विविधा
☆ वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
(आजी आजोबा दिना निमित्त)
मानव जेव्हा जन्माला येतो ती त्याच्या जीवनातली पहिली अवस्था आणि किनाऱ्याला आणते ती वृद्धावस्था. ही अवस्था सर्व अवस्था पार करून आलेली असते, त्यामुळे ती परिपक्व असते, असू शकते, असलीच पाहिजे.
एकेक क्षण मोलाचा
विचार करीत मी निघालो ।
आयुष्य सार्थकी होण्या
घडवीत मी निघालो ।।
माणसाचे कळतेपण वाढीस लागते तेव्हा आपण काय करावयास पाहिजे याचा प्रामाणिक विचार करू शकतो, आणि आणि मग जसजसं वय वाढत जाईल, तसा अनुभव संपन्न होऊन मार्गदर्शन करण्याइतपत येतो आणि तसंच ते झालं ही पाहिजे.
जीवनाचा उत्तरकाळ
मार्ग दाखविला अनुभवांचा ।
त्यातून घडला जीव
सार्थकी तो त्या क्षणांचा ।।
आपल्याकडून अनुभव संपन्न आयुष्याने एखादा उभरता जीव हा योग्य मार्गी होऊन यशोदायी जीवन जगला पाहिजे.
आपल्या अनुभव संपन्नेतून उभरदायी आयुष्य घडतांना, योग्य मार्ग दाखविणं हे वृद्धावस्थेतील महत्त्वाचे कार्य आहे. आपण किनारा गाठलेला असतो आणि त्यांना गाठावयाचा असतो. त्यामुळे त्यांना योग्य मार्ग दाखविणं ही त्यांची गरज असते. ती गरज भागविणं हे वृद्धांचे कार्य आहे.
कोणतेही काम म्हणजे पूजा असते, म्हणून ती विश्वासानेच झाली पाहिजे. जीवनावश्यक वस्तू आपणास लागतात, त्या विकत घ्याव्या लागतात म्हणून आधी खर्च करण्यापूर्वी मिळवायला शिकविले पाहीजे.
आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचविण्यासाठी लिहावं लागत, म्हणून लिहिण्यापूर्वी आपले विचार हे सुविचार कसे असतील ह्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे.
आपण काय बोलावं, ते योग्य की अयोग्य? यासाठी अगोदर दुसऱ्याचे बोलणे ऐकावयास शिकले पाहिजे.
“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. ” ही म्हण आपणांस माहित आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत हार न स्विकारता प्रयत्नशील राहता आलं पाहिजे.
आपण जगतो ते कसं असलं पाहिजे, यासाठी मी एक गोष्ट सांगेन…
… समजा, मला कोणी २ रुपये दिले तर मी १ रुपयाचे काही खायला आणेन. ‘जगायचं म्हणून’ आणि दुसऱ्या रुपयाचं फुल आणेन ‘कसं जगावं?’ हे शिकवण्यासाठी.
आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर सर्वात बुद्धिमान म्हणून विचार करत असतो. तिचा उपयोग करता आला पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे की, मरण्या अगोदर जगावयास शिका.
चुका करणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. पण तीच चुक परत करू नका. चुक करतो तो माणूस, चुक सुधारतो तो देव माणूस, याचं ज्ञान दिलं पाहिजे.
“तारूण्य म्हणजे चुका,
प्रौढत्व म्हणजे लढा,
वृद्धत्व म्हणजे पश्चाताप. “
पण वृद्धत्व हा पश्चाताप व्हावा असं नको असेल तर…
… वृद्धावस्थेत मार्गदर्शक व्हा. जीवन आणि जीव घडवा आणि घडवित असतांना आपले शरीर स्वास्थ्य जर सांभाळले व पुरेसा आर्थिक स्तर स्वतःचा ठेवला तर वृद्धत्वाच्या समस्या येणार नाहीत आणि आल्या तरी त्या निवारता येतील.
आपल्या वर्तनानं ज्या गोष्टी शिकविल्या पाहिजेत, त्या म्हणजे “मान, दान आणि ज्ञान. “
मान देता आला पाहिजे, दान निरंतर केले पाहिजे आणि ज्ञान आपल्याकडे आहे ते दुसऱ्यास दिले पाहिजे.
हे सांभाळले तर वृद्धावस्था ही समस्या राहणार नाही आणि त्यामुळे तुम्ही किती जगलात? यापेक्षा कसे जगलात? याला जास्त महत्त्व असेल.
आयुष्यात अशा गोष्टी करू नका की, जेणेकरून झोपेचं कर्ज होईल आपल्यावर कारण त्यामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे भयानक त्रास आयुष्य उध्वस्त करतील.
म्हणून वृद्धावस्था ही स्वतःला जपण्याची व जपत असताना दुसऱ्यास अनुभव देणारी एक अवस्था आहे यावर विश्वास असला पाहिजे.
घरातील ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने वावरत असतांना, ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल असं आपलं स्थान असलं पाहिजे आणि ते आपण निर्माण करून आदराच्या स्थानी दिसलचं पाहिजे.
House is built by bricks, but Home is built Hearts.
हे वचन सिद्ध करणे ही ज्येष्ठ व वृद्ध म्हणून कर्तव्य आहे आणि ही वृद्धावस्थेतील सर्वात मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे. 🙏
लेखक : श्री अरुण पुराणिक
संग्राहक : अनंत केळकर