डाॅ. व्यंकटेश जंबगी
विविधा
☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆
वसंत, किती वसंत येऊन गेले जीवनात रमून जातो आपण आठवणीत किती सांगू माझ्या वसंताचे ऋण फुलवितो जीवन मोगर्यासमान आठवती बालपणीची गाणी….
“सुखावतो मधुमास हा…”
“आला वसंत येथे मज ठाऊकेच नाही…”
“आला वसंत ऋतू आला….”
“कुहू कुहू बोले कोयलिया….”
“कोयलिया बोले अंबुवा डालपर ऋतू बसंतकी देत संदेसवा..”
वसंत, कोकिळ,आम्र आणि उन्हाळ्याची सुट्टी यांचं नातं आंब्यासारखं…आभ्यासाच्या साली काढून सुट्टीच्या गराचा आस्वाद घ्यायचा.. नव्या वर्गात जाण्यासाठी कोय पेरायची….
आठवतात का…..
काचाकवड्या,कैरम,गोट्या,पत्ते पोहणे.. सायकलवर काम फत्ते.
आमच्या चकार्या ज्येष्ठांच्या चकाट्या..पिट पिट पिटायच्या.
आठवतात का ते दिवस….
मामा,काका, मावशी, आत्या त्येकाची मुलं पाच…
भल्या मोठ्या मामाच्या वाड्यात फक्त धुडगूस आणि नाच….
आठवतात का, गाण्याच्या भेंड्या सारे आजोबा उडवायचे शेंड्या..
आठवतात का फणस, त्याच्या भाजलेल्या बीया, चुलीत हात घालून बाहेर सुखरूप काढणार्या आजीची किमया.
आठवतात का, मोठे झालो.. किती वसंत जीवनात आले ?
वसंतराव देशपांडे,वसंत देसाई, एकाचे गाणे एकाची सनई वपुतल्या वसंताने किमया केल्या आजी स्टाईलने कथा सांगितल्या.
वसंत बापटांच्या कविता अजून रेंगाळतात मनाच्या कोपऱ्यातून चांदोबा चंपक साथ सोडून गेले मोबाईलची “साथ” लावून गेले.
सगळे “वसंत” वाचनालयी राहिले गुपचुप कपाटात नंबराने थांबले.
आजी झाली कार्टून,काका झाले यूट्यूब, आजोबा झाले गुगल मामा आत्याची दांडी गुल.
असाच परवा “वसंत” भेटला.
“ओळखलस का ?” म्हणाला.
मी बालपणात घेऊन गेलो त्याला गळ्यात पडून ढसढसा रडला. मी म्हणालो “झालं काय?”
म्हणतो,”अजून शिशीरच आहे रे.
मामाचा वाडा ओस आहे.
आंब्याचे झाड उदास आहे.
कैर्यांच्या फोडी भेळेत खातात, माझ्या कैर्या तशाच राहतात.
आता मी “वसंत”नाही “समर”
आहे, फक्त पंचांगापुरता अमर आहे.कोकिळ गात नाही आता फक्त रडतो आहे,पंचम आता वाद्यांच्या गोंगाटात लुप्त आहे.”
माझेही डोळे पाणावले,म्हणालो “वसंता,जरा धीर धर.तुझ्याही जीवनात “वसंत”येईल..!”
“खरच?”डोळे पुसत वसंत म्हणाला..मी म्हणालो,”हां,हां शिशीर आया है,तो वसंतके आनेमें देर कहां?”
वसंत तोच आहे,सृष्टी बदलत नाही,माणसाची द्रुष्टी बदलते त्याला इलाज नाही!
© डॉ. व्यंकटेश जंबगी
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈