डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

माझी मराठी भाषा ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

आपण राहात असलेल्या महाराष्ट्र प्रांतातील आपली मराठी ही प्राचीन प्राकृत भाषा आहे. ती केव्हापासून बोलली जाऊ लागली हे माहित नसले तरी सहाव्या शतकातील राष्ट्रकूटांच्या राजवटीपासून ती बोलली जाऊ लागली असा अंदाज आहे.

श्रवणबेळगोळ येथील नवव्या शतकातील बाहुबलीच्या शिल्पाच्या  पायावर “ चाविंडराये करवियले ” हे  कोरलेले वाक्य सर्वात  जुने व पहिले मराठी लेखन असावे. तेव्हापासून ते बाराव्या शतकापर्यंत अपभ्रंश मराठी बोलली जात होती.

अकराव्या शतकातील महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींवर मुकुंदराजाने लिहिलेला लीळाचरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ होय.

मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आहे. अशा या आपल्या प्रांतातील आपली भाषा ही तितकीच रोखठोक, रांगडी तरीही मृदु मुलायम आहे. तलवारीच्या पात्याच्या तेजाची धार असलेली तरीही माणुसकीचा पाझर दगडा दगडांतून स्त्रवणारी ही मराठी माझी माय जणू दुधावरची साय.

शतकानुशतके शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याने, अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठा योध्यांचे पोवाडे गाणाऱ्या शाहिरांनी, ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या लावणीने, गावगाडा हाकणाऱ्या बारा बलूतेदारांनी ही आपली मायबोली समृद्ध केली आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने मराठी भाषा विठ्ठलाच्या भक्तिरसाने समृद्ध होत गेली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवी  , तुकारामांचे अभंग जनमनाच्या ओठी बसले. एकनाथी भागवत, मोरोपंतांची केकावली, केशवसुतांची तुतारी, पठ्ठेबापूरावांपासून ते आजपर्यंतची जगदीश खेबुडकरांची लावणी परंपरा, राम गणेश गडकरीपासूनची नाट्य परंपरा, त्या अगोदरची संगीत नाटके, प्रल्हाद केशव अत्रेंचे कऱ्हेचे पाणी, साने गुरूजींची श्यामची आई, कुसुमाग्रजांची विशाखा, मराठीचे सौंदर्य खुलतच गेले.

खान्देशातील अहिराणी, कोकणातील कोकणी, विदर्भातील वऱ्हाडी प्रांता प्रांतातील वेगवेगळा बाज असलेली मराठी, ई लर्निंगच्या जमान्यातही तितकीच सुंदर, ताजी व टवटवीत आहे. इंग्रजीतही सांगितले की My Marathi तरीही ती माय मराठीच उरते. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे,

  माझिया मराठीचे बोलू कवतिके।

  अमृताते पैजा जिंके.।

                         अशीच आहे.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. -९८२२८५८९७५ , ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments