सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
नानीचे एक बरं आहे ती कुणाच्या मध्ये बोलतच नाही. अद्यात मद्यात राहतच नाही. तिला पटलं नाही, खूप खटकलं तरी सुद्धा ती कसला विरोध दर्शवत नाही. “आमच्या वेळी हे असं काही नव्हतं बाबा! आम्ही असे वागलो असतो तर..” वगैरे अशी वयस्कर, परंपरा छाप वाक्यं ती कधीच मुखातून काढत नाही. अगदीच असह्य झालं तर ती तिच्या रूम मधल्या फ्रेंच विंडोपाशी जाऊन बसते आणि खिडकीतून दिसणाऱ्या मोकळ्या आभाळाकडे पहात राहते किंवा पोडियम वर जाऊन बागेतल्या एखाद्या बाकावर एकटीच बसते. तिथे मुली असतात, मुलगे असतात मुला-मुलींचे घोळके असतात, त्यांचं जरा जास्तच मोकळं वागणं, हसणं बागडणं असतं. ज्येष्ठ नागरिकही असतात. बागेचा एखादा कोपरा पुरुषांचा तर दुसरा बायकांचा. नानी मात्र एकटीच बाकावर बसून राहते. जगदाळे, पागे, येवलेकर झाल्यास तर त्या चंद्रपूरच्या तन्नीवार नानीला बोलावतात. जाते कधी कधी नानी त्यांच्यात. पण मग त्यांच्या गॉसीप्स ऐकून तिचे कान किटतात.
कोणाची सून माहेरीच गेलेली असते, तर कुणाला बाईच्या हातच्या पोळ्याच आवडत नाहीत, कोणाचा मुलगा लग्नानंतर फारच बदललेला असतो, कोणी उशिरा उठतो, कुणी रात्रीचा लाईटच काढत नाही वेळेवर, एक ना अनेक. पण थोडक्यात सगळ्याच तक्रारी. खाण्यावरून, कपड्यांवरून, खर्चावरून, रितीभातींवरून, सण साजरे करण्यावरुन,बोलण्यावरून, हसण्यावरून. नाराजी —नाराजी— फक्त नाराजी.
नानीला हे सारं नको असतं. तिला अशा माणसांच्या घोळक्यातून कुठेतरी दूर जाऊन फक्त हे बदललेलं जग जरा बघायचं असतं. अनुभवायचं असतं. कुठलंही मत तिला द्यायचं नसतं. तिची भूमिका एकच. फक्त वॉचमनची.
पण म्हणूनच नानीचा कुणाला त्रास नाही. सुनेला, मुलाला, नातीला— कुणालाच नाही. म्हणजे ती त्यांच्यातच असते. नानी खरंतर त्यांच्या जगात पूर्ण सामावलेली असते.पण तरीही अलीप्त असते.
“नानी आज मला ऑफिसातून यायला उशीर होईल. माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर आम्हाला डिनर आहे. आणि रिमा मधुराकडे बर्थडे पार्टीला जाणार आहे. तिचं टीनेज संपल्याचं सेलिब्रेशन आहे बहुतेक आज. राघवचं माहित नाही. तो येईल कदाचित घरी. पण तुम्ही त्याच्यासाठी जेवायला थांबू नका. तुम्हाला जे आवडेल ते मालतीबाईंकडून करून घ्या.”
सुनेच्या या लांबलचक ‘आजच्या अहवालावर’ नानी अगदी मनापासून म्हणते,
” बरं!”
हे “बरं” म्हणणं किती छान. वादच नाही. प्रत्येकाकडे घराच्या चाव्या असतातच. त्यामुळे दार उघडण्यासाठी वाट पाहत राहण्याची गरजही नसते. सारं किती सोप्पं! कुणाचा पाय कुणात अडकलेला नाही. नानींना चुकारपणे वाटूनही गेलेलं असतं,” मग आज राघवच्या आवडीची गरमागरम कांद्याची छान तेल लावून खरपूस भाजलेली थालीपीठ आपणच का करू नये?”
पण नकोच. सुनेचं शासन बिघडायला नको. तशी ती काही वाकड्यात नाहीच. नानीलाच उगा या वयात त्रास होऊ नये हीच तिची भावना असते. नानीला सगळं समजतं. नानी उगीच फाटे फोडत नाही.
जग बदललं आहे हे खरंच आहे. खूपच बदललं. कुठच्या कुठे गेलं. वास्तविक नानी ही एका मध्यरेषेवर होती.जुन्या नव्याच्या,बदलत्या काळाच्या केंद्रबिंदुवर होती. जरी तिची जडणघडण एका मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबात झाली होती तरी त्याही वेळेला तिच्या भोवतालचं वातावरण खूप बंधनकारक होतं असं नाहीच. स्वतंत्र, स्वैर जरी नव्हतं तरी स्वतःची ओळख, अस्तित्व उमलणं यासाठी तेव्हाही ते पोषक होतं. मात्र फारसे जाचक नसले तरी काही शिस्तीचे नियम हे आपोआपच मनावर रुजलेले होते. एक वेळापत्रक नक्कीच होतं. भिंतीवरच्या कॅलेंडरवर परंपरेची वर्तुळही आखलेली होती. मग त्यात शुभंकरोती होतं, परवचा होत्या, नित्य नेमाचा अभ्यास होता, खेळणं किती, फिरणं किती, भटकणं किती, घरातलं वास्तव्य, भावंडांच्या कामाच्या वाटण्या आणि आयुष्य म्हणजे चांगलं भविष्य आणि भविष्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मेहनत या सर्वांचा एक अदृश्य आराखडा मनाशी बाळगलेलाच होता. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात इतकं काही जबरदस्त त्यावेळी बदललेलं नव्हतं. म्हणजे त्याही वेळेस वेगळे, वेगळ्या पातळीवरचे सामाजिक स्तर त्या त्या प्रमाणात होतेच पण नानीचं जीवन एका मधल्या धारेतलं होतं आणि याच आखलेल्या मार्गाने तिने तिच्या आयुष्याची इतकी मोठी वाटचाल केली होती. आणि आताही मागेपुढे पाहताना त्यावेळच्या काही नसण्यावर, नाहींवर, त्रुटींवर तिला अजिबात खेद नव्हता. नो रिग्रेट्स.
त्याही वेळेला ती एका नामांकित संस्थेत मोठ्या हुद्द्यावर स्वतःची प्रतिष्ठा सांभाळत होतीच की. एकाच वेळी दोन्ही पद संतुलित पणे तिने सांभाळली. गृहिणी पद आणि संस्थेतलं जबाबदार पद. तसे दोन्ही आघाड्यांवरती यशस्वी होती ती. पण कुठेच तिने मर्यादा सोडल्या नाहीत.अतिरेक,अवाजवीपणाच्या वाटेला ती गेली नाही. सासुबाईंसाठी सणावारी डोक्यावर पदर घेतला, वडाची पूजा केली, श्रावणी शनिवार, सोमवार पाळले. पितरांना जेवू घातलं. परंपरेच्या गर्भातले वैज्ञानिक अर्थ समजूनही तिने सारे काही बिन बोभाट पार पाडून सर्वांची मने राखली. निदान तसा प्रयत्न नक्कीच केला. उगीच किडूक मिडुक वादात ती पडलीच नाही.
ऐकूनही घेतलं. सासूबाई तरीही म्हणायच्या,” तुला वेळच कुठे असतो? तू तुझ्या ऑफिसच्या कामात? घर तुला नंतरच.”
नानीला काय वाईट नसेल वाटलं? पण उगीच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत ती तेव्हाही पडलीच नाही. नानांनी सुद्धा सगळं काही स्वीकारलं नव्हतं. विरोध नव्हता म्हणजे संपूर्ण संमती असा अर्थ नसतो. नानांच्या कन्व्हेनशनल मनाला नानीच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. ज्या ज्या वेळी नानी काळाप्रमाणे बदलायचं ठरवत असे त्या त्या वेळी नानांना त्यांचा गतकाळ आठवायचा आणि त्या पुन्हा पुन्हा नानीची पावलं मागे खेचायचे. गैरसोयीच्या आयुष्याला उदात्तपणा आणण्याचा प्रयत्न करायचे. प्रेम होतच पण घर्षणंही खूप कचकचणारी होती. नानीने केलं सहन. स्थैर्यासाठी. शेवटी काय? पिढीतले अंतर, संस्कृतीतील बदल हे काळाच्या पावला बरोबर अव्याहत सरकतच असतात, नाही का? आज आणि काल यातलं अंतर कधी मिटूच शकत नाही. मग आज या मिडलाईन वर उभे असताना, बदललेलं जग बघताना इतकं भांबावून, बिथरून कां जायचं? कदाचित काल आणि आज मधलं अंतर जास्तच वाढलंय म्हणूनही असेल.
नक्की काय बदललं याचा विचार करताना नानीला गंमतच वाटते. त्यादिवशी राघवचं आणि सुनेचं काहीतरी बिनसलं होतं. धुसफुस चालूच होती. कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं. पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈