सौ राधिका भांडारकर
☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
खूप दिवसांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली होती. मथळा असा होता..
एका तरुण दांपत्याची आत्महत्या सविस्तर बातमीत लिहिले होते,
“हे दांपत्य तरुण आणि संगणक क्षेत्रात उच्च शिक्षित होते. दोघंही नामांकित कंपनीत उच्च पदाधिकारी होते. वर्षाचे भरभक्कम आर्थिक पॅकेज होते. मुंबईसारख्या शहरात उच्चस्थांच्या वस्तीत त्यांचा अद्ययावत, सुसज्ज असा ऐसपैस फ्लॅट होता. दोघांच्याही ब्रँडेड महागड्या गाड्या होत्या. ”
पोलीस तपास चालू आहे. आत्महत्येपूर्वी दोघांचीही सही असलेली त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात लिहिले होते,
“आमच्या आत्महत्येस फक्त आम्हीच जबाबदार आहोत. अल्पवयातच आम्ही जीवनात जे मिळवायचं ते सारं मिळवलं. आता पुढे काय हा प्रश्न आम्हाला सतत सतावायचा आणि या प्रश्नानेच आम्हाला खूप नैराश्य आले. असे वाटू लागले की जगण्यासाठी आता काही लक्ष्यच उरले नाही. मुले— बाळे —संसार या आमच्या जगण्याच्या संकल्पना होऊच शकत नाही. म्हणून आम्ही इथेच थांबायचं ठरवलं. जीवनच संपवून टाकायचं ठरवलं. या विचारापाशी आमचे अत्यंत आनंदाने एकमत झाले. म्हणून आमच्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. जगाचा निरोप घेताना आम्ही खूप आनंदात आहोत. ”
ही बातमी वाचून आजच्या तरुण पिढी विषयी, त्यांच्या मानसिकतेविषयी सखोलपणे विचार करायला लागण्यापूर्वी माझ्या मनात इतकेच आले, ” खरंच ऐकावे ते नवलच. ”
सुदर्शन नावाचा माझा एक जुनियर मित्र अनेक वर्षे मस्कतला होता. त्या दिवशी अचानक आमची एका कार्यक्रमात भेट झाली. मी त्याला विचारले, ” किती दिवस आहेस भारतात?”
तो म्हणाला, ” अगं मी आता भारतात परत आलोय. मी निवृत्त झालोय्. ”
“निवृत्त? तुझं निवृत्तीचं वय तरी झालं का?”
“नसेल. पण आता मला काम करायचं नाही. मला माझे साहित्यिक आणि इतर छंद जपायचे आहेत. ”
तशी हरकत काहीच नव्हती पण तरीही मी थोडी संभ्रमित झाले. मग तोच सांगू लागला,
“कसं असतं ना? मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि एका घड्याळाच्या दुकानात मी एक सुंदर घड्याळ पाहिले होते. खूप महागडे आणि त्यावेळी मला ते विकत घेणे परवडण्यासारखे नव्हतेच. पण मी ठरवले, आयुष्यात कधीतरी याच ब्रँडचं हे महागडे घड्याळ घ्यायचं. पैसे मिळवण्यासाठी मी दुबई, मस्कत येथे नोकऱ्या केल्या. बायको आणि मुले भारतातच होती. बायकोला बँकेत चांगला जॉब होता. आजही आहे. मी खूप पैसा कमावला आणि एक दिवस मी माझे घड्याळ घेण्याचे स्वप्नही पूर्ण केले. मी खूपच आनंदात होतो. स्वतःला यशस्वी समजत होतो आणि नंतर एकदमच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. एका बिझ्नेस कॉन्फरन्स मध्ये एका परदेशी व्यक्तीशी माझा छान परिचय झाला आणि गंमत म्हणजे त्याच्या मनगटावरच्या घड्याळाने मी फारच प्रभावित झालो. मी त्याला सहज किंमत विचारली आणि ती ऐकून मी पार उडालो. माझ्या स्वप्नातल्या घड्याळापेक्षा पाचपट ते महाग होते आणि तेव्हांच जाणीव झाली याला काहीही अर्थ नाही. या पैशाच्या पाठी धावण्यात आपलं आयुष्य वाया जात आहे. ही प्रलोभनं न संपणारी आहेत. त्याच दिवशी मी राजीनामा दिला आणि भारतात परतलो. आता फक्त स्वतःचे छंद जोपासायचे. ” असे सांगत त्याने सहज माझ्या हातावर टाळी दिली. माझा संभ्रम वाढलाच होता. खरं म्हणजे मला माहित होतं, हा माझा मित्र सुंदर कविता लिहितो, तो अजिबात कलंदर वृत्तीचा माणूस नाही, जबाबदार कुटुंब वत्सल आहे.. ”
तरीही? असो! ऐकावे ते नवलच.
माझी मुलगी अमेरिकेहून फोनवर बोलत होती. बोलता बोलता तिने मला सांगितले, ” मम्मी! अगं कृष्णाचे आणि शिवानी चे ब्रेकअप झाले. ”
“काय सांगतेस काय? किती छान दांपत्य होते ते! सदैव एकमेकांच्या प्रेमात असायचे. ”
माझ्या अमेरिकेच्या वास्तव्यात मी त्यांना अनेक वेळा भेटले होते. मला फार आवडायचे ते दोघे. ”
“अग! पण असं झालं काय?”
“फारसे डिटेल्स मला माहित नाहीत पण कुठल्यातरी एका क्षणी त्यांना वाटायला लागले की ती दोघं दोन भिन्न व्यक्ती आहेत आणि यापुढे एकत्र राहणं शक्य नाही. दोघांनी स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला आहे. They have just moved on. ”
मला इतकंच वाटत होतं की हे काही माझ्या संस्कृतीच्या पठडीतलं नक्कीच नाही.
पण यापुढे मुलीने आणखी एक धक्का दिला.
“आज त्यांच्या ब्रेकप पार्टीला आम्हाला जायचं आहे. ”
ब्रेकअप ही काय साजरी करण्याची बाब आहे का? मी पार चक्रावून गेले होते.
माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मला जायला जमलं नव्हतं म्हणून मी काही दिवसानंतर तिला भेटायला गेले. माझं मन खूप जड झालं होतं. कशी असेल माझी मैत्रीण? एकाकी पडली असेल. इतक्या वर्षांचा त्यांचा संसार! काय बोलायचं तिच्याशी? कसं सांत्वन करायचं तिचं?
मी तिच्याकडे गेले तेव्हा ती एकटीच घरात होती. तिनेच दार उघडलं.
“ये बैस. ” म्हणाली.
खूप सावरलेली वाटली. गप्पांच्या दरम्यान ती म्हणाली,
“अगं! दिनेश नेहमी म्हणायचा ‘ मला ना असा झोपेतच मृत्यू यावा. यातना, वेदना आजारपण काहीही नको. सकाळ व्हावी, तू चहासाठी मला उठवायला यावंस आणि मी उठत नाही म्हणून मला हलवावस आणि तेव्हाच तुला कळावं की मी आता हे जग सोडून गेलो आहे. ’ आणि तुला सांगते, अगदी तसंच घडलं. दिनूला जसा मृत्यू यावा वाटत होते तसाच त्याचा मृत्यू आला. किती भाग्यवान ना तो! त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे पण दिनेशच्या मनासारखे झाले म्हणून मला समाधानही वाटते. ” जीवनात कुणी कसा विचार करावा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?
आणि आता आणखी एक मजेदार किस्सा सांगते. तत्पूर्वी एकच सांगते की हा किस्सा वाचल्यानंतर केंद्रस्थानी असलेल्या त्या व्यक्तीविषयी आपण मुळीच गैरसमज करून घेणार नाही.
तेव्हा मी शाळेत होते. असेन आठवी नववीत. त्यावेळी काळ— काम —वेगाच्या गणितांनी मला अगदी बेजार केले होते. ते हौद, त्या तोट्या, ते पाणी नाहीतर भिंतीचे बांधकाम, कामगार, दिवस यांची गणितं मांडताना माझी दमछाक व्हायची. माझे वडीलच मला गणित शिकवायचे. खूप सुंदर पद्धतीने, सुलभ करून शिकवायचे. छान आकृत्या काढून समजावायचे.
एक दिवस असेच एक कठीण गणित मी महाप्रयत्नाने सोडवले. अगदी बरोबर उत्तरापर्यंत पोहोचले. तरीही वडील झटकन म्हणाले, ” चूक. शून्य गुण. मांडणी विस्कळीत..”
मला इतका राग आला त्यांचा! इतका वेळ झटापट करून मी गणिताचं बरोबर उत्तर मिळवलं आणि वडील म्हणतात, “चूक?” त्या क्षणी माझे भानच सुटले जणू! तीव्र क्रोधाचे भूत माझ्या मानगुटीवर बसले जणूं! आणि त्या तिरीमीरीत मी वडिलांच्या गालावर जोरदार थप्पडच मारली.
मंडळी! या क्षणी तुमच्या मनातला माझ्याविषयीचा उरला सुरला आदर पार संपुष्टात आला आहे हे मला जाणवतेय्. पण थांबा! नंतरचे ऐका. दुसऱ्याच क्षणी माझे मन अपार गोंधळले. हे काय केले मी?
पण वडील शांत होते. त्यांचे टपोरे, पाणीदार, तेजस्वी, मोठे डोळे माझ्यावर त्यांनी रोखले. मी पुटपुटत होते. “पप्पा! मी चुकले हो! मी पुन्हा नाही अशी वागणार. ”
“ थांब बाबी. ”
वडील म्हणत होते, ” तुझ्या रागाच्या निचऱ्यासाठी माझा गाल हे तुझ्यासाठी सहज उपलब्ध असलेलं एक माध्यम होतं फक्त. तू माझी अत्यंत लाडकी, चांगली, आणि हुशार मुलगी आहेस. या क्षणी मला तुझा अभिमान वाटतो आणि विश्वासही वाटतो. तुझ्या आयुष्यात तू कधीही तुझ्यावर अन्याय झाला तर सहन करणार नाहीस. बेटा! शुभास्ते पंथान:सन्तु।।”
आजही या प्रसंगाकडे मागे वळून बघताना माझे मन अनेक भावनांनी उचंबळून येते. मी कुठलंही समर्थन देऊच शकत नाही. आणि तुम्हालाही हे नवलाचं वाटलं तर त्यात काहीच नवल नाही.
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈