श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ पाऊलखुणा 😔☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
आताच म्हनं त्यो युन ग्येला
म्या तर बा झुपलोच हुतो
आला कंदी नि ग्येला कंदी
मुटकुळं घालून निपचित हुतो
*
थबकल्याली पावलं त्याची
आवाज त्यांचो येनार कसा
समद्यांना भेटून बोलून ग्येला
म्या तं झोपलो मुडदा जसा
*
सावत्याभाऊच्या शेतात म्हनं
त्यानं बक्कळ पाऊस पाडला
माज्या आंगनांत चार थेंब
शिंपडाया मातुर इसरुन ग्येला
*
तुक्या नाम्या हासत ख्येळत
पार लांब दिसले गेले
टाळी देत गप्पा हानत
द्रिष्टीच्याही पल्याड गेले
*
बहिना, मुक्ता, सखू, जनाई
ओवी आभांग म्हनत गेल्या
जाता जाता भान इसरुन
झिम्मा फुगड्या घालून ऱ्हायल्या
*
म्या तं बा कप्पाय करंटा
ऐन वख्ताला झोपुन ऱ्हायलो
भाकर तुकडा समद्यांस्नी गावला
म्या तं पापी उपाशीच ऱ्हायलो
*
सोतावरतीच रुसलो चिडलो
डोल्यात पानी भरून रडलो
डोले टिपता आयन्यांत पाह्यलं
नि तीन ताड उडुन राह्यलो
*
इस्वासच बसेना आसं झालं
कुनि तरि यून ग्येलं हुतं
कपायावं माज्या आबिर बुक्का
नि गुलालाचं बोट टेकलं हुतं
*
मंजिरिंचा हार गल्यातं दिसला
नि खिशात फुटान्यांची पुडी
ह्या खरां कां सपान कललंच न्हाई
पन् हातांची मातर जमली जुडी
*
आशीच नाती ऱ्हाउंद्या द्येवा
आवती भोवती फिरत ऱ्हावा
किरपा तुमची हाय याची
चिन्हा मातर दावित जावा
☘️
© सुहास सोहोनी
दि. ३०-४-२०२४
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈