सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 227
☆ तीर्थक्षेत्र ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
दूरच्या प्रदेशात…
रणरणत्या उन्हात,
लोक निघाले होते ईश्वराच्या दर्शनास!
उंच डोंगरावर वसलेला—
तो श्रीमंत देव व्यंकटेश बालाजी !
जायचं ठरवलं होतं मी ही,
कधीतरी,
आणि “बुलावा” ही आला ,
आपल्या ईश्वर निष्ठा ,
किती प्रबळ,
त्याच देतात बळ,
त्या अलौकिक ईश्वराला,
क्षणभर पाहण्यासाठी,
तासनतास रांगेत तिष्ठत!
कुठली ओढ असते,
त्या कृष्णवर्णी मूर्तीची –‐
कुणीतरी विचारतं,
“आंटी पानी चाहिए?”
आणि जाणवतं,
कंठशोष झाल्याचं!
हवं असताना पाणी देणारा,
तोच असावा , माणसामाणसातील!
दर्शनाच्या रांगेतली धक्काबुक्की,
कळत नसलेल्या भाषेतली,
बाचाबाची!
ही सारी शर्यत पार करत,
क्षणभरच दिसतो,
लखलखीत तेजोमय,
तो ईश्वर!
आणि खरोखरच वाटते,
भरून पावल्या सारखे !
कृतार्थ…..
कानात गुंजतय अजूनही….
गोविंदा….. गोविंदा..
व्यंकट रमणा गोविंदा !
या देवभूमीतच, समजतात माणसं,
चांगली वाईट,
म्हणूनच ही तीर्थक्षेत्रं,
बनवतात अधिकाधिक प्रगल्भ !
कोणीच येत नाही रिकामा,
प्रत्येकाची झोळी भरलेलीच,
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार,
गोविंदा गोविंदा !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈