सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

(त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.) – इथून पुढे 

मला पुढे १९७० साली, सांगलीला डी.एड्. कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर मी एम.ए. झाले. याच सुमाराला आम्ही आमचं स्वतंत्र छोटंसं घरकुल माधवनगरलाच मांडलं होतं. आमच्या लग्नाला दहा वर्षं झाली. आणि प्रकृतीने ‘अमोल’ ठेवा आमच्या पदरात टाकला. आता प्रश्न होता, नोकरी सोडायची की काय? पाळणाघर, किंवा मुलाला सांभाळायला बाई, ही मानसिकता घरात, समाजात तितकीशी रुजलेली नव्हती. प्रश्न होता, त्यावेळी नोकरी सोडली, तर चारसहा वर्षांनी, मुलाची सातत्याने देखभालीची गरज संपल्यावर, पुन्हा खात्रीपूर्वक नोकरी मिळेलच याचा काय भरवसा? माझ्या शेजारणीने माझ्या नोकरीच्या वेळात मुलाला सांभाळायचे कबूल केले, आणि माझ्या सासुबाईंनी आणि यांनी दोघांनीही मुलाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि माझी नोकरी अखंडितपणे चालू राहिली. नोकरीच्या वेळा बांधील असतात. धंद्याचं तसं नसतं. यांचा यंत्रमागावर कापड काढून देण्याचा व्यवसाय होता. तो माधवनगरातच होता. त्यामुळे गरजेप्रमाणे ते वेळ काढू शकत होते आणि तसा त्यांनी काढलाही. मुलाला वाढवताना आम्ही दोघांनी बरोबरीने जबाबदारी उचलली. यांनी कांकणभर जास्तच उचलली.

नोकरी, घरकाम, छोट्याचं संगोपन या सा-यात दिवस कधीच संपत असे. माधवनगरात तेव्हा पाण्याची खूप टंचाई होती. आजही आहेच. त्या वेळी चार-पाच दिवसातून एकदा पाणी यायचं. ते थोडंच असायचं. पिण्यापुरतं यायचं. बाकी वापराला विहिरीचं पाणी असे. पाणी ओढण्याचं काम यांनी स्वखुषीने स्वीकारलं होतं. बाजारहाटही ते करत. त्यामुळेच स्वयंपाक-पाणी, धुणं-बिणं सगळं उरकून मला नोकरीसाठी वेळेवर जाणं शक्य होत होतं. नोकरी म्हटली की तिथल्या जबाबदा-या, कर्तव्यं आलीच. अमोल दहा महिन्याचा असताना त्याला घरी ठेवून मला प्रशिक्षणासाठी दहा दिवस सातारला जावं लागलं होतं. पण यांनी सासूबाईंच्या मदतीने कोणताही गाजावाजा, गवगवा न करता मुलाला सांभाळलं. जाऊबाई, पुतणे-पुतण्या ही मंडळी पण होतीच!

मुलगा चार वर्षाचा झाला आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी म्हणून सांगलीला बि-हाड केलं. तिथे त्याच्याबरोबर माझंही अनुभवक्षेत्र वाढत – विस्तारत गेलं. आवडी-निवडी जपायला, जोपासायला संधी मिळाली. कार्यक्रमातला सहभाग वाढला. श्रोता-प्रेक्षक म्हणून जाताना मुलाला बरोबर घेऊन जाणं, निदान पहिली काही वर्षं तरी अपरिहार्य होतं. जमेल तेवढं ऐकायचं. पाह्यचं. कविसंमेलन, व्याख्यानं, कथाकथन इ. मध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असे, तेव्हा मुलगा लहान असताना यांनी बघितलं. एक बरं होतं. या सा-या कार्यक्रमांत माझा सहभाग असावा, याबद्दल आमचं एकमत झालं. दुमत असतं तर… जाऊ दे. तो विचारच नको.

सांगलीला आल्यावर मला मिळणारा अवकाश वाढला असला तरी मला सुचतंय म्हणून आज बाकीची कामं बाजूला राहू देत. मी लिहीत बसते. एवढा आवाका मला कधीच लाभला नाही. घर, स्वयंपाक-पाणी, नोकरी-चाकरी संभाळून जमेल तसं आणि तेवढंच माझं लेखन झालं. मी वलयांकित लेखिका नव्हते, हेही त्यामागचं कारण असू शकेल. माझ्या घरकामात नाही, तरी मुलाच्या संगोपनात यांचं सहाय्य नक्कीच होतं.

आता घरकामात नाही असं म्हणतानाही बाजारहाट तेच करायचे हे मला कबूल करायलाच हवं. सगळ्यांत महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्यावरचा पहिला चहा हेच करायचे आणि आल्या-गेल्यांना अगदी आवर्जून सांगायचे सुध्दा! मग मी म्हणायची, ‘सकाळी गाडीत एकदा पेट्रोल भरलं की गाडी दिवसभर न कुरकुरता चालू राहते…’

नोकरीच्या काळातही एक आठवण आवर्जून नोंदवाविशी वाटते. मिरज तालुक्यातील प्रौढ साक्षरांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिच्यात माझा समावेश होता. हे काम रात्री प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झाल्यावर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावी जाऊन करायचं असे. सुमारे महिना-दीडमहिना हे काम चाललं. मलाच कानकोंडं होई. पण या मुद्यावरून यांनी कधी खळखळ केली नाही.

आता हे सगळं वाचताना कुणालाही वाटेल तुम्ही तुमच्याबद्दल खूप लिहिलंत. त्यांच्याबद्दल काय? तर ते त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांना हवं तसं जगत होतेच! हवं ते करत होते. पुरुष असल्यामुळे त्यांना त्यांचा अवकाश जन्मत: प्राप्त झाला होता. मलाही त्यांनी काही प्रमाणात तो प्राप्त करून दिला. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट.

सांगली आकाशवाणीवरून ‘प्रतिबिंब’ ही श्रुतिकामाला सुमारे दहा-बारा वर्षं प्रसारित होत होती. त्यातील शंभर तरी श्रुतिका मी लिहिल्या असतील. श्रोत्यांनाही त्या पसंत पडत असल्याचं कळत होतं. ते संवाद, त्यातील वाद-विवाद आमच्या घरातल्या संवाद-विवादातून लिहिलेले असत. त्याला थोडी झिलई, चकचकीतपणा मी माझ्या लेखनातून दिलेला असे, एवढंच!

माझ्या लेखनाचा महत्त्वाचा स्त्रोत यांच्या वाणीतूनही अनेकदा उगम पावलेला आहे, तो असा! श्रुतिका ऐकल्यावर माझी एक मैत्रीण मुग्धा आपटे मला म्हणाली होती, ‘आमच्या घरात आम्ही जे बोलतो, ते तुला कसं कळतं?’ मी म्हटलं, ‘घरोघरी गॅसच्या शेगड्या… दुसरं काय?’

याचा अर्थ माझी वाटचाल अगदी मऊ मखमलीवरून झाली, असं मुळीच नाही. रेशमी काटे अनेकदा टोचले. अधून मधून बाभळीच्या काट्यांनीही रक्तबंबाळ केलं. भांड्याला भांडं अनेकदा लागलं. नुसता नाद नव्हे, खणखणाटही झाला.

लोकगीतातील ग्रामीण स्त्री आपल्या नवऱ्याच्या रागाला इंगळ्या इस्तुवाची उपमा द्यायची आणि आपण गोड बोलून चतुराईनं कसं ‘विसावण’ घालतो, याचं वर्णन करायची. मला असं विसावण घालणं कधी जमलं नाही. पण यांना जितक्या लवकर राग यायचा, तितक्याच लवकर तो निवायचाही. मग उगीचच काही तरी बोलून, हसवून ते वातावरणातला ताण दूर करतात. इच्छा नसतानाही मग मला फस्सकन हसू येतं. ‘तुझं नि माझं जमेना…’ असं अनेकदा म्हणता म्हणताच, ‘परि तुझ्यावाचूनि करमेना…’ याही सार्वकालिक सत्याचा प्रत्यय येतो.   

– समाप्त –

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments