डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ माणुसकीचा ठाव नसे ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे
पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे
सुधारलेल्या या देशी संस्कृतीस ना कोणी पुसे
माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे
*
पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके
दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके
आंसू आटलेले शुष्क मातृत्वाची मान झुके
माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे
*
माय आपुली बहिण गर्भातच लेक खुडे
समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे
मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे
माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे
*
उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे
दारी गाड्यांची रांग कोणा नेसाया साडी नसे
निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे
माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे
*
मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके
बैठकी खणखणा पडती विद्येसाठी मोल थके
विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे
माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे
*
आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची
मनात आतल्या आतच जळूनी ती गुदमरायची
हाची का समाज हेचि असेच का जगायचे
माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈