सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “अलिप्त…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
जगाच्याही पलीकडे जावून पहावं
अलिप्त इतकं कधीतरी रहावं
आपलं आपलं म्हणून जवळ केलेलं सारं
काही काळ दूर लोटून जगावं ….
फक्त ” मी” च असतो खरा
तरीही मीपणा नाही बरा
त्या “मी” लाच वेळ द्या जरा
आवरून घ्या माझेपणाचा पसारा ….
जग…. खरे ?खोटे?
राहू दे सारे आपल्यापुरते
जगापुढे सिद्ध करण्याची गरज ना उरते
जेव्हा आपली आपल्याला किंमत कळते….
जगाचा चष्मा खूप खूप मोठा
त्यातून दिसतो आपण कण छोटा
चष्म्यातून त्या पाहता पाहता
जीव थकून जातो इवला इवला….
आपल्याच चष्म्यातून जग पाहू थोडे
काय आणि कसे घडते इकडे
इवल्याशा नजरेतून पाहू जग विशाल
स्वतः सोबत जगता येईल मग आनंदी खुशाल….
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈