श्री प्रसाद जोग
🌸 विविधा 🌸
☆ भीष्माचार्य भालजी ☆ श्री प्रसाद जोग ☆
(भालजी पेंढारकर जन्मदिन दि. २ मे १८९९ निमित्त)
मराठी चित्रसृष्टीतले भीष्माचार्य, कोल्हापूरची शान वाढवणारे “जयप्रभा स्टुडिओ”चे मालक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कवी, नव्या कलाकारांना घडवणारे मूर्तिकार अशी असंख्य बिरुदे ज्यांना लावता येईल त्या भालजी पेंढारकर यांचा आज स्मृतीदिन
भालजी पेंढारकरांनी कोल्हापूर हे मराठी चित्रपट बनवण्याचे प्रमुख केंद्र बनवले. त्यांच्या जयप्रभा स्टुडिओ मधून एकाहून एक उत्तम चित्रपट निर्मिले गेले. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे…
चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीराजांचा चा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.
१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा “मेरे लाल” हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.
भालजींचे चित्रपट
आकाशवाणी, कान्होपात्रा, कालियामर्दन, गनिमी कावा, गोरखनाथ, छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, भक्त दामाजी, मराठा तितुका मेळवावा, महारथी कर्ण, मीठभाकर, मोहित्यांची मंजुळा, राजा गोपीचंद, वाल्मिकी, साधी माणसं, सावित्री, सुवर्णभूमी
भालजींनी योगेश या नावाने गाणी लिहिली ती गाणी देखील लोकप्रिय आहेत.
१) अखेरचा हा तुला दंडवत
२) अरे नंदनंदना
३) डौल मोराच्या मानच्या र
४) तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी
५) माझ्या कोंबड्याची शान
६) माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात
७) राजाच्या रंगमहाली
९) वाट पाहुनी जीव शिणला
१०) चल चल जाऊ शिणुमाला.
सिनेसृष्टीतला दादासाहेब फाळके हा अत्युच्च पुरस्कार त्यांना १९९१ साली प्रदान केला गेला.
भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले होते.
भालजी पेंढारकर यांना विनम्र अभिवादन
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈