विविधा
☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली, स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’
परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो. पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.
आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!
तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये लोकप्रिय होण्यामागचे.
प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.
त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या कथेत खूप बदल केले होते.
मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर, कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.
कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.
प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!
केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-
“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”
विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –
माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.
त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!
घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.
जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात-
‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’
निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.
त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे, सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे.
लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे
मो. 7208633003
संग्राहक : अनंत केळकर