सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ गोडी मातृभाषेची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
☆
गोडी मातृभाषेची
अमृतापरी साची
तिच्यात ओतप्रोत
माया साय-साखरेची
*
कीर्तनात विठू दंग
भजनात भक्ती रंग
ज्ञानोबा तुकोबांचे
अक्षर-धन अभंग
*
पोवाड्यात वीररस
लावण्य हे लावणीत
ओव्या भारुड जागर
भक्तीपूर्ण गोंधळगीत
*
काव्य कथा साहित्याने
परिपूर्ण ही ज्ञानगंगा
नवरसयुक्त नवरत्नांचे
साज लखलखती अंगांगा
*
मराठीच्या संवर्धनाचा
ध्यास असो मनामनात
वाचू शिकूया मराठी
प्रसार करु जनाजनांत
☆
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈