सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-1 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
पौषातली दुपार निरोप घ्यायच्या तयारीत होती. थंड वारा सुटला होता. धरणीधरची धाकटी मावशी आणि तिचे पती आले होते. धरणीधर- मुग्धा हे पती-पत्नी उतरत्या उन्हाची दुलई ओढून त्यांच्यासोबत गप्पा मारत होते.
“चहा कधी करणार?” धरणीधरने हातावर हात चोळत विचारलं,” काय काका! एक-एक कप गरम चहा मिळाला,तर रक्त गोठण्यापासून आपली सुटका होईल ना!”
मुग्धा हसतहसत उठून उभी राहिली.”जरा कुठे मावशींबरोबर बोलत होते,तर मध्येच…”
डॉ अमिताभ चौधुरी
“सॉरी मॅम, पण मोठमोठ्या लोकांचं बोलणं एका खेपेत थोडंच आटोपतं? बोलणी तर चालूच राहतात. आता हिंदुस्थान-पाकिस्तानच्या बोलण्यांचं ,वाटाघाटींचं बघा ना. चहा करून आण. मग गप्पांचा दुसरा एपिसोड चालू करू या.”
मुग्धा स्वयंपाकघरात गेली,तोच टेबलावरचा धरणीधरचा फोन वाजायला लागला.
मुग्धाने हाक मारली,”अहो, तुमचा फोन वाजतोय.”
“यावेळी कोणाचा फोन?” धरणीधरला खुर्ची सोडून उठावंच लागलं. नाव धरणीधर,पण मोबाईलचं ओझंपण त्याला पेलवत नाही. तो भार,तो पत्नीवरच सोपवतो.
“हॅल्लो!” पलीकडून आवाज आला. पण रस्त्यावरच्या कलकलाटाने ते शब्द स्वाहा केले.
“कोण बोलतंय?”
“अरे,धरणी. मी शंभुदयाल बोलतोय. ओळखलंस?” एक अस्पष्ट आवाज स्मृतीच्या सागरापलीकडून हलक्या हाताने टकटक करत होता.
“अरे यार! कसा आहेस? किती दिवसांनी! ”
“दिवस नाही.वर्षं म्हण.बस्स! अडतीस वर्षं नोकरी करून आता रिटायर झालोय. बसल्याबसल्या जुन्या मित्रांना फोन करतोय.”
“वा! पण माझा नंबर कसा मिळाला?”
“अरे,मोहनकडून मुरलीचा, मुरलीकडून मोतीलालचा..असं करत करत मिळाला.”
“काय म्हणतोयस? रिटायरमेंटनंतर मुक्काम कुठे?”
“परत आलो बनारसला. सर्वांहून सरस,आमची काशी-बनारस. जमुहरा बाजारात ढीगभर लोकांनी घरं बांधली.रिटायर होत गेले आणि तिथेच फॅक्टरीपासून लांब जमीन विकत घेऊन घरं बांधत गेले.तीन-चार एकर जमिनीत लोक घर बांधतात. तेवढ्या पैशात बनारसमध्ये कबुतरांच्या कॉलनीतलं एखादं खुराडंपण मिळणार नाही.”
“आणि मुलं? ती काय करतात?”
थोडा वेळ शंभुदयालचा आवाजच बंद झाला.
नंतर ” मला दोन मुलगे आहेत. दोघेही सेटल झालेत. मोठा बंगलुरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहे. धाकटा भोपाळच्या एका पॉलिक्लिनिकशी अटॅच्ड आहे.”
“वा,बच्चू! मला वाटतं,तू एकदा फोनवर बोलला होतास,मोठा मुलगा इंजिनिअर आणि धाकटा डॉक्टर. म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरतेय, म्हणायची.”
“तुझ्या मुलीचं लग्न झालं ना? ती ऑस्ट्रेलियात असते म्हणे.”
“हो.”
“आणि तुझा मुलगा टाटा सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये पीएचडी करतोय ना?”
“अरे! तू तर सीआयडीसारखी सगळी इन्फॉर्मेशन गोळा केलीयस.”
” हा हा! माझं काय? दिवसभर बसून असतो. प्रायमरीपासून कॉलेजपर्यंतच्या जुन्या मित्रांना – ज्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, त्यांना फोन करत राहतो. कोणाला तुझ्याविषयी विचारतो.मग तुझ्याकडून दुसर्या कोणाचीतरी माहिती काढीन. बस्स. इन्फॉर्मेशन कम्प्लिट.”
हायस्कूलमधल्या दोन मित्रांच्या गप्पा अशाच चालू राहिल्या.
“जगन्नाथ तुझा जिवलग मित्र होता. तो कसा आहे,ठाऊक आहे का तुला?” शंभुदयालने विचारलं,” काही वर्षांपूर्वी मालाची डिलिव्हरी घ्यायला आसनसोलला गेलो होतो, तेव्हा मला भेटला होता.”
“काय सांगू तुला? तो अगदी एकटा पडलाय आता,” धरणीचा आवाज उदास झाला,”मुलगी चेन्नईला नोकरी करते. आणि मुलगा भुवनेश्वरला. मला वाटतं,त्याचं शिक्षण अजून पुरं नाही झालं.”
“चांगलंच आहे की! पण एकटा पडलाय म्हणजे?”
” त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता. तेव्हा बिचारा मुंबईला टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि कुठे कुठे धावाधाव करत होता. पण कॅन्सर म्हणजे असला रोग ,साक्षात यमराजाशी गाठ. त्यानंतर कधी भेटला नाही तुला तो?”
“नाही. माझ्याकडे त्याचा नंबर नाही. तुझ्याकडे कधी येईन,तेव्हा त्याचा नंबर घेईन. आणि बोलेन त्याच्याशी.”
“नक्की ये. या म्हातारपणात बालपणीच्या गप्पा होतील.”
” बरोबर बोललास. काय सांगू? त्रेसष्ट वर्षांचा होता होता सहाशे तीस रोग लागले माझ्यामागे.”
” चल. नंतर गप्पा मारू या. शिवीगाळ करू या. भेटायला आलास,की चहा पाजीन आणि इरसाल बनारसी शिव्यांनी तुझं आदरातिथ्य करीन. आता मावशी आणि काका आले आहेत.”
“ठीक आहे. भेटू या कधीतरी.”
“नक्की ये. अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. पण एक फोन कर. नाहीतर तू यायचास आणि नेमकं त्याच वेळी आम्ही दोघं दहा मिनिटांसाठी बाहेर जायचो. ओ.के.”
फोन ठेवून धरणीधर मावशी-काकांकडे आला.
“पहिलीपासून आम्ही एका वर्गात होतो. हायस्कूलपर्यंत बरोबर होतो. मग दोघांचे सब्जेक्ट वेगवेगळे झाले. मी वेगळ्या कॉलेजमधून इंटर केलं.”
” पहिल्या इयत्तेतला मित्र! अरे वा!” मावशीचा चेहरा खुलला.
“हो. त्याच्याकडे हजार-बाराशे फोन नंबर आहेत,म्हणत होता. सगळ्यांना फोन करत असतो. काय बडबडतो देवाला ठाऊक! आमच्या जमान्यात वर्गात मेंढरांसारखी मुलं भरलेली असायची. पण सत्तर-ऐंशीपेक्षा जास्त थोडीच असणार! आणि हायस्कूलमध्ये पोहोचेपर्यंत त्यापैकी काही मुलं रिसर्च स्कॉलर बनली. मग उरली किती?….नंतर त्याच्या ऑफिसात किंवा आयआयटीमध्ये असून असून किती मित्र असणार! फार तर पन्नास -शंभर . का कोणास ठाऊक! तोंडाला येईल ,ते बडबडत होता.”
चहा आला. घोट घेताघेता धरणीधरचं स्मृतिमंथन चाललं होतं,” तसं तर,लहानपणीही थापा मारायची सवय होती त्याला. मला आठवतं, त्या दिवसांत सगळ्यांना शायरीची बाधा झाली होती. तर एक दिवस त्यानेपण स्वतःची शायरी ऐकवली,’बदल जाएं अगर माली, चमन होता नहीं खाली, बहारें फिर भी आती हैं,बहारें फिर भी आएंगी’ ”
“अरे,हे तर ‘बहारें फिर भी आती हैं’ या सिनेमातलं गाणं आहे!”
“बघा ना!”
“याआधी कधी बोलणं झालं होतं तुमचं?” आता काकांनाही मजा वाटत होती.
“हो. दोन-तीनदा त्यानेच फोन केला होता. पहिल्यांदा जवळजवळ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी. शेवटचा तीन-चार वर्षांपूर्वी. तेव्हा म्हणत होता,’आता रिटायर होणार,तेव्हा बनारसला येऊन जुन्या मित्रांना भेटू या.’ ”
” जुन्या मित्रांशी तुझं बोलणं होतं?” मावशीने हसतच विचारलं.
” कुठून होणार? हं. दोघं-तिघं जणं बाजारात वगैरे भेटतात,तेव्हा थोडं बोलणं होतं. नाहीतर कोणाला हार्ट प्रॉब्लेम,तर कोणाला डायबिटीस, कोणाकोणाला तर दोन्ही रोगांचं वरदान. आता शंभू बोललाय,येतो म्हणून, पण येतो की नाही,ते बघू या.”
आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं….
— (क्रमशः भाग पहिला )
मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी
मूळ हिंदी कथा : कांच की जन्नत
मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈