श्री प्रसाद जोग
इंद्रधनुष्य
☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च… ☆ श्री प्रसाद जोग ☆
जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जाते.
शीघ्र काव्य रचायची प्रतिभा असणाऱ्या कवी साधुदासांच्या कवितेची गंमत वाचा …
त्यांच्या शिघ्र कवित्वाबद्दल कै.कवी रेंदाळकर यांना शंका होती.म्हणून एके दिवशी अचानक ते साधुदासांच्या घरी पोचले ,आणि त्यांना म्हणाले तुमचं शिघ्र कवित्व म्हणजे ढोंग आहे, जर खरेच आपण शिघ्र कवी असाल तर मला अत्ताच्या अत्ता कविता करून दाखवा.या वर साधुदास त्यांना म्हणाले मला विषय तरी सांगा, कशावर कविता करू ते.तर रेंदाळकर म्हणाले, कवितेवर कविता करून दाखवा बघू.
क्षणभर हाताची हालचाल करून ते म्हणले,”हं घ्या लिहून आणि त्यांनी ही कविता सांगितली …
*
कवीने कविता मज मागितली
करण्या बसल्या समयी कथिली
*
कविता मज पाहुनिया रुसली
तरि आज करू कविता कसली
*
कविता स्वच काय विण्यामधले
म्हणून मज छेडूनी दावू भले
*
कविता गुज बोल मनापुरता
प्रिय तू बन मी करितो कविता
*
कविता मधुराकृती का रमणी
म्हणुनी तिज पाहू तुझ्या नयनी
*
कविता करपाश जिवाभवता
मृदू तू बन मी करितो कविता
*
कविता वद काय वसंत-रमा
म्हणुनी तुज दावू तिची सुषमा
*
कविता द्युती-लेख मतीपुरता
पटू तू बन मी करितो कविता
*
कविता वद काय कारंजी-पुरी
म्हणुनी करुनी तुज देऊ करी
*
कविता मकरंद फुलपुरता
अली तू बन मी करितो कविता
*
कविता सखया न गुलाब कळी
तुज की मृदू गंध तिचा कवळी
*
कविता कवी -चंदन- धूप- बली
बन मारुत तू कविता उकली
…..
आणि आता ही दुसरी कविता केली आहे कवियत्री संजीवनी मराठे यांनी. कविता स्फुरते कशी म्हणून सुंदर कविता त्यांनी केली आहे.
*
कशी अचानक जनी प्रकटते मनांतली उर्वशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
*
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी
नजरेपुढतीं ठुमकत येती रुपवती कामिनी
*
हंसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी
स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी
*
त्याच्या नादे करु पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
*
हे स्वरसुंदर जीवनमंदिर कुणी कसे उभविले
मी न कुणाला दावायची शिलालेख आंतले
*
समयीमधली ज्योत अहर्निश भावभरे तेवते
तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आलापिते
*
कशी नाचते कीर्तनरंगी हरपुन जाते कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी.
तेंव्हा आनंद घ्या या दोन्ही कवितांचा आजच्या कविता दिनी ……
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈