श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

१ मे महाराष्ट्र दिन… ☆ श्री प्रसाद जोग

१  मे १९६०  रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची स्थापना  झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५  जणांनी आपले बलिदान दिले.

२१ नोव्हेंबर,१९५६ या  तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार नंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होता. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

संयुक्त महाराष्‍ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १ मे या दिवसाला ‘सोन्याचा दिवस’ असे संबोधले होते. संयुक्त महाराष्‍ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलले होते, की ‘महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस येणार  असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्‍ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`

१  मे १९६०  हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मं‍त्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्‍ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.

वेगवेगळ्या कवींनी महाराष्ट्र गीते लिहिली आहेत.

गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी )>> मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर >> बहू असोत सुंदर संपन्न की महा

राजा बढे  >>जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा

कुसुमाग्रज>>माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

शान्ता शेळके >>स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे

महाराष्‍ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.

जुनी इंग्लिश नवे बदलून मूळ नावे पुन्हा प्रस्थापित करण्यात आली.भारतातल्या बऱ्याच शहरांची नावे दुरुस्त केली

मद्रासचे> चेन्न्नई< झाले

कलकत्याचे>कोलकाता< झाले

कोचीनचे > कोची< झाले

उटीचे > उधगमंडलम<झाले.

बेंगलोरचे > बंगळुरू < झाले

बेळगावचे >बेळगावी<झाले

बॉम्बे चे मुंबई केले आहे. परंतु परभाषीक महाराष्ट्रीयन हा आजही आवर्जून बॉम्बे च म्हणताना दिसतो. आपल्याला कोणी असे बॉम्बे म्हणताना आढळले तर त्या  व्यक्तीला तिथेच थांबवून मुंबई म्हणायला भाग पाडले पाहिजे.असे करायला लावणारा तोच मराठी माणूस.आणि तीच त्या १०५ हुतात्म्यांना आदरांजली.

संयुक्त महाराष्‍ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी‍ अनेक व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी  मोलाचे योगदान दिले. या महान व्यक्तींचे आपण  सदैव ऋणी राहूया.

जय महाराष्‍ट्र, जय महाराष्‍ट्र, जय महाराष्‍ट्र

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments