सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “वळीव —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
घन घनदाट की दाटे मळभची
धरित्रीच्या जे आर्त मनातील
वणवा वैशाखी जाळतसे
जाळे किंवा ग्रीष्म मनातील….
*
काहूर माजे मनात त्याला
एकलीच मी कशी शांतवू
तहानले मन पावसास त्या
त्याला परि कैसे बोलावू ?….
*
आले जणू पाडाला ढग हे
सुचवून जाई रेघ विजेची
घेऊन या हो कुणी आता ती
मस्त धुंद सय मृद् गंधाची….
*
सोसेना मुळी ताण आता हा
घन हे तांडव नाचू लागले
बघता बघता बेबंदपणे
आर्तताच नी बरसू लागले….
*
वाहून गेले मळभही सारे
झंकारे अन् तार तृप्तीची
मनमोरांना नवे पिसारे
टपटपतांना सर वळवाची……
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈