श्री सुनील शिरवाडकर
विविधा
☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
“घेई छंद…. “
नागपुरातील धंतोली्वर त्या रात्री एक सुरांची अविस्मरणीय मैफिल जमली होती. तसं म्हटलं तर ती सगळी तरुण मुलंच होती. समोर श्रोत्यांमध्ये मात्र नागपुरातील जाणकार, बुजुर्ग संगीतप्रेमी होते. सुरांची ती अचाट मैफिल संपल्यानंतर समोर बसलेल्या, मैफीलीत रत असलेल्या श्रोत्यांना दाद देण्याचेही भान राहिले नव्हते. काहीतरी अलौकिक घडल्यानंतर, अनुभवल्यानंतर वातावरणात भिनलेली ती धुंद शांतता… ती अनुभवणारा तो गायक… त्याचे साथीदार…
आणि अचानक श्रोत्यांमधील एक बुजुर्ग, म्हातारा विचारता झाला…
“काहो देशपांडे… आपले घराणे कुठले ?
“आमच्यापासून सुरू होणार आहे आमचं घराणं…. ” त्या गायकाने ताडकन उत्तर दिले… आणि
दिवाणखान्यात बसलेल्या रसिक नागपुरकरांनी आता मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.
तिशीच्या आसपास असलेला तो गायक होता… वसंतराव देशपांडे.. तबल्यावर मधु ठाणेदार… आणि पेटीच्या साथीला साक्षात पु. ल. देशपांडे.
कोणत्याही एकच घराण्याची शागिर्दी न पत्करता वसंतरावांनी अनेकांकडे सुरांची माधुकरी मागितली. आणि ती त्यांना मिळालीही. नागपुरात असलेल्या शंकरराव सप्रे गुरुजींकडे वसंतरावांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सप्रे गुरुजींच्या त्या गायनशाळेत त्यावेळी वसंतरावांबरोबर अजून एक शिष्य गायनाचे धडे गिरवत होता. दोघेही पुढे जाऊन आपल्यागुरुचे नाव त्रिखंडात गाजवतील याची सप्रे गुरुजींना कल्पनाही नसेल. त्यावेळी वसंतरावांबरोबर शिकणारा त्यांचा जोडीदार होता… राम चितळकर…. म्हणजेच सी. रामचंद्र.
नागपुरातील सप्रे गुरुजींनी गायकीचे प्राथमिक धडे तर दिले… पण आता पुढे काय?
नेमके त्याच वेळेला वसंतरावांचे मामा नागपुरात आले होते. ते रेल्वेत नोकरीला होते. लाहोरला. मामाने त्यांना आपल्याबरोबर लाहोरला नेले. त्याकाळी लाहोरला मोठमोठ्या गवयांचे वास्तव होते. अनेक मुसलमान गवयांची मामाची ओळख होती.
कुठूनतरी वसंतरावांना समजले. रावी नदीच्या पलिकडे एक कबर आहे. तेथील विहिरी जवळ काही फकीर बसतात. ते उत्तम गवयी आहेत. वसंतराव तेथे जाऊ लागले. गाणे ऐकू लागले. मामाने पण सांगितले… त्यातील मुख्य फकीर जो आहे… असद अली खां, त्याची क्रुपा झाली तर ती तुला आयुष्यभर कामाला येईल.
खांसाहेबांकडुन गाणे शिकायचे होते. त्यासाठी त्यांना राजी करणे महत्त्वाचे. मामाने सांगितले… टोपलीभर गुलाबाची फुले आणि मिठाई घेऊन खांसाहेबांकडे जा. सोबतीला थोडा चरस असेल तर उत्तम. त्यांचे पाय धर. विनंती कर. हट्ट कर. मग तुला ते गायन शिकवतील.
मामाने सांगितल्याप्रमाणे वसंतरावांनी फुले, मिठाई, आणि हो…. कुठुनतरी चरसही आणला. सर्व वस्तू खांसाहेबाना अर्पण केल्या. विनंती केली. खांसाहेबाना राजी केले.
खासाहेबांनी जवळ असलेल्या विहिरीकडे त्यांना नेले. दोघेही काठावर बसले. संध्याकाळची वेळ होती. वसंतरावांच्या हातात त्यांनी गंडा बांधला. गंडा बांधणे म्हणजे शिष्य या नात्याने गुरुशी नाते जोडणे. गंडा बांधून झाला. मग त्यांनी वसंतरावांना अर्धेकच्चे चणे खायला दिले. हाही एक त्या विधीचा भाग. असले चणे खाताना, चावताना त्रास होतो. कडकडा चावून खावे लागतात. विद्या मिळवण्याचा मार्ग कसा खडतर आहे हे कदाचित त्यातून सुचवायचे असेल. चणे खाऊन झाल्यावर एक लहानसा गुळाचा खडा तोंडात घातला. कानात कुठल्यातरी रागाचे सुर सांगितले.
तालमीला सुरुवात झाली. खांसाहेबांनी जवळच्या एका फकिराला इशारा करताच त्याने ‘मारवा’ आळवायला सुरुवात केली.
वसंतराव सांगतात, “विहीरीवर बसून गाण्यातली गोम अशी होती की काठावर गायलेला सुर विहिरीत घुमुन वर येत असे आणि तंबोर्याचा सुर मिळावा तसा सुर विहीरीतुन मिळत असे “.
सतत तीन महिने खांसाहेबांनी मारवा हा एकच राग शिकवला. वसंतराव म्हणतात की तो त्यांनी असा काही शिकवला की त्या एका रागातून सगळ्या रागांचे मला दर्शन झाले.
मारवा गळ्यात पक्का बसला. आता बाकी रागांचे काय? तशी त्यांनी विचारणाही केली. त्यावर खांसाहेब म्हणाले,
” जा. तु आता गवयी झालास. एक राग तुला आला… तुला सगळे संगीत आले”.
आणि शेवटी म्हणाले….
“एक साधे तो सब साधे…
सब साधे तो कुछ नही साधे “
वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट गायक आहेत पण ते उत्तम अभिनेते पण आहेत हे सर्वांना समजले केंव्हा? तर ‘कट्यार काळजात घुसली ‘हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा. यातील ‘खांसाहेब’त्यांनी अजरामर केला. वास्तविक त्यापुर्वी त्यांनी पु. लं. च्या ‘तुका म्हणे आता’, ‘दूधभात’ या चित्रपटांतून कामे केली होती. पण ‘कट्यार… ‘मधील खांसाहेब ने त्यांना प्रसिध्दीच्या शिखरावर नेले.
या महान गायकाने उदरनिर्वाहासाठी, प्रपंच चालवण्यासाठी आयुष्यातील भर उमेदीची २४ वर्षे चक्क कारकुनी केली. रात्र रात्र मैफिली गाजवणारे वसंतराव सकाळ झाली की सायकलवर टांग टाकून मिलीटरी ऑफिसमध्ये खर्डेघाशी करायला जात. सदाशिव पेठेत असलेल्या एका खोलीत संसार. एक दोन नाही…. पंचवीस तीस वर्षं. त्यावेळी एका ज्योतीषाला त्यांनी कुंडली दाखवली होती. तो ज्योतिषी वसंतरावांना म्हणाला….
“वसंतराव.. मोठी खट्याळ कुंडली आहे तुमची. तुम्हाला आयुष्यात धन, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही लाभणार आहे. खडिसाखरेचे ढीग तुमच्या पुढे पडणार आहे. पण अश्यावेळी की त्याचा आस्वाद घ्यायला तुमच्या मुखात दात नसतील”.
त्या ज्योतीष्याकडे पहात मिस्कील स्वरात वसंतराव म्हणाले…
“ठिक आहे. दात नसले तरी हरकत नाही. आम्ही ती खडीसाखर चघळून चघळून खाऊ”.
आयुष्यभर स्वरांचे वैभव मोत्यांसारखे उधळले वसंतरावांनी. सुबत्ता, मानसन्मान, पुरस्कार आयुष्याच्या उत्तरार्धात मिळु लागले. पण फार काळ नाही. निव्रुत्त होण्यासाठी थोडे दिवस राहिले असतानाच संरक्षण खात्याने त्यांची बदली ईशान्येकडील नेफाच्या जंगलात केली. जंगलातील तंबूत त्यांचे वास्तव्य. पाऊस पाणी, रोग राई, जीवजंतू याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रक्रुतिवर झाला. तेथून ते परतले. निव्रुत्त झाले. पण तेथे जडलेली पोटाची व्यथा त्यांना त्रास देऊ लागली.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा एकसष्ठीचा सत्कार झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी वयाच्या… बासष्ठाव्या वर्षी अकोला येथे झालेल्या बासष्ठाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. आणि वर्षभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आज २ मे. वसंतरावांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈