प्रा. सुनंदा पाटील
कवितेचा उत्सव
☆ माय मराठी… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
☆
साहित्याच्या समईमधली वात मराठी
जगण्यासाठी उजेड देते ज्योत मराठी
वर्ण स्वरांची बाग बहरली फुले उमलली
काव्य कथांचे तारांगण ही रात मराठी
*
लय तालाच्या झुडूपाचे हे पान मराठी
अलंकापुरी भावभक्तीचे दान मराठी
कितीक भाषा भगिनी तिजला जगता माजी
आई म्हणुनी अग्रपुजेचा मान मराठी
*
अभंग ओवी श्लोकामधली गेय मराठी
आर्या भारुड पोवाड्याचे श्रेय मराठी
सजे लावणी सौंदर्याला उपमा नाही
मराठीत मी जगणे मरणे ध्येय मराठी
*
मातेच्या गर्भात उमगली मला मराठी
कोण आईला दुष्ट बोलतो “बला” मराठी”
देवनागरी लिपी आमची वैभवशाली
दिक्कालाच्या पार पोचवू चला मराठी
*
साहित्याचा गिरी लंघण्या पाय मराठी
कामधेनुच्या दुग्धावरची साय मराठी
परभाषेच्या आक्रमणाने व्यथित झाली
सहोदरांनो अता वाचवू माय मराठी
☆
गझलनंदा
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈