डाॅ. विष्णू वासमकर
कवितेचा उत्सव
☆ हिमालयाच्या कुशीत ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆
☆
वाटत होते असतील सुंदर
म्हणूनही पहावया आलो डोंगर,
जवळी जाता भयचकित मीच
पाहुनी विराट हे हिमगिरीवर ! १.
*
हिमालयाच्या कुशीत जाता
विराट रूप ते करी अचंबित,
दिव्यत्वाची प्रतीती येऊन
पुन्हा पुन्हा मी झालो स्तंभित ! २.
*
यमुनेच्या ह्या झेलून धारा
गंगेमध्ये वितळून गेलो,
हिमरुद्राच्या चरणी लागून
अपवित्र मी पवित्र झालो ! ३.
*
श्रीविष्णूचा मग धावा करता
बद्रीनाथही दिसू लागला,
गुज मनातील भेटून सांगीन
त्या माझ्या मग कृष्णसख्याला !! ४.
☆
© डाॅ. विष्णू वासमकर
स्थळ : हिमालय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈