श्री प्रसाद जोग
इंद्रधनुष्य
☆ चिमणी वाचवा … ☆ श्री प्रसाद जोग ☆
जगभरात २० मार्च हा दिवस ‘ चिमणी वाचवा दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो.
चिमणी आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग. अगदी जन्माला आल्यावर आई आपल्याला भरवते तेंव्हा सुद्धा ती एक घास चिऊचा म्हणून देते आणि त्या चिमणीची आठवण काढत आपण जेवतो. जरा मोठं झालं की झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांग हा लहान मुलांचा लकडा असतो ,तेंव्हा सुद्धा चिऊताई हजर असायची आणि मग कावळेदादा येऊन म्हणायचा “चिऊताई चिऊताई दार उघड” , पुढची गोष्ट आपण साऱ्यांनी लहानपणापासून ऐकली आहेच.
जंगले निर्माण करण्यामध्ये चिमण्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी खाल्लेल्या वेगवेगळ्या बिया त्याच्या विष्ठेमधून पुन्हा जमिनीत रुजतात आणि त्यातून वृक्ष निर्माण होत असतात.मानवाने शहरीकरण झपाट्याने वाढवले त्या मुळे जंगले नष्ट होऊ लागली आणि आहे त्या शेतीत जादा पीक घेण्याच्या हव्यासापायी कीटक नाशकांचा वापर अवाच्या सव्वा वाढला आणि तोच या चिमण्यांच्या जीवावर देखील उठला. कीटक नाशके फवारल्यावर ते धान्य खाऊन चिमण्या मरून जाऊ लागल्या.रोज अंगणात बागडणाऱ्या चिमण्या हळू हळू दिसेनाशा होऊ लागल्या आहेत. चिमण्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,याच चिमण्या पिकावरील कीड/ आळ्या खाऊन टाकतात व शेतातले पीक वाचवतात.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल देखील ढासळायला लागला आहे,उष्णता वाढायला लागली आहे ,ही उष्णता ही गर्मी चिमण्यांना असह्य होते, त्यावर इलाज म्हणजे पसरट मातीच्या भांडयांमधे थोडे पाणी भरून ठेवा मग पहा भर दुपारी चिमण्या त्या मध्ये डुंबतील, पाणी पितील,जवळ ठेवलेले अन्नाचे कण खाऊन तृप्त होतील, तेंव्हा आपल्याला मिळणारे समाधान लाखमोलाचे असेल. अशी हजारो वर्षे मानवाला सोबत करणाऱ्या या चिमण्यांना वाचवायची जबाबदारी आपलीच आहे .त्या साठी फार काही करायची सुद्धा गरज नाही.
अशी ही चिमणी सकाळ झाली की किलबिलाट करून आपल्याला जागे करत असते.तिच्यासाठी जर शक्य असेल तर बागेमध्ये पुठ्ठयाचे किंवा लाकडी घरटे टांगून ठेवा. मोठ्या शहरामध्ये रहात असाल तर फ्लॅटच्या गॅलरीमध्ये रोजच्यारोज थाळीमध्ये पाणी ठेवा अगदी चार दाणे जरी तिला खाऊ घातले तरी मला खात्री आहे सगळ्यांना मोठा आनंद होईल.
चिमणीचा आवाज
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈