श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “डिंपी” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रुटीनपेक्षा वेगळं म्हणून मैत्रिणीच्या आग्रहावरुन सामाजिक संस्थेतल्या कार्यक्रमाला गेले.तिथं एका सोशल क्लबच्या श्रीमंत सभासदांकडून संस्थेतील मुलांना खाऊ,कपडे,भेटवस्तूंचं वाटप सोबत फोटोसेशन चालू होतं.सुशिक्षित अडाण्यांच्या एकेक तऱ्हा गमतीशीर होत्या. सामाजिक कार्याचा दिखाऊपणा पाहून वाईटही वाटलं.त्या लोकांमध्ये साधारण उंची,स्थूल वजनदार शरीर,कपाळावर भलं मोठं कुंकू,डोक्यावर पदर,हातात मोबाईल,कमरेला चाव्यांचा जुडगा असा अवतारातल्या एकीनं लक्ष वेधलं.सतत बोलत असलेल्या तिच्या वागण्यात नाटकी विनम्रपणा होता.ती प्रत्येकासोबत फोटो काढत होती.चेहरा ओळखीचा वाटला.उत्सुकतेपोटी जवळ गेले.नमस्कार करताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलले.एकदम ती ओरडली “सुमे,तू!! इकडं कुठं”
“सॉरी,मी ओळखलं नाही”
“अगं मी डिंपल,डिंपी” नाव ऐकून जबरदस्त धक्का बसला.एकटक पहातच राहिले.मन थेट कॉलेजच्या दिवसात जाऊन पोचले.डिंपी,माझी कॉलेजमधली बेस्टी!!बोल्ड,बिनधास्त,टॉमबॉय,उत्साही,आक्रमक स्वभावाची,बडबडी,भांडणाला न घाबरणारी,कायम जीन्स-टॉपमध्ये पाहिलेल्या डिंपीचा बदललेला अवतार सहज पचनी पडला नाही.
“ओळखलंच नाही गं”
“काकूबाई दिसतेय ना”
“तर काय?कुठं ती मॉडर्न डिंपी आणि कुठं ही टिपिकल..”
“वो भी एक दौर था,ये भी एक दौर है. हालात ने लिबास के साथ साथ मुझेभी बदल डाला.”
“अरे वा,डायलॉग मारायची सवय अजूनही आहे.”
“कुछ पुराना साथ हो तो जिंदगी आसान हो जाती है”इतरांशी मराठीत बोलणारी डिंपी माझ्याशी मात्र बऱ्याचदा हिंदीतून बोलायची.
“ये भी सही है” मीपण हिंदीतून प्रतिक्रिया दिली
“ये डायलॉगही तो अपना स्पेशलिटी था.इसी वजह से कॉलेज मे फेमस थे”
“निवांत कधी भेटतेस.”
“फोन नंबर दे.आज बिझी आहे.उद्या कॉल करते.” निरोप घेऊन निघताना पाहिलं तर डिंपी पुन्हा नमस्कार आणि फोटो मध्ये हरवलेली.
—-
दुसऱ्याच दिवशी सकाळीच डिंपीचा फोन.खूप वेळ बोललो.त्यानंतर रोजच फोनवर बोलणं व्हायचं तरी समाधान होत नव्हतं.खूप दिवसांचा बॅकलॉग होता.शहराजवळच्या तिच्या फार्म हाऊसवर जायचं ठरलं.डिंपी गाडी घेऊन आली.फार्म हाऊसला पोचल्यावर “संध्याकाळी न्यायला ये.फोन करते” ड्रायव्हरला सांगून डिंपीनं गाडी परत पाठवली.
“कशाला उगीच ये-जा करायला लावतेस.त्याला इथंच थांबू दे की..”
“आज का दिन अपना है.कोई डिस्टर्ब नही चाहिये” ड्रायव्हर गेल्यावर डिंपीनं कडकडून मिठी मारली.वीस वर्षांचा दुरावा क्षणार्धात नाहीसा झाला.डोळे भरून आले.दोघी खूप भावुक झालो.
“आयुष्य पण कसय ना.त्यावेळी एक दिवस भेटलो नाही तरी करमायचं नाही आणि आता थेट वीस वर्षांनी भेटतोय.”
“वक्त सबकुछ बदल देता है.तुम रहे ना तुम,हम रहे ना हम!, डिंपी.
“तुझ्याकडे बघून शंभर टक्के पटलं”
“हा वो तो है,पर तू ज्यादा कुछ नही बदली.”
“थॅंक्स,आम्हां मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात फार मोठे असे बदल होत नसतात.सरधोपट आयुष्य!!”
“मेरा बिलकुल उलटा है.पिढीजात श्रीमंती असलेल्या घरात जन्म,पहिली बेटी धनाची पेटी म्हणून खूप लाडात वाढले.जे मागितलं ते मिळालं परंतु घरात जुन्या चालीरीती,रूढी,परंपरा यांची घट्ट साखळी पायात बांधलेली होतीच.कॉलेजमध्ये कितीही बिनधास्त असले तरी घरात अनेक बंधनं होती.मुलगी म्हणजे परक्याचं धन असं समजणारी टिपिकल फॅमिली. बाकी सर्व गोष्टी मॉडर्न असल्यातरी विचार मात्र..”डिंपी एकदम बोलायचं थांबली.
“ते तर बाईच्या जातीला नवं नाही.सगळ्याच घरात कमी जास्त प्रमाणात हे असतचं.”
“पण आमच्यासारख्यांच्या घरात जरा जास्त असतं.पुढं शिकायचं होतं.लॉ करायची खूप इच्छा होती.ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच घरच्यांनी मुलं शोधायला सुरवात झाली.माझी इच्छा कोणीच विचारली नाही.पहायला आलेल्या पहिल्याच मुलानं पसंत केल्यावर मीसुद्धा ताबडतोब होकार द्यावा यासाठी प्रेमानं,धाक दाखवून, समजावून हरप्रकारे दबाव आणला गेला.विनाकारण वाद घालून हाती काही पडणार नव्हतं म्हणून मी होकार दिला.जीन्स,टॉप,फॅशनेबल ड्रेसेस यांच्यासोबत स्वप्नं,इच्छा,अपेक्षा यांचं गाठोडं बांधून माळ्यावर फेकून दिलं. आणि आयुष्यातली सर्वात मोठी तडजोड करून बोहल्यावर चढले.नवरासुद्धा टिपीकलच निघाला.स्वभावानं वाईट नाहीये पण त्याला कधी बायकोचं मन समजलं नाही.कायम गृहीत धरतो.सुरवातीला त्रास झाला नंतर सवय झाल्यावर आयुष्याबरोबर वाहत राहिले.दोन मुलं जन्माला घातली.वारस मिळाल्यानं सासरी आनंदी आनंद,अजून एक टेंशन दूर झालं.जसं माहेर तसंच सासर.. जागा आणि माणसं बदलली बाकी सगळं तेच……..”
“डिंपे…”
“सुमे,आज बोलू दे.मनात खूप साचलयं”
“सासरी काही त्रास?”
“अजिबात नाही.सगळी सुखं हात जोडून सेवेला उभी आहेत.माझी दोन्ही लेकरं हाच काय तो मोठा आधार.
नवरा चोवीस तास धंद्याच्या विचारात.सासू देवधर्मांत तर सासरे धंदा आणि समाजसेवा यात गुंतलेले या तिघांच्या सेवेशी मी..” डिंपी भकास हसली.
“मग प्रॉब्लेम काय आहे”
“साडी,सर के उपर पल्लू,बार बार हात जोडना और पैर छू लेना इससे आप बहोत संस्कारी दिखाई देते हो.शादी के बाद यही तो सब कर रही हू.दम घुटता है.समय बदल गया.बच्चे बडे हो गये पर अभी भी मै वही के वही…”
“म्हणजे हे सगळं मनाविरुद्ध करतेस”
“मेरी जान,करना पडता है.एवढं शिकले पण काही उपयोग नाही.आमच्यात बायकांनी नोकरी करणं मान्य नाही.धंद्यात लक्ष घालायची गरज नाही.बाईनं फक्त घर,मुलं सांभाळावी एवढीच अपेक्षा आणि तोच अलिखित नियम”
“सगळं व्यवस्थित होईल.”
“सुमे,उगीच खोटी आशा दाखवू नकोस.चांगलं माहितेय की मरेपर्यंत हे असंच चालू राहणार.बोलल्यामुळं छान वाटलं.अगदी देवासारखी भेटलीस.इसीलिये लाईफ मे पुराने दोस्त होने चाहिये..थँक्स डियर” भरल्या डोळ्यांनी डिंपी बिलगली.लौकिक अर्थानं सर्वसुखी आयुष्य असलेल्या डिंपीच्या वेदनेचा ठणका माझ्यापर्यंत पोचला.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈