श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ का गं तुझे डोळे ओले? – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆
कमलाबाई अजूनही आल्या नव्हत्या. सकाळचे आठ वाजून गेले होते. त्यांची यायची वेळ टळून गेली होती. वाट बघून इतक्या उशिरा स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हणजे आज निमाची खूप धावपळ होणार होती. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कमलाबाई स्वयंपाकाला येत होत्या. स्वयंपाक चवीचा आणि काम नीटनेटकं करायच्या. अघळपघळ गप्पा नव्हत्या, कुठे सांडलवंड नव्हती. तळणीतलं उरलेलं चार चमचे तेलसुद्धा त्या निगुतीने झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी आमटी भाजीला वापरायच्या. आजपर्यंत कधी एक दिवस त्या आल्या नाहीत असं झालेलंच नव्हतं. आणि आज असं अचानक ..आधी न सांगता, कांही निरोप न देता…? निमाला अचानक आपला आधार तुटल्यासारखंच वाटलं. तरीही चटपटीतपणे तिने कुकरची तयारी केली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.’कमलाबाईच असणार.. नक्कीच..’ ती सावरली. त्यांच्या न येण्यामुळे नकळत मनात साठू लागलेली अस्वस्थता क्षणात विरून गेली. ती दार उघडायला धावली. दारात कमलाबाई नव्हत्याच. एक मुलगा होता. अनोळखी.
” कमलाबाई आज स्वयंपाकाला येणार नाहीत”
” कां..?”
” घरी भांडणं झालीयत.” त्यानं निर्विकारपणे सांगितलं. आणि पुढं काही विचारणार तोपर्यंत तो निघूनही गेला. कमलाबाई आणि भांडण या दोन गोष्टी कल्पनेतसुद्धा एकत्र येणं निमाच्या दृष्टीने अशक्यच होतं.
पण.. मग हा.. असा निरोप? तिनं दार लावून घेतलं. आत येऊन कुकर गॅसवर चढवला. आता कणिक भिजवायला घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सकाळच्या वेळीसुद्धा एरवी मिळणारा थोडाफार निवांतपणा कमलाबाईंनी असा हिरावून घेतला होता!
निमाचा नवरा बाथरूममधे नेहमीप्रमाणे मजेत गाणी गुणगुणत यथासांग आंघोळ करत होता!
” आंघोळ आवरून जरा लवकर या बरं बाहेर “
त्याचा गाण्याचा आवाज मधेच तुटला. अंगावर पाणी ओतल्याचा आवाज मधेच थबकला. बादलीत सोडलेला नळ क्षणभर बंद झाल्याचं तिला बाहेरूनसुद्धा जाणवलं.
” काय गं?” तो खेकसला.
“कांही नाही.जरा लवकर आवराss” कपाळाला आठ्या घालून ती पुन्हा कामाला लागली. नवऱ्याचा राग आपल्याला नेमका कशाबद्दल आलाय याचा क्षणभर तिलाच उलगडा होईना.आता बाथरूममधून बाहेर येऊन त्यानं काही विचारलं तर..?
तो आलाच.
“काय गंs? का ओरडत होतीस?”
आपल्याला आता हुंदकाच फुटणार असं वाटताच निमा महत्प्रयासानं छानसं हसली.
“ओरडत कुठं होते? तुम्हाला आत ऐकू यावं म्हणून मोठ्यानं बोलले “
“तेच ते. पण कां?”
” आज कमलाबाई येणार नाहीयेत.”
” बरं मग?” मी काय करू?” त्याचा तिरसट ति-हाईत प्रश्न! ऐकलं आणि ती त्रासिकपणे त्याच्याकडे पहात राहिली.
“चिडतेयस कशाला ? येतील अजून.”
” येतायत कुठल्या? एक मुलगा येऊन निरोप सांगून गेलाय”
” फक्त आजच?की उद्यासुद्धा?”
त्याही मन:स्थितीत निमाला नवऱ्याच्या धोरणीपणाचं थोडं कौतुकच वाटलं. किती साधा पण नेमका प्रश्न! तो आपल्याला का नव्हता सुचला?…
” उद्याचं उद्या बघू. तुम्ही आता असं करा, पटकन् कपडे करून या आणि आपल्या तिघांचे डबे घासून घ्या “
“आणि मग?नंतर पोळ्या घेऊ करायला?” त्यानं उपरोधानं विचारलं.
” पोळ्या मी करतेय हो. तुम्ही तिघांची पानांची तयारी करून ठेवा आणि बाहेर जरा केदारकडे बघा.या गडबडीत आज त्याच्याजवळ बसून त्याचा अभ्यास घ्यायला मला जमणार नाहीये आणि तो आपापलं कांही करणार नाहीय”
कपाळाला आठ्या घालून नवरा कपडे बदलायला निघून गेला….!
आपल्या नवऱ्याकडून गडबडीच्या वेळी एखादं हलकसं काम किंवा केदारकडून त्याचा अभ्यास न चिडता करून घ्यायची अशी आणीबाणीची वेळ काही आज प्रथमच आलेली नव्हती. पण आज तिचा तिने मनातून थोडा धसकाच घेतला होता. आता यावेळी नेमकं परीक्षा बघायला आल्यासारखे कुणी पाहुणे येऊन टपकू नयेत असं निमाला मनापासून वाटत असतानाच दारावरची बेल वाजली.
“बघा हो कोण आहे?” ती आतूनच ओरडली.
” निमाss..” त्याची त्रासिक हांक.
बारीक गॅसवर तवा तापत ठेवून निमा बाहेर आली. आता या गडबडीत कुणाचं स्वागत करायला लागतंय याचा तिला अंदाज बांधता येईना. बाहेर येऊन तिने पाहिलं तर दार आतून तसंच बंद होतं. सिगरेटचे झुरके घेत नवरा पेपर घेऊन आरामात सोफ्यावर बसून होता.
“काय हो?”
“कुठं काय? अगं बघ ना कोण आलंय?”
” एवढ्यासाठी मला आतून बोलावलंत? अहो जागचे न उठता हात लांब करून बसल्या जागेवरून सुद्धा दार उघडू शकला असतात की हो. मुकाट्याने दार उघडा न् बघा कोण आहे ते.” ती तणतणत आत वळणार तेवढ्यात बेल पुन्हा वाजली. चडफडत तिने वळून दार उघडलं. दारात कमलाबाई उभ्या होत्या! नेहमीसारख्याच हसतमुख,प्रसन्न!
“आज उशीर झाला हो थोडा..” चप्पल काढता काढताच बोलत त्या गडबडीने आत आल्या आणि पदर खोचून तशाच स्वयंपाकघराकडे निघाल्या. थोडसं आश्चर्य आणि थोडासा अनपेक्षित आनंद यामुळे निमा क्षणभर खिळून उभीच राहिली.
पेपरमधून डोकं वर काढून नवऱ्याने क्षणभर निमाकडे रोखून पाहिलं. ते पहाणं असं, जसंकाही ‘कमलाबाई येणार नाहीयत’ असं खोटंच सांगून त्याला कामाला जुंपायचा हिचाच काहीतरी डाव होता. तिने हळूच नवऱ्याकडं पाहिलं.नजरानजर होताच कपाळाला आठ्या घालून त्याची पेपरची पारायणं पुन्हा सुरू झाली होती. अभ्यासाचं दप्तर तसंच पसरून केदार कॉमिक्स वाचत अंथरुणावर लोळत होता. अजून अंथरूणं गोळा व्हायचीत हे तिला प्रथमच जाणवलं आणि कमलाबाई अनपेक्षितपणे आल्याचा मनाला स्पर्शू पहाणारा आनंद तिथेच विरून गेला..!आज कमलाबाई आल्याच नसत्या तर..?
— क्रमश: भाग पहिला
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈