सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ मळभ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
☆
आज मी या वृक्षतळी
अशी उदास बसलेली
मनी सवे भारलेल्या
तव प्रेमाच्या चाहुली
*
तुझ्या मिठीत सजलेल्या
किती सुरम्य सांजवेळा
कुंतली या मोगऱ्याचा
प्रीतगंध दरवळला
*
क्षण क्षण तो सुरंगी
चांदण्यात भिजलेला
राग रागिणी सुरांनी
धुंद असा नादावला
*
दाटले का तुझ्या मनी
मळभ रे संशयाचे
काय जाहले नकळे
दुभंगले नाते प्रीतीचे
*
पखरली वाट तुझी
कधीच मी आसवांनी
पाहते वाट अजुनी
येशील तू परतूनी
☆
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈