सौ राधिका भांडारकर
काव्यानंद
☆ विसावा… – सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
☆☆☆☆☆
विसावा (रसग्रहण)
विसावा या शब्दाच्या उच्चारातच निवांतपणा जाणवतो. विसावा म्हणजे विश्रांती. अर्थात विश्रांती म्हणजे समाप्ती नव्हे, अंमळ थांबणं. “आता थोडं थांबूया” हा आदेश विसावा शब्द सहजपणे देतो. अधिक विस्तृतपणे सांगायचं तर विसावा म्हणजे एक ब्रेक, एक इंटरव्हल. असाही अर्थ होतो. मात्र विसावा घेण्याची पद्धत व्यक्तीसापेक्ष आहे. कोणी निवांतपणे, डोळे मिटून राहील, कुणी एखादी वामकुक्षी घेईल, कुणी सततची कामे थांबवून एखाद्या कलेत मन रमवेल. पण ही झाली छोटी विश्रांती. विसावा याचा आणखी पुढे जाऊन अर्थ शोधला तर विसावा म्हणजे रिटायरमेंट. निवृत्ती. आणि आयुष्याच्या उतरणीवर अथवा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर घ्यावासा वाटणारा विसावा. हाही व्यक्तीसापेक्षच असतो. पण कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची विसावा ही याच आशयाची सुरेख गझल नुकतीच वाचण्यात आली आणि त्यातले एकेक शेर किती अर्थपूर्ण आणि रसमय आहेत हे जाणवले.
☆ विसावा ☆
मिळतो मला तुझ्या रे नामात या विसावा
घेते जरा तुझ्या रे भजनात या विसावा
*
असते तुझ्या सख्या रे मी संगतीत जेव्हा
शांती मनास लाभे श्वासात या विसावा
*
भेटीत आपुल्या रे आहे अती जिव्हाळा
वृक्षा समान आहे किरणात या विसावा
*
गेले निघून गेले सोन्यापरी दिवस ते
आता तुझ्याच ठायी स्मरणात या विसावा
*
आधार घेत आहे पाहून मी रुपाला
मन शांत होत आहे प्रेमात या विसावा
*
– अरूणा मुल्हेरकर
ही संपूर्ण गझल वाचल्यानंतर प्रकर्षाने एक जाणवते ते कवयित्रीचं उतार वय. आयुष्य जगून झालेलं आहे, सुखदुःखाच्या पार पलीकडे मन गेलं आहे आणि आता मनात फक्त एकच आस उरलेली आहे आणि ती व्यक्त करताना मतल्या मध्ये त्या म्हणतात
मिळतो मला तुझ्या रे नामात या विसावा
घेते जरा तुझ्या रे भजनात या विसावा
कसं असतं, जीवन जगत असताना जीवनातली अनेक ध्येयं, स्वप्नं, जबाबदाऱ्या पार पाडत असताना भगवंताच्या आठवणींसाठी सुद्धा उसंत नसते. पण जसा काळ उलटतो, वय उलटते तशी आपसूकच माणसाला अध्यात्माची गोडी वाटू लागते. ईश्वराकडे मन धावतं, म्हणूनच कवयित्री म्हणतात,
आता देवा! मला तुझ्या नामस्मरणातच खरा विसावा वाटतो. तुझ्या भजनातच माझे मन खरोखरच रमते आणि निवांत होते.
असते तुझ्या सख्या रे संगतीत जेव्हा
शांती मनास लाभे श्वासात या विसावा
मनाने,पूजाअर्चा या विधी निमित्ताने जेव्हा जेव्हा मी तुझ्या संगतीत असते तेव्हा माझ्या मनाला शांती लाभते माझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या नामाच्या अस्तित्वाने मला विसावल्यासारखे वाटते
या शेरात सख्या हा शब्द थोडा विचार करायला लावतो. भगवंत सखाच असतो. त्यामुळे सख्या हे देवासाठी केलेले संबोधन नक्कीच आवडले, परंतु या दोन ओळी वाचताना आणि सख्या या शब्दाची फोड करताना मनात ओझरतं असंही येतं की या उतार वयात न जाणो कवयित्रीला जितका ईश्वराचा सहवास शांत करतो तितकाच जोडीदाराच्या आठवणीत रमण्यातही शांतता लाभते का? सख्या हे संबोधन त्यांनी जोडीदारासाठी योजलेले आहे का?
भेटीत आपुल्या रे आहे किती जिव्हाळा
वृक्षासमान आहे किरणात या विसावा
भेटी लागे जीवा लागलीसे आस याच भावाने कवयित्री सांगतात जसा वृक्षाच्या सावलीत विसावा मिळतो तसाच तुझ्या जिव्हाळापूर्वक स्मरण भेटीत भासणारी, जाणवणारी अदृश्य किरणे ही मला शांती देतात. या ओळी वाचताना जाणवते ती एक मनस्वी, ध्यानस्थ स्थिती. या स्थितीत संपूर्ण मन कुणा दैवी शक्तीच्या प्रभावाखाली स्थिर आहे.
गेले निघून गेले सोन्या परी दिवस ते
आता तुझ्याच ठायी स्मरणात या विसावा
आयुष्य तर सरलं. गेलेल्या आयुष्याबद्दल मी नक्कीच म्हणेन की अतिशय सुखा समाधानाचं, सुवर्णवत आयुष्य माझ्या वाटेला आले. त्याबद्दल मी तुझी आभारीच आहे पण आता मात्र माझं चित्त्त फक्त तुझ्याच ठायी एकवटू दे. तुझ्या नामस्मरणातला आनंद हाच माझा विसावा आहे.
हाही शेर वाचताना माझ्या मनात सहज येऊन गेले की कवयित्रीला याही ठिकाणी त्यांच्या जोडीदाराचीच आठवण होत आहे. सहजीवनातले वेचलेले अनंत सोनेरी क्षण त्यांना नक्कीच सुखावतात. निघून गेलेल्या त्या दिवसांसाठी त्यांच्या मनात खरोखरच तृप्तता आहे आणि आता केवळ जोडीदाराच्या सुखद स्मृतींत त्या विसावा शोधत आहेत का?
वास्तविक कवीच्या मनापर्यंत काव्य प्रवाहातून पोहोचणं हे तसं काहीसं अवघडच असतं. म्हणूनच ही गझल वाचताना भक्ती आणि प्रीती या दोन्ही किनाऱ्यांवर मी माझ्या अर्थ शोधणाऱ्या नावेला घेउन जात आहे.
आधार घेत आहे पाहून मी रुपाला
मन शांत होत आहे प्रेमात या विसावा
देवा! तुझे सुंदर ते ध्यान सुंदर ते रूप! तुझ्या राजस रूपाला पाहून माझे मन आपोआपच शांत होते. तुझ्या.अपार मायेतच मला ऊब जाणवते, स्थैर्य लाभते, मनोधैर्य मिळते.
याही शेरात कुठेतरी पुन्हा लपलेला प्रेम भाव जाणवतो.
पुष्कळ वेळा काव्य वाचताना काव्यात नसलेले किंवा अदृश्य असलेले शब्दही वाचकाच्या मनाजवळ हळूच येतात. या शेरात लिखित नसलेले शब्द जे मी वाचले ते असे असावेत,
“ तू तर आता या जगात नाहीस, शरीराने आपण अंतरलो आहोत पण सख्या रात्रंदिवस मी तुझी छबी न्याहाळते कधी चर्मचचक्षुंनी तर कधी अंतर्नेत्रांतून आणि तुझे माझ्यावर किती निस्सीम प्रेम होते या भावनेतच मला अगाध शांतता प्राप्त होते.
तसंही गझल हा एक संवादात्मक काव्य प्रकार आहे.आणि गझलेत विषयाचं बंधन नसतं आणि विषय असलाच तरी एकाच विषयावर वेगवेगळ्या भावरसातली गझलीयत असू शकते.
अशी ही श्लेषार्थी अरुणाताईंची सुंदर गझल. यात भक्तीरस आणि शृंगार रसाचीही उत्पत्ती जाणवते.
गझल म्हटलं म्हणजे ती शृंगारिकच असा समज आहे पण अनेक नवीन गझलकारांनी वेगवेगळ्या रसयुक्त गझलांची निर्मिती केलेलीच आहे. त्यामुळे भक्तीरसातली गझलही स्वीकृत आहे. नेमका हाच अनुभव अरुणाताईंची ही गझल वाचताना मला आला.
आनंदकंद या वृत्तातील आणि, गागालगा, लगागा गागालगा लगागा अशी लगावली असलेली ही गझल काटेकोरपणे नियमबद्ध अशीच आहे.
यातील नामात भजनात श्वासात किरणात स्मरणात हे काफिया खूप लयबद्ध आहेत. मतला आणि शेर वाचताना गझलेतील खयालत विलक्षण अर्थवेधी आहे. प्रत्येक शेरातला राबता सुस्पष्ट आहे आणि रसपूर्ण आहे.
थोडक्यात विसावा एक छान आणि परिपूर्ण, अर्थपूर्ण गझल असे मी म्हणेन.
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈