श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एका सैनिकाची एकहाती लढाई ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आज आठ एप्रिल,२०२०….उजवा हात कोपरापासून कापून काढला गेला त्या घटनेला एक वर्ष झालंय जवळपास. कुण्या सम्राटानं कारागीरांना एक सुंदर वास्तू निर्मायला लावली आणि तशी वास्तू पुन्हा कुणीही उभारू नये म्हणून त्या कारागीरांचे हातच कापून टाकल्याचं ऐकलं होतं….त्या कारागीरांच्या आत्म्यांना काय क्लेश झाले असतील नाही? मी सुद्धा एक कारागीरच की. फक्त मी काही घडवत नव्हतो..तर काही राखीत होतो….होय, देशाच्या सीमा! ११ ऑक्टोबर,१९८० रोजी मी या जगात आलो आणि समजू लागल्याच्या वयापासून अंगावर सैन्य गणवेश चढवण्याचंच स्वप्न पाहिलं. वयाच्या अठराव्या वर्षी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी सैन्य अधिकारी म्हणून रुजू झालो आणि २००२ मध्ये वडीलांच्या पावलावर पाऊल टाकीत सैन्यात अधिकारी झालो. मनात सतत काहीतरी धाडसी करण्याची उर्मी होतीच म्हणून स्पेशल फोर्सेस मध्ये स्वत:हून दाखल झालो…..आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर पॅरा कमांडो म्हणून यशस्वीरीत्या प्रशिक्षित झालो आणि २,पॅरा एस.एफ. या भारतीय सैन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या दलात सामील झालो….एक स्वप्न पूर्णत्वास गेले होते. रक्तच सैनिकी होतं…सैन्यातलं सगळंच आवडायचं. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पुढे असायचोच. माझी कामगिरी बघून सैन्याने मला भूतान या आपल्या शेजारी मित्र देशाच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्याच्या कामगिरीवर धाडले. भूतान मधील मिशन पूर्ण करून भारतात परत येताच मला जम्मू-कश्मिर येथे पाठवण्यात आले. इथं तर काय माझ्या उत्साहाला पूर्णत: वाव होता. किती तरी अतिरेकी-विरोधी कारवायांत मी अग्रभागी असायचो. २००८ मध्ये अशाच एका कारवाईत मी दोन अतिरेक्यांचा पाठलाग करून त्यांना अगदी जवळून गोळ्या घालून यमसदनी पाठवलं…..याबद्दल मला शौर्य चक्र बहाल करण्यात आलं. खरं तर ते माझं कामच होतं…किंबहुना स्पेशल फोर्सेस कमांडोजचं तर हे काम असतंच असतं. माझं हे काम पाहून सैन्याने मला आणखी एक जबाबदारी सोपवली….परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची…कोंगो या आफ्रिकी देशात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेत मिलिटरी ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून मी काही काळ काम केले.
तुम्हांला आठवत असेलच….२०१६ मध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते…..सर्जिकल स्ट्राईक! यावेळीही मी याच भागात कर्तव्यावर होतो! आणि आता तर मी २ पॅरा एसएफ चा कमांडिंग ऑफिसर बनलो होतो…जबाबदारी आणि अर्थातच कामेही वाढली होती. माझ्या जवानांना मला सदोदित सज्ज ठेवायचं होतं,सक्षम ठेवायचं होतं आणि यासाठी मी स्वत: सक्षम होतो! एके दिवशी मी एकवीस किलोमीटर्सच्या मॅरेथॉन स्पर्धेत धावलो. उजवा हात खूप दुखू लागला. हातावर एक मोठी गाठ आल्यासारखं झालं. रीतसर तपासण्या झाल्या आणि माझ्यावर एक हातगोळा येऊन पडला…खराखुरा नव्हे…आजाराचा! सहकारी,मित्र मला म्हणायचे..तु फार वेगळा आहेस…अगदी दुर्मिळातला दुर्मिळ प्रकारचा माणूस आहेस! मग मला आजार तरी सामान्य कसा होईल? काय नाव होतं आजाराचं माहित आहे? telangiectatic osteosarcoma! आनंद चित्रपटात राजेश खन्नाला असाच काहीसा वेगळा आजार होता..आठवत असेल तुम्हांला! चित्रपटातला हा आनंदही इतका जीवघेणा आजार होऊनही शेवटपर्यंत हसतमुख राहतो….मी तसंच रहायचं ठरवून टाकलं मनोमनी. माझ्यावर उपचार करणारे एक डॉक्टर तर म्हणाले सुद्धा…कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातही एवढा हसतमुख रुग्ण मी आजवर पाहिला नाही! मी म्हणायचो…का भ्यायचं मरणाला? मी सैनिक आहे हाडामांसाचा. रोज एक नवी लढाई असते…जिंकायची असते सर्वस्व पणाला लावून.
केमोथेरपी सुरू झाली. एक वर्ष उलटून गेलं आणि शेवटी नाईलाज म्हणून माझा उजवा हात कोपरापासून कापून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला! हे ऑपरेशन होण्याच्या आठ दिवस आधीपर्यंत मी कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत होतो. शेवटी एकदाचा उजवा हात माझ्या शरीरापासून विलग करण्यात आला! सैनिकाचा उजवा हात म्हणजे त्याचा जीव की प्राण. उजव्या हातानेच तर फायरींग करायचं असतं रायफलीतून….आणि माझा नेम तर अगदीच अचूक असायचा!
या राईट हॅन्ड अॅम्प्युटेशन ऑपरेशन नंतर मी लगेचच कर्तव्यावर रुजू झालो….सदैव सैनिका पुढेच जायचे…न मागुती तुला कधी फिरायचे! मी रुग्णालयातून घरी म्हणजे माझ्या सैन्य तुकडीत परत आल्या आल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे माझी सायकल मला हवी तशी सुधारून घेतली…एका हाताने सायकल धरून चालवता आली पाहिजे अशी. स्वत:चं स्वत: आवरायला शिकलो, युनिफॉर्म घालणे, बुटाच्या लेस बांधणे….जखमेची मलमपट्टी करणे आणि हो डाव्या हाताने अचूक फायरींग करणे! माझ्या आडनावातच बल हा शब्द…बल म्हणजे सामर्थ्य! डाव्या हाताच्या सामर्थ्यावर सर्व जमू लागले..इतकंच नव्हे…जीपही चालवायला लागलो….एक हाती! आणि हो…पुन्हा पार्ट्यांमध्ये नाचूही लागलो….आधीसारखा. “Never give in, never give in, never, never, never, never – in nothing, great or small, large or petty – never give in except to convictions of honor and good sense” – Sir Winston Churchill. विन्स्टन चर्चिल यांनी म्हणून ठेवलंय…काहीही झालं तरी माघार घेऊ नका….स्वाभिमान आणि सदसदविवेकबुद्धीचं रक्षण यासाठी काहीही करा!
सौ.आरती…माझ्या सौभाग्यवती…अर्धांगिनी. एखाद्या पर्वतशिखरासारख्या… अतिशय खंबीर. त्यांनीच मला धीर द्यावा,माझी काळजी घ्यावी एखाद्या लहान बाळासारखी. मी पंजाबी जाट तर त्या दाक्षिणात्य. शाळेत असल्यापासून आमचा परिचय. त्यातून प्रेम आणि पुढे त्यातून विवाह. दोन गोंडस मुलगे दिलेत आम्हांला देवाने. आम्ही यावेळी बंगळुरू मध्ये आहोत. आई-बाबा दूर तिकडे एकवीसशे किलोमीटर्स अंतरावर असलेल्या दिल्लीला असतात. एक भाऊही आहे.
सारे काही आलबेल आहे असं वाटत असताना समजलं…कॅन्सर खांद्यापाशी संपला नव्हता….सा-या शरीरभर त्याने हातपाय पसरले होते! आता निघावं लागणार…..जावं लागणार…इथली कामगिरी आता संपलीये! मी या रूग्णशय्येवर…नव्हे मृत्यू शय्येवर नेमका दिसतो तरी कसा? पहावं तरी. म्हणून माझ्याच डाव्या हातानं मोबाईल कॅमेरा वापरून सेल्फी घेतला…स्वत:कडे स्मित हास्य करीत!
ते क्षण आता फार दूर नसावेत असं दिसतंय.
मी कागद लेखणी मागून घेतली…आणि लिहिलं…मी मरणाच्या भीतीला भीक न घालता…चांगल्या वाईट दैवाचा नेटाने सामना केला! विल्यम अर्नेस्ट हेनले या कवीने जेंव्हा त्याचा स्वत:चा एक पाय,तो अवघ्या सतरा वर्षांचा असताना गमावला होता, तेंव्हा Invictus means ‘unconquerable नावाचा काव्य लिहिलं होतं. त्यातील शेवटच्या ओळी होत्या. …..I am the master of my fate: I am the captain of my soul. ती मीच माझ्या नशिबाचा मालक आणि माझ्या आत्म्याचा कर्ताधर्ता!
यापुढे माझे दोन्ही मुलगे माझा अभिमानाचा वारसा चालवतील…
आरती, प्रिये..माझे प्राण तुझ्यातच तर श्वास घेतात…
आज माझ्या शरीरात चैतन्य आहे आणि मी
आपला तिरंगा अभिमानानं फडकवतोय आभाळात….
भारत माते…तुझ्या चरणाशी हा माझा अखेरचा प्रणाम!
हे मृत्यो….उगाच गमजा करू नकोस…मी जिंकलो आहे आणि अमर झालो आहे!
माझे अंत्यविधी इथेच,माझ्याच जवानांच्या उपस्थितीत करावेत….ही माझी अंतिम इच्छा राहील.
आई-बाबा,भाऊ दिल्लीहून बंगळुरूला यायला निघालेत…कारण माझ्या अंतिम इच्छेचा मान राखून सैन्याने माझा अंत्यविधी इथंच करायचं ठरवलं आहे…दिल्ली ते बंगळुरू….प्रवासाचा पल्ला मोठा आहे. त्यात कोरोनाची महामारी सुरू आहे…विमानसेवा उपलब्ध नाही.त्यांना यायला आणखी तीन दिवस तरी लागतील सहज…म्हणजे १३ एप्रिल…२०२०..बैसाखीच्या जवळचा पवित्र दिवस! याच दिवशी माझ्यावर अंत्यसंस्कार होतील…काय योगायोग आहे ना? जय हिंद !
(कर्नल नवज्योतसिंह बल, शौर्य चक्र विजेते. कमांडिंग ऑफिसर, २,पॅरा एस.एफ. यांचं हे मी माझ्या शब्दांत मांडलेलं मनोगत. कॅन्सरसारख्या भयावह आजारात उजवा हात कोपरापासून कापला गेल्यानंतरही नवज्योतसिंह बल साहेबांनी आपली सैन्य सेवा अव्याहतपणे आणि अतिशय दर्जेदाररीत्या सुरू ठेवली….ती अगदी रुग्णालयात मृत्यूशय्येवर जाऊन नीजेपर्यंत. ९ एप्रिल,२०२० या दिवशी कर्नल साहेबांनी या जगाचा हसतमुखाने निरोप घेतला. आज त्यांचा चौथा स्मृतिदिन. कर्नल साहेबांना भावपूर्ण आदरांजली ! जय हिंद.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈