श्री प्रसाद जोग
इंद्रधनुष्य
☆ दास नवमी… ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆
श्री समर्थ रामदास स्वामी महानिर्वाणदिन माघ कृष्ण ९, शके १६०३ चैत्र शुक्ल ९ शके १५३० – रामनवमी या शुभमुहूर्तावर त्यांचा जन्म झाला त्याचे नांव नारायण ठेवले.हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.
वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले. बालपणी नारायण फार हूड व खोडकर होता. त्याला मुलांबरोबर खेळणे, रानावनात हिंडणे, झाडावर चढणे, पाण्यात डुंबणे आणि एकांतात जाऊन बसणे असे छंद होते.
सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, “नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे.” हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण अडगळीच्या खोलीत जाऊन बसला व आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या अडगळीच्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, “नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?” त्यावर नारायणाने उत्तर दिले, “आई, चिंता करीतो विश्वाची”
नारायणाने मारुती मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. मारुतीकृपेने नारायणाला श्रीराम दर्शन झाले व प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष अनुग्रह करून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अनुग्रह झाल्यावर नारायण मौनव्रत धारण करून एकांतात राहू लागला.
वयाची १२ वर्षे पूर्ण होतांना नारायणाला एका श्रीरामावाचून अन्य कोणी जिवलग उरले नव्हते. नाशिक पंचवटीतील श्रीराम मंदिरात नारायणाने प्रवेश केला तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरु होता. मंदिरात मानसपूजा व प्रार्थना केली. सामर्थ्य मिळवल्याशिवाय समाजोद्धाराचे कार्य तडीस नेणे अशक्य आहे हे जाणून खडतर तप:श्चर्येचा संकल्प केला आणि रामाची आज्ञा घेऊन आपल्या तप:श्चर्येस योग्य असे स्थान निवडले.
नाशिकपासून जवळच पूर्वेस टाकळी हे गांव आहे. तेथे गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तप:श्चर्येस हे स्थान अनुकूल आहे असे पाहून तेथेच एका गुहेत नारायणाने वास्तव्य केले.
श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणे. दुपारी पंचवटीत जाऊन माधुकरी मागून टाकळी येथे येऊन भोजन करणे. थोडा वेळ विश्रांती घेऊन ग्रंथावलोकन करणे. नंतर पंचवटीत कीर्तन व पुराण श्रवणास जाणे. संध्याकाळी टाकळीत येऊन आन्हिक आटोपून विश्रांती घेणे. एकच वेळ भोजन व उरला वेळ अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि वाल्मिकी रामायणाचे लेखन व नामस्मरण याप्रमाणे अव्याहत १२ वर्षे नेम चालू होता. इतक्या लहान वयात अशी खडतर तप:श्चर्या करीत असताना तत्कालीन समाजाकडून त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. यातूनच “अनुदिनी अनुतापे तापलो रामराया” अशी करुणाष्टके प्रगटली.
ऐन तारुण्याचा काळ, त्यात १२ वर्षाच्या तप:श्चर्येने बाणलेल्या प्रखर ज्ञान वैराग्याचे तेज, सूर्योपासनेने सुदृढ झालेली देहयष्टी आणि अनन्य भक्तिने अंत:करणात वसलेली कृपादृष्टी असे हे समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून अनेक जण प्रभावित झाले. त्यापैकी काही निवडक लोकांना अनुग्रह देऊन उपासनेस लावले.
श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील कृष्णाकाठ आपल्या कार्यास निवडला कारण इतर स्थळांपेक्षा येथे थोडी शांतता होती. कार्यास सुरुवात करताना परिस्थितीचा आढावा घेणे, चांगले कार्यकर्ते शोधणे, कोणते कार्य कोणाकडून व कोठे करायचे, कसे करायचे याचा आराखडा तयार करणे व ते अंमलात आणणे याचा पूर्ण विचार करून समर्थ प्रथम महाबळेश्वर येथे आले. तेथे चार महिने राहिले. तेथे मारुतीची स्थापना करून दिवाकर भट व अनंत भट यांना अनुग्रह दिला. वाई येथे मारुतीस्थापना करून पिटके, थिटे, चित्राव यांना अनुग्रह दिला नंतर माहुली व जरंडेश्वर येथे काही दिवस राहीले. शहापूर येथे सतीबाई शहापूरकर यांना अनुग्रह देऊन त्यांच्यासाठी चुन्याचा मारुती स्थापन केला. समर्थ स्थापित ११ मारुतीतील शहापूरचा हा पहिला मारुती. यानंतर क-हाड, मिरज, कोल्हापूर या भागात अक्का, वेण्णा, कल्याण व दत्तात्रेय हे शिष्य समर्थांना मिळाले.
उंब्रज येथे मारुती स्थापना करून समर्थ पंढरपूर येथे गेले. तेथे तुकाराम महाराजांची भेट झाली. परत येताना मेथवडेकर यांना अनुग्रह दिला. चाफळ येथील मठाचे कार्य दिवाकर गोसावींकडे सोपवले. माजगांव येथे मारुतीस्थापना करून समर्थ दासबोध लिखाणास शिवथरघळ येथे गेले.
१६७६ साली समर्थ सज्जनगड येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आले. शिवाजी महाराजांनी समर्थांसाठी मठ बांधून दिला व हवालदार जिजोजी काटकर यांस उत्तम व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
प्रतापगड येथील बालेकिल्ल्याच्या दाराजवळ मारुतीची स्थापना केली. हा समर्थ स्थापित शेवटचा मारुती.
त्यावेळी दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. माघ वद्य पंचमी १६८२ या दिवशी तंजावरहून व्यंकोजीराजांनी पाठविलेल्या राममूर्ती सज्जनगडावर आल्या. समर्थांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. समर्थांनी शेवटची निरवानिरव करण्यास सुरुवात केली. समर्थांचा अंतकाळ जवळ आला असे जाणून शिष्य व्याकुळ झाले. आम्ही यापुढे काय व कसे करावे असे त्यांनी विचारले असता समर्थ म्हणाले
माझी काया आणि वाणी ।
गेली म्हणाल अंत:करणी ।
परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥
आत्माराम दासबोध ।
माझे स्वरुप स्वत:सिद्ध ।
असता न करावा हो खेद । भक्त जनीं ॥
माघ कृष्ण ९ , शके १६०३, (२२ जानेवारी, १६८२ ) वार शनिवार दुपारी दोन प्रहरी सज्जनगडावर रामनामाचा घोष करून समर्थ रामरुपात विलीन झाले.
ज्याठिकाणी श्रीसमर्थांवर अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी राममंदिर व तळघरात समाधीमंदिर बांधले.
त्यानंतर अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ मठाचा कारभार अनेक वर्षे सांभाळला.
समर्थानी दासबोध आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी,काही स्फूटरचना, भीमरूपी- मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या रचल्या.
सोबत करुणाष्टकांची पी.डी.एफ. ची लिंक देतो आहे .
http://www.samarthramdas400.in/literature/karunashtake.pdf
शेवट करताना एवढेच म्हणावेसे वाटते
समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।
जय जय रघुवीर समर्थ.
(संदर्भ :श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांची वेबसाईट)
माहिती संकलन : श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈