सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆सोळावं वरीस धोक्याचं… – भाग-१ ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
त्या दोघींची अगदी आदर्श अशी दाट मैत्री होती. अगदी जीवश्च कंठश्चतेच प्रतीक असलेली त्यांची मैत्री कशी जमली असेल बाई? हे बघणाऱ्याला अगदी कोडचं होतं. कारण दोघींचे स्वभाव म्हणजे दोन टोकं,एक उत्तर ध्रुव तर दुसरी दक्षिण ध्रुव.रागिणी नांवाप्रमाणे रणरागिणी गुंडांना पाणी पाजणारी ..तर स्वप्ना, टोमणे मारणाऱ्या गुंडां पुढे थरथर कापणारी सशाच पिल्लू व्हायची.आणि आपलेच मोलाचे अश्रू सांडणारी भित्री भागुबाईअशी ही रडूबाई, नावाप्रमाणेचं स्वप्नवेडी, आभासी दुनियेत जगणारी होती. सिनेमा पहाणं हा तिचा आवडता छंद. त्यातला हिरो तिला आपलाच प्रियकर वाटायचा. आणि हिरॉईनच्या जागी तिला आपली स्वतःची छबी दिसायची.टवाळखोर मैत्रिणीं टिंगल करायला लागल्या की मग बाईसाहेब मुळू मुळू रडायच्या.अशावेळी रागिणी तिची ढाल होऊन म्हणायची, “ए लाज नाही वाटत,माझ्या मैत्रीणी ची टिंगल करायला? स्वप्न तिच्या सारख्या सुंदर मुलीनी नाही पाह्यची तर काय तुमच्यासारख्या काळतोंड्यांनी पाह्यची का ? आरशात तुमचं खापर तोंड बघा आधी. निघाल्यात मोठ्या शहाण्या, दुसऱ्यावर तोंडसुख घेणाऱ्या. मग तिची तोफ स्वप्नाकडे वळायची. आणि तिला ती डाफरायची ,” रडतेस काय अशी नेहमी नेहमी नेभळटा सारखी ? तिच्या दमदार धमकीनी त्या कृष्णवर्ण टवाळ पोरी तोंड लपवून पसार व्हायच्या.टिंगल करणाऱ्या पोरींची ही कथा.तर मवाल्यांची क्या बात ? सांगायचं कारण म्हणजे आपल्या भाबड्या मैत्रिणीच्या मागे सतत रागिणी सांवलीसारखी उभी असायची.दोघींच्यात कुठलंच गुपित नसायचं. रूम मेट होत्या ना त्या दोघीजणी ! रात्री अंथरूणावर पडल्यावर स्वप्नाची टकळी सुरू व्हायची. इतरांपुढे अबोल असणारी ही अबोली रागिणीजवळ बोलकी व्हायची. पण हल्ली काय झालय कोण जाणे,!स्वप्ना अंतर्मुख झाली होती. काहीतरी कुठेतरी पाणी मुरतं होतं.आपल्यापासून स्वप्ना काहीतरी लपवतीय.
हे आणि उशिरापर्यंत चाललेलं तिचं, बाहेर राहणं, फिरणं फार खटकलं रागिणीला. नंतर मग, काहीं काहीं गोष्टी उडत उडत कानावर आल्या.स्वप्ना एका मुलाबरोबर हिंडत असते. तिचं म्हणे अफेअर चालू आहे.सांगणाराच थोबाड रंगवावस वाटलं होतं रागिणीला.पण त्याआधी सोक्षमोक्ष लावावा म्हणून तिने स्वप्नालाच खोदून खोदून विचारलं. खनपटीलाचं बसल्यावर ती कबूल झाली, ” हो संतोष बरोबर फिरणं चालू आहे माझं. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर.खूप चांगला मुलगा आहे तो. नुसतं फिरवणार नाही तो मला, तर लग्न करणार आहे तो माझ्याशी. गांवाकडे नातेवाईक आहेत त्याचे. ईथे अगदी एकटा आणि नवखा आहे गं तो.तिचं कौतुक ऐकून रागिणी फणकारली, “अगं पण त्याची बाकीची चौकशी केलीस का तू ?मूर्खासारखी निघालीस लग्न करायला ? आई-बाबा नाहीयेत तुझे.,पण दादाला तर विचार. फसलीस म्हणजे ?”. “नाही ग ! नाही! नाही फसवणार तो मला. खूप साधा , सरळ मुलगा आहे तो.त्याच्याशी लग्न करून मी सुखात राहीन. लग्न करीन तर त्याच्याशीच असंच ठरवलंय मी. आता नोकरी साधी आहे त्याची,पण नंतर होईल सगळं ठीक. मला कोणी जवळचे मायेचे नातेवाईक नाहीत .तोही बिचारा एकाकीच आहे.आणि त्यातून गरिबी पण आहे त्याची. काही वेळेला खर्चायला हॉटेलसाठी पैसे पण नसतात त्याच्याजवळ. अशावेळी त्याचा हॉटेलचा खाण्यापिण्याचा खर्च मीच करते. डोळ्यात पाणी आणून तो म्हणतो,” सपना मेरी सपनोंकी रानी, धीर धर, काही दिवसांनी मी खोऱ्यानी पैसा ओढीन , आणि लग्नानंतर तुला राणी सारखी सुखात ठेवीन. ” हे सगळं आपल्या मैत्रिणीला रागिणीला, भाबडी स्वप्ना भडाभडा सांगत सुटली होती. तिच्या बोलण्याचा धबधबा थांबवत रागिणी म्हणाली, ” मला एक सांग खर्चायला एवढा पैसा तू आणतेस कुठून ? अय्या ! सांगायचं राहिलंच की तुला. संतोषला मी पहिल्या भेटीतच सांगून टाकलंय आई बाबा एक्सीडेंट मध्ये गेलेत माझे. निम्मी इस्टेट माझ्या नावावर आहे. खर्चाचं विचारणार कोणीच नाही मला. दादा वहिनीनी तर माझ नांवच टाकलय.संतोषला हे सगळं मी खुल्लम खुल्ला सांगून टाकल. तेव्हां तो म्हणाला, ” वाईट वाटून घेऊ नकोस मी आहे ना तुला.! मला आई बाबा नाहीत, दादा लक्ष देत नाही हे कळल्या पासून जरा जास्तच प्रेम करतोय तो माझ्यावर. माझ्या मनीचा राजकुमार आहे गं तो “. हे सगळं ऐकतांना रागिणीच्या मनात आलं हे वेडं पांखरू कुणा पारध्याच्या जाळ्यात तर अडकणार नाही ना,! तिची शंका खरी ठरली. कारण रागिणी तिला म्हणाली होती,” अगं मग तुझा राजकुमार दाखव ना मला.”
ठरल्याप्रमाणे संतोष ची गांठभेट झाली. खरचं नावाप्रमाणे राजकुमार होता तो.रागिणी समोर त्याचं स्वप्नावरच प्रेम उतू चालल होत. पण त्यात नाटकीपणा जास्त वाटत होता. आणि त्याची नजर ! त्या नजरेत कोल्ह्याची लबाडी भासली रागिणीला. फुलपांखरासारखी मुलींवरून भिरभिरणारी त्याची नजर नाही आवडली तिला . का कोण जाणे तिला आठवेना,पण जाणवत होतं,आपण हयाला कुठेतरी पाह्यलंय. विचारात गर्क असलेल्या तिला हलवत, स्वप्ना चिंवचिवली, ” ए कुठे हरवलीस ? माझ्या राजकुमाराला पाहून भारावलीस कीं काय? आहेच मुळे तो हँडसम.नंतर मात्र रागिणी गप्पच होती. आपली मैत्रीण फसवली तर जाणार नाही ना ? या विचाराने ती बैचेन झाली होती. संतोषच्या नजरेतला विखार तिला अस्वस्थ करीत होता.
दुसऱ्या दिवशी तर कहर झाला.स्वप्ना नसतांना तो रूमवर आला. आत येण्या आधीच तिने त्याला सांगितलं, ” स्वप्ना नाहीय्ये घरात.” निर्लज्जपणे आत येत तो म्हणाला,” ते माहीत होतं म्हणूनचं तर मी आलोय. फक्त तुझ्यासाठी.काल तुला पाह्यलं आणि मी वेडा झालो. तुझी आणि माझी आधीच भेट व्हायला पाहिजे होती, स्वप्नापेक्षाही तूच आवडलीस मला, पण अजूनही वेळ गेली नाही. काही हरकत नाही अजूनही मैत्री वाढवूया आपण.” रागिणी चवताळलीच., ” निर्लज्ज माणसा! लग्न करणार आहेस नां तू स्वप्नाशी?तिचं प्रेम आहे तुझ्यावर”. छदमीपणे हंसत तो म्हणाला, ” प्रेम ? आणि लग्न ? अशा बावळट मुलीशी कोण करेल लग्न? खूप मुलीं गळ्यात पडतात माझ्या . टाईमपास बरा असतो.म्हणून काय प्रत्येकीशी मी लग्न करू की काय?
आता मात्र रागिणी रणरागिणी झाली.धक्के मारून तिने त्याला घराबाहेर काढलं. विषारी सापाच्या शेपटीवर तिने पाय दिला होता. शेजारी गोळा झाले. सगळ्यांसमोर तमाशा झाला होता.नक्की काय झालं कुणालाच कळलं नव्हतं.जातांना तो फिस्कारला, ” बघून घेईन मी तुझ्याकडे,आता बघच मी कसं तुला जाळ्यात अडकवतो ते!” आणि पाय आपटत तो गेला.
– क्रमशः भाग पहिला
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈