सुश्री नीता कुलकर्णी
☆ “तू आहेसच…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
ईश्वर – परमेश्वर – देव —भगवान…
तुझी असंख्य नांवे…. अनेक रूपे
तू नाहीस असं ठिकाणच नाही …. चराचरात भरून राहिला आहेस तू…
हो तू आहेसच …. मी मानतेच तुला. ..
तुझी पूजा, नैवेद्य, आरती करत असते …. तुझी स्तोत्र.. मंत्र म्हणत असते … जप करते..
सप्तशतीचा पाठ करते…
आताशा एक जाणीव मात्र व्हायला लागली आहे की…
हे सगळे बाह्योपचार झाले रे…. … आणि इतके दिवस त्यातच रमले मी …. ..
पण आता मात्र….. सगुणातून निर्गुण भक्तीकडे वळावे असे वाटायला लागले आहे…
मनाला सगुण भक्तीची सवय आहे त्यामुळे ती सवय लगेच सुटणार नाही पण…..
…. खोलवर जाऊन अगदी मनापासून तुझ्या जवळ यावं असं वाटायला लागलेल आहे….
आता तुझ्याकडे एक विनम्र विनवणी आहे. …
मी जे वाचते जे म्हणते … त्यातले जे ज्ञान आहे जी शिकवण आहे जे तत्त्वज्ञान आहे…
…… रोजच्या जगण्यात ते माझ्या…. वाणीतून …. कृतीतून …. विचारातून …. वर्तनातून … अंतरंगातून
प्रगट होऊ दे….. तनामनातून पाझरू दे….. मगच ती तुझी खरी पूजा होईल. आणि मला माहित आहे..
तुलाही भक्तांकडून हेच अपेक्षित आहे….
प्रसाद म्हणून सद्गुरूंचा हात हातात असू दे त्यांची कृपा माझ्यावर राहू दे….
नुसतं शांत बसावं…
आत्मसमर्पण हा खूप मोठा मार्ग आहे.. कठीणही आहे…
पण आता चालायला सुरुवात करावी म्हणते……
चालताना अडखळायला, ठेचकळायला …. थोडं भरकटायलाही होईल ……पण सावधपणे सावकाशपणे चालत राहीन.. .. हळूहळू तो मार्ग ओळखीचा होईल……
चिंतन कशाचं करायचं याचाही अभ्यास करायचा आहे…
एक खरच मनापासून सांगू का? खूप काही नको आहे
आता राहिलेलं आयुष्य सहज सोपं करून जगायचं आहे….
देणारा हात … दुःख ओळखून ते बघू शकणारे डोळे …. सत्य ऐकणारे कान … निर्मळ मन …
आणि मधुर वाणी………
… तू आहेसच की वाट दाखवायला …,.. आणि तुझा हात हातात आहे हे केवढे मोठे भाग्य आहे ….
.. मग जमेलच……
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈