श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ राजकारणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
राजकारणी होण्यासाठी कसून केला सराव आहे
धडे गिरवले कपटनितीचे म्हणून धरला टिकाव आहे
*
फितूर झाले बंड कराया तेच तेवढे धरले हाती
विरोधकाना संपवण्याचा केला जबरी उठाव आहे
*
लोकहिताचा घातकराया रचला आहे गनिमी कावा
जनतेला तर फसवायाचा असली केला बनाव आहे
*
सत्ता आहे हाती तोवर घाबरण्याचे कारण नाही
आदेशाने देत जायचा वरून खाली दबाव आहे
*
फिरवत टोप्या साधत संधी मानमरातब मिळवायाचा
हीच चिकाटी ठेवत कायम धरावयाचा निभाव आहे
*
हटायचेपण नाही मागे खोटी वचने देत जायची
सूड घ्यायला सतत जागता ठेवायाचा स्वभाव आहे
*
रोज द्यायच्या नव्या घोषणा नव्या दमाने म्हणावयाचे
जमेल तितकी करतो सेवा पण वेळेचा अभाव आहे
*
समाजातल्या गुणदोषांची करावयाची कशास चिंता
परंपरागत गुलामीतला आपल्या मागे जमाव आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈