श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ पडझड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
वा-यावरती भरकटलेला पतंग धरणे अवघड आहे
नकाच समजू कधी कुणीही बाब जराशी वरकड आहे
*
सुटले वादळ तुटला परिसर नियंत्रणाचा उपाय सरला
खूप साजवल्या इमारतीची झाली सगळी पडझड आहे
*
भ्रमात अविरत वावरताना ताल तोलही उरला नाही
दुसरे तिसरे नाही कारण विचारातली गडबड आहे
*
मीच जगाचा शककर्ताया अशी भावना कशी ठेवता
वा-यावरती विरणारीही उगीच फुसकी बडबड आहे
*
प्रवासातल्या वाटा चुकल्या कळले तेव्हा पडला चकवा
आता सोबत काळजातली सतावणारी धडधड आहे
*
चुकून चुकले आणि हबकले मन झुरणारे छळू लागले
हाती केवळ क्षमायाचना करणारीही धडपड आहे
*
आशादायी असतो मानव संधीचे पण सोने करण्या
पकडायाची नजाकतीने तिला चालली धडफड आहे
*
काळ यायचा तसाच आला रंग उधळुनी निघून गेला
उदासवाण्या आयुष्याची उरली मागे धडपड आहे
*
गणगोतांचा प्रकाश गेला काळोखाचा पडला विळखा
विसकटलेल्या घरट्यामधल्या व्यर्थ पिलाची फडफड आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈