श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता 

मी खरंतर एकट्याने फिरणारा फिरस्ता. माझ्या लग्नाच्या अगोदर मी एकट्याने ६०% भारत भ्रमंती केली होती.

वपण लग्न झाल्यावर अनेकदा आम्ही म्हणजे, सौ.मधुरा व दोन्ही कन्यांसह स्वतः प्लॅन करून फिरायला जायचो. माझ्या गप्पा मारण्याच्या सवयीने अनेक लहान- मोठ्यांच्या ओळखी डोंबिवलीत होऊ लागल्या होत्या. त्यातील एक म्हणजे श्री.व सौ.दुनाखे दांपत्य. त्यांचा स्वतःचा ‘मधुचंदा ‘ नावाचा पर्यटन व्यवसाय. ते एकदा सहज गप्पांच्या ओघात म्हणाले ,’चला मनोजभै तुम्हीपण आमच्या बरोबर, सिमला-कुलू-मनालीला ! म्हटलं किती खर्च येईल? आम्ही दोघं व दोन लहान मुली. ही गोष्ट १९९७ सालची हं. तेव्हा चंद्रकांत दुनाखे म्हणाले २१००० रूपये. मी विचार केला आणि म्हणालो, ‘मी आत्ता अर्धे देईन, बाकीचे आल्यावर महिन्याभरात देईन, चालेल का ? त्यावर लगेच सौ.निलिमा दुनाखेंनी होकार दर्शवला. आणि दिल्ली-सिमला-कुलू-मनाली, असा  खऱ्या अर्थाने समूह सहलीचा आमचा प्रवास सुरु झाला. राजधानीने सकाळी दिल्लीत पोचल्यावर, श्री.दुनाखे यांनी दिल्ली स्थानकावरच आमचे स्वागत केले आणि  मग छान आरामशीर बसप्रवास सुरु झाला.

बसमध्ये मी इतका वेळ शांत कसा बसणार ? माझ्यासाठी मोठाच प्रश्न होता. म्हटलं चला आता अन् सुरू झालो. मी स्वतःची व माझ्या कुटुंबाची ओळख सांगितल्यावर प्रत्येक जण आपली ओळख सांगू लागला. ही ओळखपरेड संपली नि लगेचच जेवणाचा थांबा आला. मस्त सरसोका साग, मक्के की रोटी अन् लय भारी जम्बो लस्सी, क्या बात है! तिथल्या सरदारजी मालकाने सर्वांचे अगत्याने स्वागत करून, आग्रहाने खाऊ घातले. पाजी, की लाऊ जी? लगेच मैं बोल्या, ‘सरदार, अब मेरा पेट फाडेगा क्या? ‘,असं म्हणताच सरदारजी आणि नुकतीच ओळख झालेली मंडळी व त्यांची लहान मुलं खळखळून हसायला लागली.

आपला मित्र सर्वांच्या मनांत भरला ना राव!

असो, सुमारे नऊ तासांच्या प्रवासानंतर आम्ही  सारे, रात्री सिमल्याला पोचलो. बसमधून उतरताच प्रचंड थंडीने आमचे स्वागत केले अन् मग लगोलग मोठ्या मोठ्या खोल्या असलेल्या हॉटेलात जाऊन जेवण करून, सगळे गुडुप! सकाळी नाष्टा करून निघालो की बसने ! चक्क दोन दिवस सिमला दर्शन ! मॉल रोड, कुफरी, चाडविक फॉल्स,जाखू हिल, सिमला राज्य संग्रहालय, समर हिल अशी सर्वांग सुंदर स्थळं  पाहून पुन्हा त्याच अप्रतिम हॉटेलात रात्री मुक्काम ! तिसऱ्या दिवशी सकाळी चहा, नाष्टा करून कुलूचा प्रवास सुरु झाला. चौफेर निसर्गाचं विलोभनीय दर्शन करत करत गाने तो बनता है ना ! मध्येच सुसु ,जेवण -चहा पॉईंट इत्यादि करत-करत संध्याकाळी कुलूला पोचलो.

अप्रतिम बंगलेवजा हॉटेल, क्या बात है ! आणि हिमाचल प्रदेशातील जेवण म्हणजे लाजवाब हो !  दुनाखेंनी कुलूला पोचल्यावर दुसऱ्या दिवसांपासून ते मनाली सोडेस्तोवर मात्र आपलं बुवा हं,  म्हणजे मराठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम सोय केली होती .

तर मंडळी, बियास नदीच्या खोऱ्याच्या भागाला कुलू  म्हणतात. ताज्या भाज्या, मसाले, औषधी वनस्पती, गहू, मका, तुती, देवदार, बार्लीची शेती हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय ! इथली गरीब घरातली मुलं सुद्धा कसली गोड दिसतात हो ! आरोग्यकारक उष्मोदकाचे झरे असल्याने, विहार व विश्राम यांसाठी कुलूला प्रवासी पुष्कळ येतात. येथील प्राचीन हिंदू मंदिरांवरील शिल्प प्रेक्षणीय आहे. त्यामुळे छोटेखानी स्वर्ग असलेल्या कुलूला वेगळेच महत्व आले आहे. दोन दिवस कुलू व्हॅली भटकंती करून, पाचव्या दिवशी आम्ही सकाळी ८ वाजता मनालीकडे निघालो.

कुलू ते मनाली माझ्या अंदाजाने बसने प्रवास ५६ किमी.चा. घाटाघाटातून प्रवास करत अखेर मनालीच्या टुमदार हॉटेलात पोचलो, अन् जेवण करून मनालीतील छोटेखानी मॉलरोडवर फिरायला गेलो. मधुचंदाच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारला. श्री.व सौ.दुनाखे यांचं व्यवस्थापन एकदम चोख, मानलं राव ! सहाव्या दिवशी हिडिंबा मंदिर पहात असताना तर मला काय फोटो मिळाला! मी जाम खूष. जुन्या मनालीतील मनु मंदिर पाहून परत भोजन व आराम करून नागरगढी हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी गेलो, त्याचं किती वर्णन करू तितकं कमीच.

सातव्या दिवशी नेहरू कुंड व विविध पारंपरिक वस्तू आणि इमारतींच्या प्रतिकृती असलेले, हिमाचलचा वारसा प्रदर्शित करणारे, लहानसे संग्रहालय पाहिले आणि संध्याकाळी मस्त आराम केला. आठव्या दिवशी सकाळी – सकाळी सुप्रसिद्ध रोहतांगपास या बर्फाच्छादित रुपडं असलेल्या, प्रसिद्ध ठिकाणी पोचलो. गमबूट, कोट, हातमोजे, टोपी प्रत्येकाच्या आकाराप्रमाणे परिधान करत, चालतोय चालतोय!आलटून -पालटून दोन्ही मुलींना कडेवर घेत, कसेबसे पोचलो अन् समोर जणू काही सिनेमातील दृश्य  अवतरलेलं! आपण आपल्या डोळ्यांनी हे प्रत्यक्ष पाहतोय, यावर विश्वासच बसेना, असा कोसो-दूर पसरलेला बर्फ !आहाहा! आमच्या पैकी बरेच जण  चक्क बर्फावर आडवे झालो. नंतर अर्थातच एकमेकांवर हो हो, तीच फेका-फेकी आम्हीही केली बरं.  पण -पण काहींच्या विकेट जायला सुरवात ना, कारण गमबुटात बर्फ गेल्यामुळे बधिर पणा यायला लागला आणि मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत नुसती धमाल व रडारड की! अन् तिथून सर्वांचे पाय बसकडे वळायला लागले. किती लांब ती बस? त्याला इकडे बोलवा ना ! अखेर हुश्श हुश्श करत सगळेच एकदा भाड्याचे सामान परत देऊन कसे-बसे बसपर्यंत पोचलो. आत जाऊन कधी एकदा बसतोय असं झालं ना ! हु §हु§हु§ बसमध्ये कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, चिडीचूप! 🤗

दुपारी दोनच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो बुआ. त्यादिवशी सगळ्यांनी साडेतिनला गरम -गरम जेवणावर ताव मारला अन गुडुप! संध्याकाळी हळूहळू खोलीच्या बाहेर येऊन, चहाचे घोट घेत, कसली फाटली ना! याचीच चर्चा. पुन्हा गमती-जमती व जेवण करून गप्पांचा फड रंगला आणि हळूहळू आपल्या खोलीत रवाना. इकडे मी आमच्या खोलीत आलो आणि मधुराला कापरं भरलं. मी जाम टरकलो. लगेच सौ.दुनाखे वहिनींना बोलावलं. त्यांनी स्थानिक डॉ.ना फोनाफोनी सुरू केली, पण कोणी फोन उचलेना. कारण मनालीत त्यावेळी संध्याकाळी ७ नंतर सगळे डॉ.भेटणार नाही हं, असं म्हणायचे. मग हॉटेलची मालकीण आली, तिनं बघितलं आणि पांच मिनिटांत आख्खी ब्रँडीची बाटली आणून मधुराच्या पूर्ण शरीराला, तिने ब्रँडीने मसाज केला. एका तासानं ती शुद्धीवर आली अन् आम्ही सारे हुश्श! त्या पंजाबी मालकीणीने सांगितलं,’ ऐसा किसी किसीको होता है, जादा थंड में जाके आने के बाद ऐसा होता है! त्या पंजाबन बाईने एक पैसा घेतला नाही हा तिचा दिलदारपणा हो. ‘ये तो मेरी महमान है जी!’ सलाम त्या माउलीला.

या संपूर्ण प्रवासात सौ.मधुराला मी दम दिला होता, मी छायाचित्रकार आहे हे कोणालाही सांगायचं नाही, नाहीतर मला सहलीचा आनंदच घेता आला नसता. आणि तिने ही गुप्तता पाळली चक्क. 🤗

नवव्या दिवशी आम्ही नाष्टा करून बाप्पा मोरया करत, बसमधून परतीच्या प्रवासाला, म्हणजेच दिल्लीला निघालो. मनालीहून निघालेली बस अडीच तासात कुलू-मनालीच्या मध्येच बंद पडली. आम्ही वाट बघून खाली उतरलो, ड्रायव्हर आणि क्लीनर काय नक्की झालं ते बघत होते. कारण गेले दहा दिवस बसने कुठेही कुरकुर केली नव्हती. नेमकी बंद पडली आणि तीही रस्त्याच्या मधोमध  ना! त्यावेळेस घाटाच्या खाली कुठेही काहीही नव्हतं, फक्त रस्ता, सुंदर निसर्ग व बियास नदीच्या पाण्याचा खळाळता गोड आवाज! एका तासाने समजलं पाटा तुटला अन् बस दुरुस्त व्हायला

किमान ८/९ तास तरी लागतील, होईल हेही नक्की नाही. झालं, नुसता गोंधळ, आमचं विमान / रेल्वेचं आरक्षण आहे ते चुकणार, आता काय होणार, मुलांचं कसं होणार वगैरे वगैरे. हो, आणि ९७ साली मोबाईल नव्हते व आजूबाजूला कुठंही फोन नव्हते. नाही म्हटलं तरी सहल आयोजक पण गोंधळून गेले ना! आम्ही रस्त्यावरच कडेला उभे होतो, तितक्यात श्री.दुनाखे म्हणाले, कोणाचंही नुकसान झाल्यास मी भरपाई देईन हे नक्की! त्यांची काहीच चूक नसताना हे  सांगणं, ही खरंच हिम्मत लागते! ती त्यांनी दाखवली. मला धरमशालाला जाऊन दुसऱ्या बसची सोय करावी लागेल, आणि मगच सर्वांना घेऊन निघावं लागेल. पण यासाठी संध्याकाळ होईल. मी म्हटलं तुम्ही ट्रक वगैरे जी दिसेल त्या गाडीने निघा, मी सांभाळतो सगळ्यांना अन् ते रवाना झाले.

गोंधळ  नुसता वाढतच चाललेला! मी सर्वांना शांत करत परिस्थितीची कल्पना दिली, आता कृपया शांत रहा अन्यथा काहीही होणार नाही.

मी दोघांना घेऊन रस्त्यावर पुढे चालत निघालो. अर्ध्या तासानं छोटं मंदिर दिसलं अन् माझ्या जीवात जीव आला. तिथं पोचल्यावर आत एक माणूस होता, त्याला विचारलं, स्टो वगैरे काही आहे का? सर्व कल्पना दिल्यावर त्याने होकार दिला अन आम्ही खूष झालो. बिचारा सामान घेऊन बस थांबली तिथं आला, त्यानं आडोसा पाहून स्टो पेटवला. मग दुनाखेंचे आचारी होते त्यांनी चहा बनवला. नंतर भात व डाळ शिजायला ठेवली.

इकडे मंडळींना चहा दिल्यामुळे, सगळे शांत झाले होते. आता मी वहिनींची परवानगी घेऊन, बसचा ताबा घेतला. मी फर्मान सोडलं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गमतीदार प्रसंग सांगा, असे म्हणताच एक एक करत बोलू लागले. कोणी म्हणालं लग्न झालं, मुलगा /मुलगी जन्मले / आई बाबांची पुण्याई / माझी कॉलेज मधली मैत्रीण, नेमकी माझ्याच गळ्यात पडली / लॉटरी५० रु. ची लागली / एकजण म्हणाले तुम्हीच भेटला / आमच्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिलाच हनिमून वगैरे करता -करता चक्क ३ तास हशा-टाळ्यात कसे गेले ते समजलंच नाही. मी लगेच खाली उतरून जेवण तयार झालं ना ते बघितलं आणि सर्वांना खाली उतरवलं व सांगितलं थोडं रस्त्याखाली या, इथं थोडी बसायला जागा आहे . सर्व मंडळींचं भोजन उरकेपर्यंत दुपारचे ३ वाजले. मी हुश्श झालो, दुनाखे वहिनी तर मनोमन माझे आभार मानत होत्या. मी म्हटलं लोकं ओरडणार हो साहजिक आहे, पण किती वेळ ओरडतील? 😂

नंतर ज्यांना डुलकी घ्यायची ते बसमध्ये गुडूप, आणि मी चहा बनवण्याच्या तयारीला. संध्याकाळी तिकडे अंधार लवकर पडतो.५ वाजता चहा दिला मंडळी एकदम खूष. केव्हा येणार दुनाखे, कसे येणार, असं करता -करता, रात्री ९ ला श्री.दुनाखे दुसरी बस घेऊन आले आणि सर्व सामान भरून, आपली आपली पार्सलं बसमध्ये बसली अन् गाडी बुला रही है करत, सकाळी दिल्लीत पोचलो.

मंडळी मधुचंदा ट्रॅव्हल्स, उत्तम सोयी, भोजन आणि भरभरून देणारे दुनाखे दांपत्य, काय आणि किती  सांगू ?

आज मधुचंदा खूप मोठी झाली आहे. मुलगा चेतन व सून सौ.अनुजा दोघेही तितकीच काळजी घेतात व देशविदेशात आनंदाने व सुखरूप फिरायला घेऊन जातात.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments