तिच्या अंगावर शाल पांघरली तेव्हा वाटलं दादीने काही पाप केले का? या जन्मी नाही तर मागच्या जन्मी? पाप पुण्याचे हे भोग बिचारीला अशा रीतीने चुकते करावे लागणार आहेत का?
नोकरा चाकरांना आठवणीने कामाच्या पसाऱ्यातही पटकन न्याहारी देणारी, कुणाला जास्त काम पडतंय असं वाटलं की पटकन पुढे जाऊन हातभार लावणारी दादी म्हणजे सगळ्यांचा आधार.
मंदाकाकी वारली तेव्हा तिच्या लहान लहान मुलांना रात्रभर धरून बसली. त्यांच्याबरोबर रडली पण आणि त्यांना समजावलं पण
एक मात्र होतं दादी तशी कंजूष फार! कुणी पैसे मागितले तर पटकन देणार नाही. फारच कोणी पाठ धरली तर हळूहळू कनवटी सोडून एखादं नाणं अगदी जीवावर आल्यासारखं हातावर ठेवेल. भाजी बाजारात गेली तर घासाघीस करून भाजी घेईल आणि प्रवासाला निघाली तर हमाल करणार नाही. जमेल तिथे पायी पायीच जाईल, नातवंडांवर प्रेम करेल खूप पण कुणी कधी शेंगदाणे घेण्याचे म्हटलं तर म्हणेल ,”अरे !या पावसा पाण्याचे शेंगदाणे खाऊ नये. नरम असतात. पोट दुखेल.”
पण हा काय तिचा इतका मोठा अवगुण होता का की त्याची ईश्वराने तिला एवढी मोठी शिक्षा द्यावी. माझ्या मनाला आता एक चाळा लागलाय— दादी बद्दल चुकीचे, काही अयोग्य, काही दूर्वर्तनाचे शोधून काढायचा.
बऱ्याच वेळा दादी म्हणायची,” रुक्मिणी वहिनीवर फार अन्याय झाला रे आपल्या कुटुंबात. तिचा नवरा मेला. पण तिचा हक्क होता ना इस्टेटीवर. तिला काही मिळू दिले नाही रे कोणी. कुणीच काही तिच्यासाठी करू शकलं नाही. अगदी मी पण नाही. शेवटी संपत्ती म्हटली की जो तो स्वार्थीस बनतो रे !सांगून ठेवते..”
पण त्या रुक्मिणी वहिनींचे शाप, तळतळाट एकट्या दादीलाच लागावेत का?
मग जो जो माझ्या मनात विचार येतात तो तो वाटतं की दादी वाईट नाहीच. कधी कुणाशी भांडत नाही, कुणाचा हेवा मत्सर करत नाही, कुणावर रागा करत नाही, नाही पटलं तर दूर होते, उगीच कलकल करत नाही, कुणाला वाईट शिकवत ही नाही.
समोरच्या माई आमच्याकडे नेहमी येतात. आल्या की त्यांच्या सुनेबद्दल सांगत बसतात. ही अशी ना ही तशी. “कधी नव्हे तर बेबी माहेरपणाला आली पण ही स्वतःच माहेरी निघून गेली. शोभतं का हे? कधी तिच्या पोरांना हात लावणार नाही, त्यांच्यासाठी काही चांगलं चुंगलं बनवणार नाही. आपणच उठाव आणि आपणच करावं अशा वेळी.”
दादी मात्र चटकन म्हणते,” बस कर ग! तुझंच चुकतंय. हे बघ मुली परक्या असतात सुनाच आपल्या असतात. त्यांनाच पुढे आपलं करावं लागणार असतं. आणि चांगली तर आहे तुझी सून. सगळं तर करते की नीटनेटकं. गेली असेल एखादे वेळेस माहेरी. त्यांनाही मन असतं सांगून ठेवते..”
दादीच्या बोलण्यावर माई संतापतात, जाता जाता म्हणतात,” तुझं बरं आहे ग बाई. नक्षत्रासारख्या सुना आहेत तुझ्या. तुझी उत्तम बडदास्त ठेवतात, काळजी घेतात.”
मग माईंच्या डुलत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत दादी किंचित हसते. हसताना तिचे ओठ विलग होतात. भुवयांच्या मध्ये एक बारीक लाट उमटते. तिच्या अशा चेहऱ्याकडे पाहिलं की मला असंच वाटतं की जगातल्या साऱ्या भाव-भावनांना छेदून जाणार तिचं हे कणखर मुकेपण आहे.
भावना, व्यवहार आणि वास्तववादाच्या वेगवान झोक्यावर माझं मन हिंदकळत आहे. आपण करतोय ते बरोबर आहे का ?आपण स्वार्थी तर नाही? तिने आम्हाला लहानच मोठं केलं. आमच्या सुखदुःखाशी ती तन्मयतेने एकरूप झाली. ज्या कुटुंबासाठी तिचं अंत:करण तिळतिळ तुटलं त्यातून तिला निराळं करणं, अगदी तांदळातल्या खड्यासारखं वेचून बाजूला करणं हे माणुसकीच तरी आहे का? हेच आमच्या बाबतीत कुणाला झालं असतं तर ती अशी वागली असती का? देह, मन एक करून ती आमच्या पाठीशी उभी राहिली असती. तिच्यात प्रचंड सामर्थ्य होतं, मग आपण एवढे थिटे का? आपल्या मनात हे भय का? केवळ स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी! असेच नव्हे का? आपली भक्ती, श्रद्धा, इतकी लुळी आहे की दादीच्या सहवासात राहण्याचं सामर्थ्य आपल्यात असू नये? आपण दादीची पाठवणी करायला निघालो, तिला दूर ठेवायला तयार झालो.
पण मग मन पुन्हा वास्तवतेचा किनारा गाठतो. यात अयोग्य काहीच नाही आणि हे काही कायमस्वरूपाचं नाही. ही योजना फक्त काही वर्षांसाठीच आहे आणि ती दादीला नक्कीच मान्य होईल कारण आम्हा सर्वांवर तिचं अपरंपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ती सारं काही समजून घेईल, निराश होणार नाही.
– क्रमश: भाग दुसरा
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈