श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ सयाजीराव गायकवाड :: ☆ श्री प्रसाद जोग

जन्म: ११ मार्च, १८६३.

(महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड.) 

१८७५ ते १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द – १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

बडोद्याचे लोकप्रिय महाराज खंडेराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे बंधू मल्हारराव गादी सांभाळू शकले नाहीत, कारण त्यांच्यावर बंधूंच्या हत्येचा कट केल्याचा आरोप होता आणि त्या साठी त्यांना अटक देखील झाली होती. खंडेराव महाराजांची मुले लहान वयात निवर्तली असल्याने त्यांच्या विधवा पत्नी महाराणी जमानाबाईसाहेब यांनी कुटुंबातील अन्य मुलांचा दत्तक घेण्यासाठी शोध सुरु केला. नाशिक जवळील कौळाणे येथील काशीराव त्यांच्या तीन मुलांना १)आनंदराव २)गोपाळराव ३) संपतराव याना घेऊन बडोद्याला आले. तिथे तिघांचीही परीक्षा घेण्यात आली, त्यांना विचारले की ‘तुम्हाला इथे का आणले आहे माहीत आहे का?गोपाळराव म्हणाले मला इथे राज्य करण्यासाठी आणले आहे त्या उत्तराने संतुष्ट होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

दिवाण, सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणा सुरळीत केली, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३), न्याय व्यवस्थेत सुधारणा केल्या, . ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता  ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. भारतामध्ये सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये अनेक ग्रंथालये स्थापन केली. त्यांनी स्वतः ग्रंथालय शात्राचे शिक्षण घेतले. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, मिश्र विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत, (कमाठी बाग) सयाजी उद्यान., सुरसागर तलाव, खंडेराव मार्केट, वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.

प्रजेची पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी अजवा या ६२ दरवाज्यांच्या धरणाची निर्मिती केली. त्या वेळी बडोद्याची लोकसंख्या एक लाख होती तरी पुढचा अंदाज घेऊन तीन लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली.

त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.

‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

प्रजाहितदक्ष राजा हा शब्द सार्थ ठरवणाऱ्या महाराजा सयाजीराव (तिसरे) याना मानाचा मुजरा.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments