सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ छोड आये हम वो गलियाँ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

गुलजार! शब्दांचा बादशहा, कल्पनातीत कल्पनांचा जादूगार, हरएक रंगांचे गुलाब फुलवून त्यांची बागच शारदेच्या पायी वाहण्याची मनिषा बाळगणारा – गुलजार! त्यांनी किती समर्पक नांव निवडलंय स्वतःसाठी! त्यांचं खरं नांव संपूर्णसिंह कालरा. पंजाब मधील दीना या गावी १८ऑगस्ट १९३६ मध्ये त्यांचा जन्म झाला. हा भाग आता पाकिस्तान मध्ये आहे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसरला स्थायिक झाले. काम शोधण्यासाठी प्रथम त्यांचा मोठा भाऊ मुंबईला आला. नंतर त्याने गुलजार यांना बोलावून घेतले. ते लहान मोठी कामे करू लागले. कविता लिहिण्याची, वाचनाची आवड होतीच. एका गॅरेज मध्ये मेकॅनिक म्हणून काम करीत असताना सचिन देव बर्मन आपली गाडी घेऊन आले होते. त्यावेळी त्यांना हा मेकॅनिक शायर भेटला. त्याने आपल्या कविता बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी यांना वाचून दाखवल्या. आणि बिमल रॉय यांनी ‘ बंदिनी ‘ या चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले. ‘ मोरा गोरा अंग लै ले, मोहे शाम रंग दै दे ‘ हे त्यांचं पहिलं गाणं सगळ्यांना खूप आवडलं आणि ते बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले, मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. हा कल्पनांचा झरा गेली ६-७ दशके अव्याहत वाहतो आहे.

अध्यात्मापासून प्रणय गीतांपर्यंत सर्व विषयांना हात घालणारे रवींद्रनाथ टागोर, शायरी हा आत्मा असणारा गालिब, मीरेची पदे, गीतकार शैलेंद्र आणि पंचमदांचे हास्याचे फुलोरे या सर्वांनी गुलजार यांना भुरळ घातली आणि सारे त्यांचे गुरू बनले. हिंदी व उर्दू वर प्रभुत्व असणाऱ्या या कवीचे प्रेम मात्र बंगालीवर होते, त्याशिवाय खडी बोली, ब्रज भाषा, मारवाडी, हरियाणवी या भाषांतही त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे कित्येक कविता संग्रह, कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘रावीपार ‘  हा त्यांचा कथासंग्रह खूप गाजला. कुसुमाग्रज यांच्या मराठी कवितांचे व टागोरांच्या बंगाली कवितांचे हिंदीत भाषांतर त्यांनी केले. त्यांची मुलगी मेघना १३ वर्षांची होईपर्यंत दर वाढदिवसाला तिच्यासाठी गोष्टी, कविता लिहून त्याचे पुस्तक भेट देत होते.त्यांचे ‘चड्डी पेहेनके फूल खिला हैं ‘ गाणं माहीतच आहे. याशिवाय त्यांनी कित्येक चित्रपटांच्या पटकथा, संवाद लिहिले आहेत, जसे आनंद, गुड्डी, बावर्ची, कोशिश, आँधी, मासूम, रुदाली एकापेक्षा एक सरस!गाणी पण  काय, तुझसे नाराज नाही, चिठ्ठी आयी है, इस मोडसे जाते हैं, मेरा कुछ सामान अशी कित्येक गाणी आहेत की त्यातल्या कल्पना भन्नाट आहेत. हळुवार व संवेदनशील कथा, अर्थपूर्ण व आशयघन गाणी हे त्यांचं वैशिष्ट्य ! ‘ मेरे अपने ‘ या चित्रपटापासून ‘ हू तू तू ‘ पर्यंत बऱ्याच चित्रपटांचं दिग्दर्शन, किताबें झांकती हैं बंद अलमारीके  शीशोंसे, दिलमें ऐसें ठहर गये हैं गम, आदमी बुलबुला हैं पानीका अशी भावनाप्रधान शायरी! किती आणि काय काय!

कवितांतून ते कधी ईश्र्वराशी गुजगोष्टी करतात, कधी  त्याला निरक्षर म्हणतात, कधी त्याचे अस्तित्व नाकारतात. विषय दाहक असो वा कोमल, अतिशय संयमित शब्दात आशय पोहचविण्याचे काम त्यांची कविता करते. आज नव्वदीत सुध्दा त्यांच्या कविता, शायरी तरुणांनाही भावते. कुणीतरी असं म्हटलंय की गुलजार शब्दांच्या चिमटीत काळाला धरून ठेवतात, त्यामुळे त्यांची कोणतीही कविता आजची, कालची व उद्याचीही असते. ते कवितेत प्राण फुंकतात.

नुकताच गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, आणि प्रत्येक भारतीयाला मनापासून आनंद झाला. त्यांच्याबद्दल काय आणि किती लिहायचं असं झालंय. थोडं लिहून कौतुक संपेल असं हे कामच नाही. पण प्रत्येकाला काही लिहावं असं वाटतंय.त्यांना मिळणारा हा सर्वोच्च पुरस्कार असला तरी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे.२००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार,२००४ मधे पद्मभूषण, २०१३ मधे दादासाहेब फाळके पुरस्कार, साधारण २० वेळा फिल्म फेअर, २००९ मधे स्लमडॉग मिलेनियम या चित्रपटातील ‘ जय हो ‘ या गीत लेखनासाठी सर्वश्रेष्ठ ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. इतके पुरस्कार मिळून सुध्दा पाय जमिनीवर असणारा हा अवलिया प्रसिध्दी व ग्लॅमर या पासून कायमच दूर राहिला. स्वतःच्या तत्वांवर जगला. कुणीतरी ऑस्कर घेण्यासाठी कां गेला नाहीत असे विचारल्यावर

मिस्किलपणे म्हणतात, त्यांचा ड्रेस कोड असणारा काळा कोट माझ्याकडे नाही आणि मला काळा कोट देईल असा कोणी माझा वकील मित्रही नाही. जन्माने शीख असणारे गुलजार, लग्न हिंदू स्त्री बरोबर करतात, मीनाकुमारी आजारी पडल्यावर तिचे रोजे करतात. सहज न समजणारा माणूस! कदाचित त्यांच्या तरुणपणी त्यांनी देशाची फाळणी अनुभवली, त्यानंतरचा नरसंहार, कुटुंबाची फरफट डोळ्यांनी पाहिली. नंतर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांचं जुनं घर, ती गल्ली पाहिली म्हणे. त्यांच्या कवितांमधूनही तो ‘ दर्द ‘ डोकावतो. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मनातले हे दुःख  शब्दात आले असावे –

‘छोड आये हम वो गलियाँ’

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments