सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मुक्तायन (कविता व रसग्रहण)” – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री – लेखिका : सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : मुक्तायन (कविता व रसग्रहण)

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री

लेखिका : सौ. ज्योत्स्ना तानवडे

प्रकाशक : शॉपीझेन

प्रकाशन तारीख : ०४/०४/२०२४

किंमत : रु १८४. 

पृष्ठे : १२५

एक आगळे वेगळे पुस्तक नुकतेच वाचनात आले. पुस्तकाचे शीर्षक आहे मुक्तायन या पुस्तकाद्वारे कविता आणि कवितांचे केलेले रसग्रहण वाचकांना वाचायला मिळते. मुक्तायन या पुस्तकात सुप्रसिद्ध कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या १५ कविता आहेत आणि या पंधराही कवितांचं, सिद्धहस्त कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांनी उत्कृष्ट पद्धतीने रसग्रहण केलेले आहे. हा एक दुग्ध शर्करा योगच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण डॉ. निशिकांत श्रोत्री यांचे काव्य आणि काव्याचा रसास्वाद घेणाऱ्या जाणकार रसिक ज्योत्स्नाताई तानवडे.

डॉ. निशिकांत श्रोत्री

पुस्तक अतिशय वाचनीय आहे. मुळात रसग्रहण हा एक व्याकरणप्रणित असा साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. तसेच कवी आणि वाचक या मधला एक दुवा आहे. रसग्रहणामुळे काव्याचे अंतरंग उलगडले जाते. शब्दा शब्दांचे अर्थ, त्यातले काव्यात्मक पदर आणि सौंदर्य स्थळे यांची उकल केली जाते त्यामुळे अर्थातच काव्य वाचताना वाचकाला एक दिशा मिळते. जे कळले नाही असे वाटते त्यापाशी तो अगदी सहजपणे जाऊन पोहोचतो. एखाद्या बंद पेटीतला अलंकार उघडून दाखवावा आणि तो पाहताच नेत्रांचे पारणे फिटावे तसेच रसग्रहणाने काव्याच्या बाबतीत जाणवते आणि मुक्तायन वाचताना नेमका हाच अनुभव येतो.

सौ. ज्योत्स्नाताई तानवडे

यातल्या १५ही  कविता मुक्तछंदातल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या अप्रकाशित आहेत. यात वेगवेगळ्या विषयांवर अतिशय मार्मिकपणे भाष्य केलेले आहे. ते कधी हळुवार असेल, कधी थेट, सडेतोड असेल, कधी उद्विग्नतेत केलेले असेल, उपहासात्मक असेल, राग, दुःख ,चीड, विद्रोहातून केलेले असेल पण प्रत्येक वेळी वाचकाच्या मनाला भिडणारेच आहे. आणि या सर्व रसमयतेची  नस ज्योत्स्नाताईंनी रसग्रहण करताना अचूक पकडली आहे. त्यामुळे कधी कधी वाचकाला प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असाही अनुभव येतो.

या संग्रहातील पहिलीच कविता…. ‘ मला माफ करशील का?’

यात कवीचं अत्यंत संवेदनशील आणि प्रामाणिक मन दिसतं

सुखदुःखाच्या सारीपटावर आणि यशापयाशाच्या हिंदोळ्यावर 

आयुष्याच्या प्रत्येक सोप्या अवघड वळणावर 

सदैव मला साथ देणाऱ्या प्रिय कविते 

पुन्हा माझे बोट धरशील का ?

कवीचं शल्यग्रस्त, गहिवरलेलं मन शब्दांतून जाणवतं आणि ज्योत्स्नाताईंच्या  रसग्रहण शैलीतून कवीच्या  मनातला संवाद वाचकाला जणूं ऐकू येतो. 

कवींच्या या ओळीवर त्या म्हणतात,” कवितेचे मन खूप मोठे आहे त्यामुळेच ती आपल्या हाकेला साद देईल याची कवीला खात्री आहे.”

मुक्तायन मधल्या प्रत्येक कवितेच्या गाभ्यापर्यंत वाचकाला पोहोचवण्याचे अत्यंत कौशल्याचे काम ज्योत्स्नाताईंनी त्यांच्या प्रवाही रसग्रहणातून सक्षमपणे  केलेले आहे. 

अब्रु ही कविता मनाला घोर चटका लावून जाते.

यात जगाला डिपार्टमेंटल स्टोअरची उपमा दिली आहे आणि यात एक अत्याचारीत  स्त्री केविलवाणे पणाने आक्रोश करत आहे. ती शेवटच्या चरणात विचारते,

“तुमच्या या स्टोर मध्ये अब्रू  विकत मिळेल का?

पाषाणालाही पाझर फुटावा असाच हा प्रश्न आणि या कवितेतलं जबरदस्त रूपक ज्योत्स्नाताईंंनी  अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवले आहे.

अडगळीची खोली ही एक अशीच रूपकात्मक कविता.

सैरभैर झालेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी.

आयुष्यभर साठवलेल्या मायेच्या वासनांच्या आणि दुस्वासाच्या 

षड्रिपूंच्या बंधनात कसं शोधू मी कसं शोधू

सांगेल का कोणी मला?

हा काव्यातला प्रश्न जीवनातला एक सखोल आणि गंभीर अर्थ घेऊनच अवतरतो.

अडगळीची खोली आणि मन यातले रुपकात्मक साद्धर्म्य रसग्रहणातून सुरेख मांडले आहे,

वात्सल्याने माखलेलं आईचं मन आणि तिने आपल्या बाळासाठी गायलेली अंगाई

एक तरल हळुवार अनुभव देते.

कलंदर या काव्यातल्या  स्वतःच्या मस्तीत जगणाऱ्या व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी सत्य जाणवते आणि तो म्हणतो,

तोंडात ना श्रीखंड ना बासुंदी ना भेळ नुसताच चमचा चघळतोय सोन्याचा ..

या काव्यातला भोगवाद आणि सौख्य यातला विरोधाभास ज्योत्स्नाताईंनी त्यांच्या काव्यसग्रहणातून नेमकेपणाने  मांडला आहे.

अजून मी आहे, 

संधी प्रकाश 

फिनिक्स 

नजर 

गुंता 

कृतघ्न 

टाकीचे घाव 

मन कसं सुखावून गेलं अशा एकाहून एक वेगवेगळ्या वळणांच्या, भावनांच्या, विषयांच्या अप्रतिम काव्यरचना! अगदी राजकपूरसारख्या अभिनेत्यावरही केलेलं सुरेख काव्य मुक्तायन मध्ये वाचायला मिळतं.

संसाराच्या रंगपटावर ही शेवटची कविता.

ही कविता वाचताना मला, जग ही एक रंगभूमी असे म्हणणाऱ्या शेक्सपियरचीच आठवण झाली. या कवितेतले अध्यात्मिक तत्व, भाव कवीने अगदी सहजपणे आणि परिणामकारक शब्दातून जाणवून दिला आहे.

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही 

किती काळचा नवा प्रवेश 

संसाराच्या रंगपटावर

घेऊन येई नाना वेश 

या संपूर्ण काव्यातलं मर्म ज्योत्स्नाताईंनी अत्यंत समर्थपणे  उलगडलेलं आहे. काव्य आणि रसग्रहण दोन्ही अप्रतिम. तोलामोलाच.

मुक्तायन या रसग्रहणात्मक काव्यसंग्रहाचे वाचन करताना एक लक्षात येते की यातून फक्त काव्याचा आनंद मिळतो असे नाही तर काव्याच्या आत्म्यापर्यंत वाचक खेचला जातो. प्रत्येक काव्यातली रूपके, अलंकार, प्रास विषय, विचार!काव्यकारणे याचाही एक शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो,  नुसतच वाचलं, काही काळ रेंगाळलं आणि विरून गेलं असं न होता रसग्रहणामुळे काव्य, मनात एक पक्की आकृती बांधून ठेवतं. ज्यातून ज्ञानार्जनाचा आनंद मिळतो आणि तो दीर्घकाळ राहतो.

असे रसग्रहणात्मक काव्यसंग्रह अधिकाधिक प्रमाणात प्रसिद्ध व्हावेत.ज्यायोगे काव्यप्रेमींचा शास्त्रशुद्ध काव्याभास होऊ शकतो. या कारणासाठी मी मुक्तायनचे प्रकाशक शॉपीझेन यांचे मन:पूर्वक अभिनंदन करते. आभारही मानते.

डॉ. निशिकांत श्रोत्री आणि सौ ज्योत्स्ना तानवडे यांनी संयुक्तरित्या केलेल्या या महान, स्तुत्य उपक्रमाला माझा मनापासून मानाचा मुजरा !

मुक्तायन वाचल्यानंतर वाचक नक्कीच त्यांच्या ऋणातच राहतील.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ ही खूप बोलके आहे. आकड्यांची सरस्वती, वर्णमालेतील विखुरलेली अक्षरे आणि प्राजक्त फुलांचा सडा…. सरस्वती ही विद्येची देवता. तिच्या आशीर्वादाने गुंफता आलेली ही अनमोल सुगंधी शब्द फुले !  सारेच कसे छान आणि छानच…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments