श्री सुनील शिरवाडकर
☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
लहानपणीची गोष्ट.घरच्यांसोबत दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाणं व्हायचं.मंदिराच्या बाहेर प्रशस्त फुटपाथ होता.त्या फुटपाथवर एक दत्ताचं चित्र काढलेलं असायचं. रंगीत खडुंनी रंगवलेल्या त्या चित्रावर असंख्य नोटा.. नाणी असायच्या. आणि त्यांची राखण करत एक काळासावळा मुलगा बसलेला असायचा. प्रत्येक गुरुवारी चित्र असायचं दत्ताचचं.. पण त्यातील रंगसंगती बदललेली असायची. त्यामुळे नेहमी ते नवीनच वाटायचं.
मला एक खुप उत्सुकता होती. ते चित्र काढताना बघायची.मग एकदा मी सकाळी लवकरच त्या मंदिरात गेलो.बाहेर फुटपाथवर तोच तो काळा सावळा मुलगा उभा होता. शर्टची बटणं काढत होता. त्याने शर्ट काढला. तो हातात धरला.. आणि फुटपाथ झटकायला सुरुवात केली. त्याच्या द्रुष्टीने फुटपाथ एकदम क्लीन झाला.. मग जवळच्या पिशवीतुन त्यानं कोळसा काढला.
त्या कोळश्यानं त्यानं एक चौकोनी आऊटलाईन काढली.. चित्राच्या आकाराची.मग निरनिराळ्या रंगांचे खडू घेऊन त्यांचं चित्र काढणं सुरु झालं.कधी कुठं चुकलं की सरळ त्या भागावर थुंकायचा… आणि तो भाग दुरुस्त करायचा.त्याबद्दल त्याला काहीच वाटायचं नाही.
चित्र काढुन झाल्यावर त्यानं खिशातुन काही नोटा काढल्या.त्या दत्ताच्या चित्रावर ठेवल्या.काही नाणी विखरुन ठेवली.त्याच्या द्रुष्टीने सगळं चित्र पुर्ण झालं होतं.आता तो दिवसभर त्या चित्राशेजारी बसुन लोकांची वाट पहाणार होता.
नंतर मला त्या चित्रकार मुलाबद्दल बरीच माहिती मिळाली.दत्तु त्यांचं नाव.तो जसा गुरुवारी दत्ताचं चित्र काढतो..तसाच शुक्रवारी देवीच्या मंदिरासमोर देवीचं चित्र काढतो.. सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर चित्र काढतो.त्याचा बापही पुर्वी मंदिराबाहेर बसायचा.देवादिकांची चित्रे.. पुस्तके विकायचा.लहानगा दत्तु बापाजवळ बसलेला असायचा.मग बाप त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगे.एकदा कधीतरी पुस्तकात बघून दत्तुनं चित्र काढलं..तिथेच.. रस्त्यावर.एवढ्याश्या मुलानं काढलेलं ते चित्र बघुन चार लोकांनी त्यावर पैसे टाकले.आणि मग त्याला तो नादच लागला.
कुठलंही कलेचं शिक्षण न घेतलेले हे कलाकार.त्यांच्यात उपजतच हा एक सुप्त गुण असतो.कितीतरी कलाकार असतात असे.अगदी डोंबाऱ्याचे खेळ करणारे पहा.उंचावर दोरी बांधलेली असते.त्यावरुन तोल सावरत जाणं सोपं तर नक्कीच नसतं.हातात आडव्या धरलेल्या काठीने ते शरीराचा तोल सावरत जीवघेणा खेळ करत असतात.
काही जणांकडे एक अगदी छोटी लोखंडी रिंग असते.एका बाजुने त्यात घुसायचे.. आणि दुसर्या बाजुनं बाहेर यायचं.शरीराचं अगदी छोटं मुटकुळं करुन हा खेळ करताना किती कसरत करावी लागत असेल.
रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारा वासुदेव हाही खरंतर कलावंतच.मी एकदा अश्याच एका वासुदेवाला तयार होताना पाहिलंय.पहाटे साडेचार वाजताच तो उठला होता. स्नान करुन शुचिर्भूत झाला. अगदी छोटंसं घर होतं त्याचं.लाकडी फडताळातुन त्यानं अंगरखा काढला.हा अंगरखा म्हणजे एक बाराबंदीच होती. धोतर नेसलेलं होतंच. त्यावर तो बाराबंदीच सारखा अंगरखा चढवला.एका बाजुला असलेल्या नाड्या खेचुन तो घट्ट बांधला.
एका पिशवीतुन काही माळा काढल्या. त्यात कवड्यांची माळ होती.. एक मोठ्या टपोर्या मोत्यांची माळ होती.. पिवळ्या मण्यांचे सर होते. ते परिधान केले. मग मेकअप. कपाटातुन काढलेल्या झोळीत एक छोटा आरसा होता. त्यात बघुन वासुदेवानं कपाळावर सुरेख गंध रेखलं. त्या उभ्या गंधाच्या मधोमध बुक्क्याचा टिळा काढला. हातात चिपळ्या घेतल्या.. आणि दान पावलं..दान पावलं..म्हणत पहाटेच्या सुमारास बाहेर पडला.
बहुरुपी हाही कलावंतच.पूर्णपणे पोलिसाच्या गणवेशात तो दुकानात येऊन उभा रहायचा.दारात पोलिस आल्यावर जरा दचकायला व्हायचे.त्याच्या हातात वही पेन.
“चला निघा दुकानातुन.. तुमच्या नावाचं वॉरंट आणलंय”
असं एकदम दरडावून बोलायचं.सुरुवातीला खरंच घाबरून जायचो.. हे काय आपल्यामगे लागलंय म्हणून भीती वाटायची. पण मग लक्षात यायचं.. अरे हा तर बहुरुपी. जराशी हुज्जत घालुन दहा वीस रुपये मग त्याला द्यायचो.
आणि तो त्याचा अधिकार असायचा.. असं आत्ता वाटतं.हातावर पोट असणारी ही माणसं.वर्षातले आठ महिने शेती करणं..ती नसेल तर कोणाच्या तरी शेतावर राबणं.. अगदी काहीच नाही तर बिगारी काम करणं. आणि हे करत आपली कला दाखवत चार पैसे मागणं हेच यांचं आयुष्य.
याचना करणे म्हणजे भीक मागणे. देवळाबाहेर बसुन.. हात पसरुन जे मिळेल त्यात भागवणारे वेगळे. त्यांना भिकारी म्हणणं एकवेळ ठीक.. पण हे भिकारी नसतात. ते लोकांपुढे हात पसरतात..पण त्याआधी ते आपली कोणती तरी कला सादर करतात. म्हणुनच ते असतात.. ‘ कलाकार.’
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈