सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ हे सासर ते माहेर…  ☆ सौ. वृंदा गंभीर

माझ्या चुलत भावाचं आत्ताच लग्न झालं. माझे काका काकू खूप साधे सरळ आहेत प्रेम, माया तर त्यांच्यात ठासून भरलेली आहे. कुणाला दुखवणं त्यांना कधीच जमलं नाही.

माझ्या काका काकूंना एकच मुलगा आहे. अभी त्याचं नाव. अभी दिसायला फार सुंदर आहे. उंचापुरा, गोरागोमटा, शांत व समजदार आहे. त्यांची परिस्थिती बेताची पण खाऊन पिऊन सुखी अशी आहे. त्रिकोणी कुटुंब, अगदी सगळ्यांनी कौतुक करावं असंच…

अभीचं शिक्षण पूर्ण झालं. काका ही रिटायर्ड झाले. आता अभीच्या लग्नाचे वेध लागले होते. स्थळ बघायला सुरवात केली…

काकूंच्या मनात सुने विषयी खूप स्वप्न होते. त्या नेहमी म्हणायच्या “मला सून नको, मुलगी हवी आहे. ती माझ्या घरची लक्ष्मी असणार आहे. मला तिचे खूप कोडकौतुक करायचे आहे, खूप सुखात समाधानात ठेवायचे आहे…. मिळेल, ना अशी मुलगी अभिला.” खूप काळजी करायची काकू. 

काकू अभिला सांगायची “ती गृहलक्ष्मी असेल. तिच्या आवडी निवडी जपायच्या. तिला कधी दुखवायचं नाही. प्रेमाने एकोप्याने राहायचं. एकदा मनं जुळली कि नातं घट्ट होतं, दोघांमधलं प्रेम वाढतं व संसार फुलायला लागतो.”

आम्हाला खूप भारी वाटायचे. काकूंचे विचार किती सुंदर आहेत‌ खरच काकू सूनेला खूप छान वागवणार अशी खात्री होती.

अभिला एक स्थळ आलं. आम्ही मुलगी बघायला गेलो. मुलगी बघताच पसंद पडली. आम्ही लगेच होकर सांगितला व घरी आलो. नंतर ते पाहुणे आले. बैठक पार पडली. काका काकू म्हणाले, “आम्हाला काहीच नको. देवाच्या कृपेने आम्ही सुखी आहोत. घरात कसलीच कमी नाही. हा, फक्त मुलीची कमी आहे, ती तेवढी द्या आम्हाला.” 

मग लग्न ठरलं. तारीख काढली. सगळे लग्नाच्या तयारीला लागले. जसजसे लग्न जवळ येत होते तसतसे काकूंचे स्वप्न वाढत होते‌. ‘आम्ही दोघी फिरायला जाणार, सर्व एकविचाराने करणार, गावात एक आदर्श सासुसून म्हणून वावरणार, सगळ्यांना असं वाटायला हवंय कि आम्ही मायलेकी आहोत.’ अभी पण खूप खुश होता. तोही जोडीदाराबद्दलची स्वप्नं रंगवत होता,,,

लग्नाचा दिवस उजडला. नवीन स्वप्नांनी सजलेला तो दिवस उत्साही व आनंदी होता. सगळे नटून थटून आनंदी दिसत होते. एकापेक्षा एक सुंदर दिसत होते. 

लग्न घटिका जवळ आली. ब्राम्हणाने सावधान म्हटले आणि काकूंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. लग्न सोहळा व्यवस्थित छान पार पडला. सगळं विधिवत झालं व वऱ्हाड परतीच्या वाटेने निघाले…

लक्ष्मीने पाहिलं पाऊल घरात टाकलं. खूप धूमधडक्यात स्वागत करण्यात आलं. लक्ष्मी पूजन झालं…

आणि जेवणं करून सगळे रात्रीच्या विश्रांतीसाठी गेले. काकूंच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळच्या आंघोळी देवदर्शनाला जायचं याची त्यांना काळजी. 

सकाळ झाली. सगळे उठले. नवरा नवरीच्या आंघोळी झाल्या. ते नाष्टा करून देवदर्शनाला गेले.

घरात पाहुणे खूप होते. तिन दिवस पूजा, गोंधळ वगैरे कार्यक्रम झाले. पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. उरले फक्त काका काकू, अभी आणि स्वप्नाली….

अभी आणि स्वप्नाली फिरायला गेले नाही, कारण अभिची रजा संपली होती. स्वप्नाली जास्त बोलत नव्हती. अभी बरोबर जेमतेम बोलणं होत होतं. अभिच्या आईने तिला विचारलं “तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना? अगं नवऱ्याचं मन जिंकण्याचे हेच दिवस असतात.”

पण तिला वेगळंच वाटतं होतं. काय कारण होतं माहित नाही, पण ती दोघं एकत्र आलेच नाही.

नवीन आहे म्हणून सगळे समजून घेत होते. तिला काम जास्त जमत नाही म्हणून सगळं काकू करुन घेत होत्या. त्या म्हणत “अजून नवीन आहे, शिकेल हळू हळू‌. माझीच मुलगी असती तर मी काय केलं असतं? आता ती माझीच आहे. मी नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल….”

एक दिवस अभिला मित्र चिडवत होते. अभी खूप रडला व स्वप्नाली कशी वागते ते त्याने मला सांगितलं. मी तिला ‘बाहेर फेरफटका मारून येऊ’ असं सांगितलं व तिला घेऊन गेले. तिला खूप समजून सांगितलं तेंव्हा कळलं कि असं वागायचं ते तिला माहेरून शिकवून पाठवलं होतं.

मग काकू तिची आई झाली व सगळं समजून सांगितलं तेंव्हा अभी स्वप्नाली एकत्र आले, त्यांच्यात प्रेम वाढू लागलं.

तिच्या माहेरून सगळ्यांचे सारखे फोन यायचे ‘कशी आहे, जेवणं केलं का, काय केलं होतं जेवायला, भाजी काय होती, काम कोण करतं, सासू कशी आहे, ती काही करते की नाही, की फक्त बसून रहाते….. तू जास्त काम करू नको, बसून तर खाते तुझी सासू, भरपूर धडधाकट आहे, करू दे तिलाच काम… तू तूझं आरामात रहायचं, नवऱ्या बरोबर फिरायला जायचं, हॉटेल मध्ये जेवायला जायचं, नवऱ्याला आपलंसं करायचं, सासूचे गाऱ्हाणे सांगायचे…. नवऱ्या समोर अगदी गोड वागायचं’ असं बरंच शिकवलं जायचं. एकाचा झाला की एकाचा फोन यायचाच. असाच दिवस निघून जायचा, पण काकू शांत होत्या. त्यांना फक्त मुलाचा संसार छान झालेला पहायचा होता. 

काकूंना कोणी विचारलं “सून कशी आहे, काम करते का नाही ?’तर त्या ‘हो’ म्हणायच्या, “सगळं काम करते, स्वयंपाक छान करते. मुलगी छान आहे.” वेळोवेळी समजून घेत होत्या,,,

अभीच्या सर्व लक्षात येत होतं. आई एकटीच सगळं करते, बायको काहीच करत नाही याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. काकू त्याला म्हणायच्या, “बाळा, बाई माणसाला काम चुकत नसतं. तिला काम करावंच लागतं. आणि बसून तरी काय करणार, मला पण थोडी हालचाल हवीच ना. बसून काय मास येणार का. शरीर पण चांगलं राहायला हवं ना” असं बोलून अभिला शांत करत.

हळूहळू घरात बदल जाणवू लागला, पण काकूंनी शांत रहाणं पसंत केलं होतं.

असेच काही महिने गेले. एकदा स्वप्नाली आजारी पडली तेंव्हा काकूंनी तीची खूप सेवा केली. ती बरी होते की नाही असं वाटतं होतं. काकूंनी नवस, उपवास केले, देवाला प्रार्थना केली, ‘माझी मुलगी सुखरूप घरी येऊ दे’ असं साकडं देवाकडे घातलं.

स्वप्नाली बरी झाली पण आता तिच्यात बदल झाला होता. तिला सासर आपलं वाटायला लागलं. आता हेच घर आपलं आहे असं वाटलं. ती आता माहेरी कुणाशी जास्त बोलत नाही कारण तिला माणसं कळायला लागली होती. मला तर असं वाटलं की देवाने मुद्दाम परीक्षा घेतली तिला सासरचे लोक कसे आहेत ते दाखवण्यासाठी. त्रास झाला पण तिला माणसांची पारख करता आली. आज ती तनमनाने सासरची झाली व शिकवणारे किती चुकीचं शिकवत होते ते तिच्या लक्षात आलं. आता सासूला सारखं “आई आई” करते, कुणी काय बोललं ते सगळं सांगते. 

काकू तिला म्हणते, “अग हे सगळं तुझंच तर आहे. मी जरी कष्ट करून मुलाला वाढवलं, नोकरीला लावलं ते पुढचं चांगलं होण्यासाठीच ना. तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुम्ही खूप नाव कमवावं, मोठं व्हावं म्हणूनच ना.”

तिला आता चांगलं वाईट, खरं खोटं कळायला लागलं होतं, म्हणून तिने स्वेच्छेने माहेर कमी केलं होतं. शेवटी आई ती आईचं असते, ती मुलाची असो वा मुलीची, ती फक्त मुलांचं सुख बघत असते, देवाजवळ मागत असते, हे स्वप्नालीला आता पटलं होतं.

पुढे स्वप्नालीच्या भावाचं लग्न झालं तिची वाहिनी छान शांत होती, पण जे लोक मुलीचा संसार होऊ देत नव्हते ते सुनेला कसं वागवणार होते. तिने थोडे दिवस सहन केलं व नंतर तिच्या भावाला घेऊन बाहेर पडली. आता तिचे आई वडील एकटेच राहतात. ना मुलीचं प्रेम ना मुलाचं प्रेम.

प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आपल्यालाच पडावे लागते हे विधिलिखित आहे. हे कालचक्र आहे. जे कराल ते भराल, जे पेरलं तेच उगवतं.

आता अभी व स्वप्नाली चा संसार सुखात चालू आहे. काकूला सूनेऐवजी मुलगी मिळाली आहे. अभिमान वाटतो मला काकूंचा, किती विचार पूर्वक निर्णय घेतात व वागतात त्या. एवढा संयम येतो कुठून त्यांच्याकडे. जर प्रत्येक स्त्रीने काकू सारखा विचार केला तर घरं, कुटुंबं एकत्र राहतील व प्रगती होत राहील,,,

विचार बदला समाज बदलेल. स्त्रीचं मन ओळखायला शिका. आज स्त्रीच स्त्रीची वैरी आहे, मुलगी काय न सून काय, स्त्रीच आहे. तो आपलाच अंश आहे हे लक्षात असू द्या म्हणजे प्रत्येक संसार सुखाचा होईल, वृद्धाश्रम बंद होतील, घटस्फोट होणारच नाहीत. तेंव्हा विचार करा व आचरणात आणा. विजय आपलाच आहे…

“नारी शक्ती जिंदाबाद “

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments