सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
‘ वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे ‘
माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसले की मन असे स्वैरपणे फिरत असते. तीन-चार वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरता तर येत नसे, पण या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येई. दिवसभराच्या उन्हाच्या काहिली नंतर येणारी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते. थंडी किंवा पावसाळ्यात या झुळूकेचे तितके महत्त्व नाही ,पण उन्हाळ्यात ही झुळूक खूपच छान वाटते! दु:खानंतर येणार सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!
सतत सुखाच्या झुल्यावर झुलणाऱ्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्यानंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला गार वाऱ्याच्या झुळूकीचा आनंद देतात!हीच झुळूक कधी आनंदाची असते,
कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही पण दुसऱ्या कुणा कडून तरी, अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र-मैत्रिणींकडून मिळते तेव्हा तो प्रेमाचा सुखद ओलावा ही त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळूक असते!
कधी कधी साध्या साध्या गोष्टीतूनही आपण आनंद घेतो. गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते, तेव्हा खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला’ हुश्श’ करायला लावते. कधी अशी झुळूक एखाद्या बातमी तून मिळते. अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळुकीसारखीच असते. माणसाचे आयुष्य सतत बदलत असते. कधी एकापाठोपाठ एक इतकी संकटे येतात की त्या सर्वांना कसे तोंड द्यावे कळतच नाही! पण अशावेळी अचानकपणे एखादी चांगली गोष्ट घडते की, त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते!
माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवऱ्याचा एक्सीडेंट झाला. जीव वाचला पण हॉस्पिटलमध्ये दोन महिने पडून राहावे लागले. दोन लहान मुली होत्या तिला. नवऱ्याचा व्यवसाय बंद पडलेला.. राहायला घर होते पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरीचा कॉल आला. ट्रेनिंग साठी एक महिना जावं लागणार होतं, मुलींना आपल्या नातेवाईकांजवळ सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली.आणि नोकरी कायमस्वरूपी झाली आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.
वादळ वाऱ्यात झाडं ,घरं, माणसं सारीच कोलमडतात.. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात असतेच असे नाही. पण ‘झुळूक’ ही सौम्य असते. ती मनाला शांती देते.
लहानपणी अशी झुळूक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळूकीसारखा वाटायचा! रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकं फुलकं पीस व्हायचं आणि वाऱ्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळूक अनुभवायला मिळायची!
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात ही झुळूक आपल्याला साथ देते. कधी कधी आपण संकटाच्या कल्पनेने ही टेन्शन घेतो. प्रत्यक्ष संकट राहत दूर ,पण आपलं मन मात्र जड झालेलं असतं! अचानक कोणीतरी सहाय्य करते , आणि संकट दूर होते. एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.
कोरोनाच्या काळात आपण अशाच कठीण परिस्थितीतून जात होतो. मन अस्थिर झालं होतं. जीविताची काळजी, भविष्याची काळजी दिसून येत होती. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! पण तेच कोरोनाचं संकट जसं दूर झालं, तशी मनामध्ये समाधानाची झुळूक येऊन गेली! काही काळातच रोगाचे उच्चाटन झालं आणि निसर्गाने हिरावून घेतलेले आपले स्वातंत्र्य पुन्हा आपल्याला मिळाले! ती ‘सुखाची झुळूक’ अशीच सौम्य आनंद देणारी होती. सोसाट्याचा वारा आणि वादळ माणसाला सोसत नाही, त्याचप्रमाणे संकटांचा माराही झेलताना माणसाला कठीण जाते! पण थोडंसं जरी सुख मिळालं तर ती ‘सुखाची झुळूक’ माणसाला आनंद देऊन जाते.
संकटाच्या काळावर मात करताना कुठून तरी आशाताई स्वर येतात, “दिस येतील, दिस जातील…” या गाण्याचे! कोणत्याही संकटाला कुठेतरी शेवट असतोच, जेव्हा एखादं वादळ परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधीतरी ते लयाला जाणारच असतं! ते वादळ जाऊन शांत झुळूक येणारच असते.पण तोपर्यंत त्या वादळाला धीराने, संयमाने तोंड देत वाट पहावी लागते ! ….
… तेव्हाच त्या वादळाचे झुळुकीत रूपांतर झालेले आपल्याला अनुभवायला मिळते !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈