? मनमंजुषेतून ?

☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

बाबा…

आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली. मी पाचवी मधे होते.सकाळपासून खूप धडधडत होतं.आई हॉस्पिटल मधून आली आणि तिने सांगितलं.बाबा गेले.मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय.आजी आणि आई खूप शांत होत्या ! 

दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो?एक अत्यंत प्रतिभावान,हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारू मुळे वयाच्या अवघ्या३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला! 

मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहेत याचा खूप आनंद आम्हाला होतो. अनिल बर्वेची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे ! 

ज्यूलिएटचे डोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाईची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला, पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना… .. किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !! 

तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक, ज्याचं नाव होतं फुलवा. नेहमीप्रमाणे ते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे. झालं ..  भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही  म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलवाच ठेवणार, ती नाव काढेल ! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला, त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता.

बाबा तुम्ही ‘ सामान्य माणूस ‘ या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत, कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो ! मी ९ वर्षांची,राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हतं ! असहाय्य होतो आम्ही… 

बाबा, इतकी वर्ष तुमच्या बद्दल मनात एक किंतू होता,  पण आता तो नाहीये ! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरंच खूप  वाटतंय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा असं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा !

तुमची फुलवा… 

(प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर ही प्रतिभावंत लेखक अनिल बर्वे यांची मुलगी हे माहीत नव्हतं .पण फुलवाच्या या पत्रामुळे कळलं. .हे पत्र जरूर वाचा ! एका दारू व्यसनाच्यापायी केवढा मोठा लेखक आयुष्य संपवतो हे लक्षात येईल ! ) 

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments