डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
श्रीभगवानुवाच
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥
*
कथित भगवंत
मनुज जो केवळ अग्नी अन् क्रियांना त्यागी
नाही संन्यासी अथवा तो नच असतो योगी
आश्रय नाही कर्मफलाचा करितो कार्यकर्म
तोचि संन्यासी तो योगी जाणुन घे हे वर्म ॥१॥
*
न संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ २ ॥
*
संन्यासासी योग अशी ही अन्य संज्ञा पांडवा
संकल्पासी जो न त्यागतो तो ना योगी भवा ॥२॥
*
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥
*
आरुढ व्हाया कर्मयोगे निष्काम करणे कर्म
होता योगारूढ अभाव सर्व संकल्प हे वर्म ॥३॥
*
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ४ ॥
*
इंद्रियाच्या भोगामध्ये नसतो जो आसक्त
संकल्पत्यागी मनुजा योगारुढ म्हणतात ॥४॥
*
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥
*
भवसागरातुनी अपुला आपण उद्धार करावा
अपुला बंधु आपण तैसा वैरीही जाणावा ॥५॥
*
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६ ॥
*
आत्म्यावरती विजय जयाचा आत्म्याला प्राप्त
बंथु त्याच्या आत्म्याचा आत्मा तयाचा होत
आत्मा नाही अधीन तुजसम अनात्मन राहतो
वैरी होउन आत्मा त्याचा शत्रूसम वर्ततो ॥६॥
*
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥
*
शीतोष्ण-सुखदुःखात जया न मानापमान
प्रशांति तयाच्या वृत्ती सुशांत अंतःकरण
मन बुद्धी अन् देह इंद्रिये सदैव जया अधीन
प्रज्ञेत तयाच्या स्थित असते सच्चिदानंदघन ॥७॥
*
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ८ ॥
*
ज्ञान विज्ञानाने ज्याचे तृप्त अंतःकरण
स्थिती जयाची स्थिर असूनी विकारहीन
हेम अश्म मृत्तिका जयाला एक समान असती
अद्वैत त्याचे भगवंताशी जितेंद्रिय त्या म्हणती ॥८॥
*
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९ ॥
*
सुहृद असो वा मित्र वा वैरी मध्यस्थ वा उदासीन
बंधु असो वा द्वेष्य साधु वा अनुसरतो पापाचरण
घृणा नाही कोणाही करिता सर्वांठायी भाव समान
श्रेष्ठत्व तयाचे विशेष थोर याची मनी ठेव सदा जाण ॥९॥
*
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥
*
मन आत्म्यासी वश करुनी
योगी निरंतर निरिच्छ राहुनी
एकांती एकाकी स्थित रहावे
आत्मा परमात्मे विलिन करावे ॥१०॥
☆
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈