श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ मी मतदार — भाग – ७ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
मी गोंधळलेला.
मी मत देतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांनी आणि त्याच्या वक्तव्याने भारावलेला असतो म्हणून.
मी जेव्हा एखाद्या पक्षाला मत देतो तेव्हा त्या पक्षाच्या वैचारिक आणि राजकीय भूमिकेला माझे विचार अनुरुप असतात म्हणून.
परंतु निवडून आल्यानंतर पुढील काळात वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी किंवा तात्पुरत्या काळासाठी का होईना त्या काळाची गरज म्हणून स्वतःच्या अथवा पक्षाच्या पूर्वी जाहीर केलेल्या भूमिकांच्या संपूर्ण विरोधी भूमिकेत शिरतो. तेव्हा मतदार म्हणून मी गोंधळून जातो. या माणसाला मी मत दिले ते योग्य की अयोग्य याबाबत मीच निश्चित काही माझ्या मनाशी ठरवू शकत नाही. अशा परिस्थितीत काय व्हायला पाहिजे?
पक्षांतर बंदी कायद्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही असे दिसून येते. त्या कायद्यातील पळवटांचा यथेच्छ गैरवापर होत असतो असे दिसते. मला असे वाटते जर एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली असेल तर त्या पक्षाच्या विरोधी भूमिका असलेल्या पक्षाशी हात मिळवणी करायची असेल तर त्याने राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे आवश्यक आहे. अशी कायद्यामध्ये तरतूदच हवी. मग जरी सगळेच्या सगळे निवडून आलेले व्यक्ती दुसऱ्या पक्षात जाणार असतील तरी त्या सगळ्यांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडून यावे. जर पुन्हा निवडून यायचे नसेल तर ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्याच पक्षामध्ये पुढील निवडणूक होईपर्यंत त्याने असले पाहिजे. अपक्ष आमदाराने सुद्धा जेव्हा सभागृहामध्ये सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाशी हात मिळवणी केली असेल तर पूर्ण पाच वर्षे त्याच पक्षाबरोबर राहावे. अन्यथा त्यानेही राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे. आपली नवी भूमिका मतदारांना पुन्हा समजावून सांगून त्यांची मते मिळवावीत.
एखादी व्यक्ती बहुमताने निवडून आली असेल तर क्वचित १५ टक्के मते मिळवून सुद्धा निवडून आली असेल. आठ दहा उमेदवारांची यादी ज्यावेळेला असेल त्यावेळेला काही डमी उमेदवार मुद्दाम मते खाण्यासाठी उभे केलेले असतात हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. साधारण दोन माणसांच्यातच लढत होणे आवश्यक आहे. अनेक माणसांच्यात लढत होत असेल तर ती निवडणूक दोन वेळेला घ्यावी. पहिल्या निवडणुकीत त्या उमेदवारांना जी मते पडतील त्यापैकी पहिल्या दोन मतसंख्येतील क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी म्हणजे जरी ६०% मतदान होत असेल तरी किमान त्यातल्या तरी ५० टक्के पेक्षा जास्त लोकांनी निवडून दिलेला उमेदवार हाच बहुमताने निवडून आलेला उमेदवार म्हणण्यास तरी हरकत नाही.
असे होत नसेल तर माझे मत हे योग्य माणसाला दिले असे होणार नाही. मग मी मतदान करावे का न करावे? मतदानावरचा हक्क सोडावा का? पण का सोडावा?
काहीच कळत नाही.
मी पूर्णपणे गोंधळलेला
आणि कन्फ्यूज्ड (?)
© श्री सुनील देशपांडे
नाशिक मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈