डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(“अग पुष्पा,काय ग सुंदर हापूस हा ! असला अस्सल हापूस कित्ती वर्षांनी खाल्ला मी .. वा वा.”) – इथून पुढे
त्या मे महिन्यात दोघीनी खूप मजा केली.सारसबागेत फिरल्या मंडईत गेल्या, पर्वती चढल्या. दमून हाश हुश करून उसाचा रस प्यायल्या. . त्या रात्री बोलता बोलता मीना म्हणाली, “ पुष्पा, एक कल्पना येतेय मनात .. सांगू का?बघ आवडते का. पटली तर हो म्हण नाही तर नको.आपण असं दोघीनी एकेकट्या रहाण्यापेक्षा एकत्र राहून बघूया का?काही महिने माझ्या मुंबईच्या घरात तर काही महिने तुझ्या पुण्याच्या घरात.म्हणजे दोन्ही घरं चालू रहातील आणि आपल्याला आपली कंपनीही मिळेल.तुझी मुलगी आली की तू पुण्याला जा,मुलगी नातवंडं यांच्या बरोबर रहा, मग ती मुंबईला येईल मुलं घेऊन.आणि माझ्याकडेही रहातील ते.चालेल का? एक पथ्य पाळायचं. कोणीही कितीही गॉसिप केलं,काड्या घालायचे प्रयत्न केले तरी अजिबात लक्ष द्यायचं नाही. सर्व खर्च आपण निम्मे निम्मे वाटून घेऊ. दोन्ही घरांचे.काही वाद झाले तर लगेच सोडवून टाकायचे.चालेल का? “ मीना म्हणाली. नाहीतरी त्या दोघीत मीना हुशार, व्यवहारी जग बघितलेली होती, हे पुष्पाला चांगलंच माहीत होतं. हा प्रयोग दोघीनी करायचं ठरवलं. इतक्यात कलिका प्रशांतला काहीच नको सांगायला असं ठरवलं दोघीनी. सहा महिने खूप मजेत सुरळीत गेले आणि मग मीनाने ही ऐडजस्टमेंट मुलांना सांगून टाकली. कित्ती आनंद झाला त्या दोघांना . प्रशांत सरळ म्हणाला “सासूबाई,तुमची मला खात्री आहे हो पण आमच्या आईसाहेब जरा विचित्र आहेत. तुम्हाला त्रास नाही ना होत तिचा?नाहीतर नका असले प्रयोग करू हं. तुम्ही खूप समजूतदार आहात.”
मीना हसून म्हणाली, “ नाही रे. खूप बदलली आहे पुष्पा. आता.तशी ती भाबडी आहे.मस्त जमतंय आमचं. तुम्हाला सांगू? पुढच्या महिन्यात बँकॉक ट्रिप करतोय आम्ही केसरीबरोबर. आहे ना मजा?कुठं गेले नाहीये रे मी कित्ती वर्षात.कलिकाचे बाबा गेल्यानंतर नाही जमलं कुठं जायला पण आता पुष्पाची मस्त कंपनी मिळालीय तर जाऊ अशा ट्रिपाना. नशिबाने दोघींकडे चांगला पैसा आहे तर येतो जाऊन “ .
प्रशांत म्हणाला “ क्या बात है. जरूर जा सासूबाई मजा करा.”
त्या दोघी नंतर अशा छोट्या ट्रिप्स करू लागल्या.दोघीनी एक पथ्य पाळले .तुझी मुलगी माझा मुलगा हे विषय अजिबात बोलायचे नाहीत. वादाचे मुद्दे बंद.पुष्पाने स्वयंपाकघराचा ताबा घेतला तर मीना बँक हिशेब बिले हे सगळं चोख बघायची.बिल्डिंगमधल्या भोचक बायकांना सुगावा लागलाच,की विहिणी विहिणी एकत्र रहातात. त्यांना आश्चर्यच वाटले आणि कधी भांडणं होतात याकडे लक्ष ठेवून होत्या बायका. प्रयत्नही करून झाले भांडणे लावायचे पण या दोघी भक्कम होत्या. कधीही त्यांनी या लोकांना थारा दिला नाही. मुलांना अतिशय आनंद झाला आणि हायसं वाटलं की आपल्या आया एकेकट्या पडल्या नाहीत आता.एकमेकींना धरून रहात आहेत आणि आयुष्य छान जगत आहेत. त्या दिवशी कलिकाचा फोन आला पुष्पाला. “ अहो आई गम्मत सांगायची आहे तुम्हाला.माझ्या ऑफिसमध्ये मी सहज लंच ब्रेकमध्ये सांगितलं ना की माझी आई आणि सासूबाई खूप महिने हल्ली एकत्र रहातात तर मला भेटायला आमच्या ऑफिसमधली केटी घरी आली. म्हणाली कलिका,खरंच का तुझ्या सासूबाई आणि आई एकत्र रहातात? पटतं का ग त्यांचं?कशी करतात ऐडजस्टमेंट त्या?” सगळं सीरिअसली विचारत होती हो.मी म्हटलं “ का ग केटी?का विचारते आहेस तू?” तर म्हणाली “अग माझी आणि माझी विहीण जेनीचीही सेम आहे परिस्थिति. कंटाळलो आहोत एकेकट्या राहून. मी जेनीला तुझ्या सासू आणि आईचं सांगितलं तर म्हणाली आपण बघूया का असं राहून?आम्ही सध्यातरी चार महिने बघणार आहोत कसं जमतं ते .जमलं तर बघू.’बघा सासूबाई,किती मस्त होईल ना त्यांचं ही जमलं तर.” कलिका सांगत होती. “ इकडे खूप कंटाळतात हो माणसं अशी एकेकटी राहून.थँक्स तुम्हा दोघीना हं. “ मीना आणि पुष्पाला हे ऐकून फार आनंद झाला.,एकटेपणाचे दुःख त्यांनीही नव्हते का सोसलं?
त्या दिवशी दोघी बागेत फिरून आल्या आणि सहज सोसायटीतल्या बाकावर बसल्या.शेजारच्या विंग मधले जोग काका त्यांच्या जवळ आले.” जरा बसू का मी इथं पाच मिनिटं?” जोग काकांनी विचारलं.”अहो बसा की त्यात काय विचारायचं?” पुष्पा म्हणाली.
जोग म्हणाले, “ तुम्ही प्रशांतच्या आई ना?आणि या सूनबाईंच्या आई, हो ना?” “ हो हो आम्ही विहिणी आहोत दोघी. का हो?” जोग म्हणाले “ गेले चार वर्षे तुम्हाला आम्ही एकत्र रहाताना बघतोय.मोकळेपणाने विचारतो,जमतं का हो असं राहून?मला फार कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.रागवू नका हं.”
“ अहो त्यात काय रागवायचंय?आम्ही चार नाही हं पण सहा वर्षे झाली अशा मजेत रहातोय.मस्त पटतं आमचं. आता या वयात कसली हो भांडणं आणि मानपान?आम्ही आता विहिणी आहोत हेच विसरून गेलोय “.जोग म्हणाले “ आणि नोकर, घरखर्च, हॉटेल असे खर्च कसे करता?” “ते आम्ही निम्मे निम्मे करतो. डॉक्टरचे खर्च मात्र ज्याचे त्याने करायचे असं ठरवून घेतलंय आम्ही.”
जोग म्हणाले “ कौतुक वाटतं आम्हाला तुमचं दोघींचं हो.पहिल्यांदा मीही साशंक होतो की या दोन बाया कशा काय राहणार कायम एकत्र.त्यातून हे नातं किती नाजूक. पण तुम्ही ते खोटं ठरवलंत.शाब्बास. आता एक गम्मत सांगतो.आम्ही दोघे मित्र मी आणि शेजारचे भाटे असेच शेजारच्याच फ्लॅट्स मध्ये राहतोय कित्ती वर्ष दोघेही एकेकटेच. दोघांचीही मुलं परदेशी आणि आमच्या बायकाही लवकर गेल्या म्हणून समदुःखीही आहोत.तुमच्या उदाहरणावरून वाटलं आपणही मित्रांनी एकत्र राहून बघावं का?म्हणून तुम्हाला विचारायला आलो .,भाटे म्हणाला जा रे त्या दोघीना विचारून ये.आपण पण राहूया असे.” जोग हसत म्हणाले. मीना हसून म्हणाली “ अहो मस्त घेतलात निर्णय.खूप फायदेही आहेत या सहजीवनात.खर्च कमी होतो,हाकेला कोणीतरी आहे याचा आधार वाटतो आणि एकटेपण जाणवत नाही.जरूर रहा तुम्हीही.अहो या उतार वयात ,मुलं परदेशी असताना आपण असं एकाकी का रहायचं हो?पुष्पा सांग ना याना आपला निर्णय किती योग्य ठरला ते.” पुष्पा म्हणाली “ खरंच रहा तुम्ही आणि भाटे एकत्र.मस्त ट्रिप ना जा, हॉटेलात जा फार्म हाऊस ला जा. ही लास्ट इनिंग मस्त जगा आमच्या सारखीच.’
“ मीनाताई,पुढच्या महिन्यात आपल्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये या विषयावर एक टॉक द्याल का? मी सुचवलंय तुमचं नाव.” “ देईन की त्यात काय. नाहीतरी हाडाची प्रोफेसर आहेच मी आणि हे सहजीवन आम्ही यशस्वी करून दाखवलंय असं आता इतक्या वर्षांनी म्हणायला हरकत नाही हो ना? “ मीना हसत हसत म्हणाली. जोग म्हणाले “ चला मग.त्या टपरीवर मस्त चहा पिऊ या. तो बघा भाटे आलाच.”
हसत हसत सगळे मजेत चहा प्यायला टपरीवर गेले.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈