सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ समाधानाची व्याख्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बसमध्ये चढलो तर खरं.. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला.

बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली. पुढचा एक जण  सहज तेथे बसू शकत होता… पण त्याने ती सीट मला दिली.  

पुढच्या स्टाॕप वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली.

आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला.

बरं हा माणूस अगदी सामान्य दिसत होता. म्हणजे कुठेतरी मजुरी करून घरी परत जात असावा.

 

आता शेवटच्या स्टाॕपवर आम्ही सर्वच उतरलो. 

तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो…  विचारले, 

“ प्रत्येक वेळी तुम्ही  तुमची सीट दुसऱ्याला का देत होता?? “

 

तेव्हा त्याने दिलेले उत्तर…. 

“ मी शिकलेला नाही हो. अशिक्षित आहे मी. एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो, आणि माझ्याजवळ कोणाला द्यायला काहीच नाही… ज्ञान नाही, पैसा नाही. तेव्हा मी हे असे रोज करतो. हे मी सहज‌ करू शकतो ना..!  दिवसभर काम केल्यानंतर अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमते. मी तुम्हाला माझी जागा दिली, तुम्ही धन्यवाद म्हणालात, यातच मला खूप समाधान मिळाले. मी कोणाच्या तरी कामी आलो ना? 

…. असं मी रोज करतो. माझा नियमच झाला आहे हा.. आणि रोज मी आनंदाने घरी जातो.” 

 

त्याचे उत्तर ऐकून मी थक्कच झालो. 

त्याचे विचार व समज बघून, याला अशिक्षित म्हणायचे का? हा विचार आला. 

 

कोणासाठी, काहीतरी करायची इच्छा, ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना !

मी कशा रीतीने मदत  करू शकतो, यावर शोधलेला हा उपाय बघून देव सुध्दा आपल्या या निर्मितीवर खूष झाला असेल ! माझ्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल !

        

त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या….. 

स्वतः ला हुषार, शिक्षित समजणारा मी, त्याच्यासमोर  खाली मान घालून स्वतःचे परिक्षण करू लागलो.

किती सहज, त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. 

देव त्याला नक्कीच पावला असणार..

 

मदत ही खूप महाग गोष्ट आहे. कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात..! 

सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षित का ? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर, मोठी कार, म्हणजेच श्रीमंती का ??

 

कोण तुम्हाला केव्हा काय शिकवून जाईल, आणि तुमची धुंदी उतरवेल सांगता येत नाही !

या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले..!

   

म्हणतात ना…… 

    “कर्म से पहचान होती है इंसानों की।

      वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में”। 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments