श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ त्रिवेणी संगम !! भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
दोन जानेवारी. स्मरण दिन !
शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !
बाळाने या जगात पाऊल ठेवताच एक जोरदार आरोळी ठोकली! त्या एवढ्याशा गोळ्याचा तो दमदार आवाज ऐकून डॉक्टर म्हणाले, ”लगता है कोई आर्मी अफसर जन्मा है… क्या दमदार आवाज पाई है लडकेने!” तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुत्रमुख पाहिलेल्या पुष्पलता म्हणाल्या, ”आर्मी अफसरही है… कॅप्टन जन्मेज सिंग साहब का बेटा जो है!” झारखंड मधील रांची जवळच्या नामकुम इथल्या एका प्रसुतिगृहातील १ फेब्रुवारी १९७८ची ही गोष्ट.
बाळाचे नामकरण त्रिवेणी सिंग झाले. वडिलांना सेनेच्या गणवेशात लहानपणापासून पाहिलेल्या त्रिवेणी सिंग च्या मनात आपणही असाच रूबाबदार गणवेश परिधान करून देशसेवा करावी अशी इच्छा निर्माण होणं साहजिकच होतं. उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले त्रिवेणी अभ्यासात सुरूवातीपासून अव्वल होते परंतू स्वभावाने एकदम लाजरे-बुजरे. कधी कुणाशी आवाज चढवून बोलणे नाही की कधी कुणावर हात उगारणे नाही. सणासुदीसाठी अंगावर चढवलेले नवेकोरे कपडे नात्यातल्या एका मुलाला आवडले म्हणून लगेच काढून त्याला देणारे आणि त्याची अपरी पॅन्ट घालून घरी येणारे त्रिवेणी!
त्रिवेणी मोठे झाले तसे वडिलांनी त्यांना मार्शल आर्ट शिकायला धाडले. यात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकून दाखवले. उंचेपुरे असलेले त्रिवेणी बॉडी-बिल्डींग करीत. ते पोहण्यात आणि धावण्यात ही तरबेज होते. एक लाजरेबुजरे लहान मूल आता जवान झाले होते.
कॅप्टन जन्मेज सिंग हे मूळचे पंजाबमधल्या पठाणकोटचे रहिवासी. घरी चाळीस एक एकर शेतजमीन होती. शेती करूनही देशसेवाच होते, अशी त्यांची धारणा. आपल्या एकुलत्या एक मुलाने शेतीत लक्ष घालावे, घरदार सांभाळावे अशी त्यांची इच्छा होती.
शिक्षणाच्या एक टप्प्यावर त्यांनी नौसेनेची परीक्षा दिली आणि अर्थातच निवडलेही गेले. प्रशिक्षणास जाण्याचा दिवस ठरला, गणवेश शिवून तयार होता, प्रवासाची सर्व तयारी झालेली होती.
जाण्याच्या आदल्या दिवशी त्रिवेणी यांच्या आई,पुष्पलता यांच्या मातोश्री घरी आल्या आणि त्यांनी त्रिवेणी यांना नौसेनेत जाण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी अनुनभवी, लहान असलेल्या त्रिवेणींनी घरच्यांच्या इच्छेचा मान राखला आणि पंजाब कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला… आता घरात जय जवान ऐवजी जय किसानचा नारा गुंजत होता!
एकेदिवशी त्रिवेणींनी वडिलांना फोन करून सांगितले की “पिताजी, मेरा डेहराडून के लिए रेल तिकट बुक कराईये! मैं आय.एम.ए. में सिलेक्ट हो गया हूँ!” खरं तर त्रिवेणी यांनी ते सैन्य अधिकारी भरतीची परीक्षा देत आहेत याची कल्पना दिली होती आणि हे ही सांगितले होते की इथे जागा खूप कमी असतात आणि अर्ज हजारो येतात, निवड होण्याची तशी शक्यता नाही! त्यामुळे जन्मेज सिंग साहेबांनी ही बाब फार गांभिर्याने घेतलेली नव्हती. या परीक्षेत त्रिवेणी टॉपर होते, कमावलेली देहयष्टी, मैदानावरचे कौशल्य यामुळे शारीरिक चाचणीत मागे पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. वळणाचे पाणी वळणावर गेले होते… त्रिवेणी आता जन्मदात्या जन्मेज सिंग साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकून सैन्याधिकारी बनणार होते आणि याचा जन्मेजसिंग साहेबांना अभिमानही वाटला! जन्माच्या प्रथम क्षणी डॉक्टरांनी केलेली भविष्यवाणी त्रिवेणीसिंगांनी प्रत्यक्षात उतरवलेली होती!
त्रिवेणी सिंग यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथील प्रशिक्षणात अत्यंत लक्षणीय कामगिरी बजावली, अनेक पदके मिळवली आणि बेस्ट कॅडेट हा सन्मानसुद्धा! जेवढे आव्हान मोठे तेवढी ते पार करण्याची जिद्द मोठी… ते बहिणीला म्हणाले होते…. ”मैं मुश्किलसे मुश्किल हालातों में अपने आप को परखना चाहता हूँ… मन, शरीर की सहनशक्ति के अंतिम छोर तक जाके देखना मुझे अच्छा लगता है.. दीदी!” आणि त्यांनी तसे करूनही दाखवले.
८ डिसेंबर,२००१ रोजी ५,जम्मू कश्मिर लाईट इन्फंट्री (जॅकलाय) मध्ये त्रिवेणी सिंग लेफ्टनंट म्हणून रूजू झाले आणि त्यांनी त्यावेळी झालेल्या अतिरेकीविरोधी धाडसी कारवायांमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावली. शेतात लपून गोळीबार करणाऱ्या अतिरेक्याच्या समोर धावत जाऊन, त्याचा पाठलाग करून त्याला यमसदनी धाडण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवला होता. युनीटमधील सहकारी त्रिवेणीसिंग यांना ‘टायगर’ म्हणून संबोधू लागले होते!
त्यांची हुशारी, सर्वांचे सहकार्य मिळवून काम करून घेण्याचे कसब पाहून त्यांना युनीटचे अॅड्ज्युटंट म्हणून कार्यभार मिळाला.
वर्ष २००३ संपण्यास काही दिवस शिल्लक होते. त्रिवेणीसिंग यांचे मूळ गाव पठाणकोट, जम्मू पासून फार तर शंभर किलोमीटर्सवर असेल. त्यात त्रिवेणीसिंग लग्नबंधनात अडकणार होते…. एंगेजमेंटही झाली होती. फेब्रुवारी २००४ मध्ये बार उडवायचे ठरले होते.
सतत कामामध्ये व्यग्र असलेल्या त्रिवेणीसिंग साहेबांना त्यांच्या वरिष्ठांनी नववर्ष घरी साजरे करण्यासाठी विशेष सुटी दिली आणि साहेब ३१ डिसेंबर २००३ ला घरी आले.. आपले कुटुंबिय, मित्र आणि वाग्दत्त वधू यांच्यासोबत छान पार्टी केली. पहाटे दोन वाजता आपल्या वाग्दत्त वधूला तिच्या एका नातेवाईकाकडे सोडून आले. “सुबह मुझे जल्दी जगाना, माँ! ड्यूटी जाना है!” असे आपल्या आईला बजावून ते झोपी गेले…. नव्या संसाराची साखरझोप ती!
२ जानेवारी,२००४. नववर्षाच्या स्वागतसमारंभांच्या धुंदीतून देश अजून जागा व्हायचा होता. सायंकाळचे पावणे-सात, सात वाजलेले असावेत. थंडी, धुकंही होतं नेहमीप्रमणे. आज जम्मू रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वैष्णोदेवीला जाणाऱ्या-येणाऱ्या सुमारे हजारभर यात्रेकरूंचा, देशभरातून कर्तव्यावर येणाऱ्या -जाणाऱ्या शेकडो सैनिकांचा आणि तिथल्या सर्वसामान्य जनतेचा या गर्दीत समावेश होता.
जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली!
– क्रमशः भाग पहिला
© संभाजी बबन गायके
पुणे
मो 9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈