श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ दोन लघुकथा — डायबिटीस प्रेम / नव्या वळणावर ☆ श्री मंगेश मधुकर ☆
[१] डायबेटीस प्रेम
बराच वेळ डॉक्टर रिपोर्ट पहात होते त्यामुळं अनंतची अस्वस्थता वाढली.
“अनंतराव,तपासण्या करून घेण्याची सुबुद्धी कशी काय झाली.त्यातही दोघांनीही तपासण्या केल्या हे चांगलं केलंत”डॉक्टर हसत म्हणाले.
“काही सीरियस?”
“खास नाही.अभिनंदन!!आयुष्यभर सोबत करणारा नवीन नातेवाईक आलायं”
“डायबेटीस”
“हो,काळजी घ्यावी लागेल.शुगर जास्त आहे.औषधं देतो पण सवयी बदलून पथ्य काटेकोरपणे पाळावी लागतील.” डॉक्टरांचा निरोप घेऊन विचारांच्या तंद्रीतच अनंत घरी आला.
“रिपोर्ट आले.काय म्हणाले डॉक्टर.सगळं व्यवस्थित ना.”अनीतानं एकापाठोपाठ प्रश्नांचा भडिमार केला.
“काही विशेष नाही”
“म्हणजे काहीतरी आहे.तुम्हांला चांगलं ओळखते”
“शुगर खूप वाढलीय”
“अरे बाप रे!! मग”
“औषध दिलीत आणि पथ्य सांगितलीयेत.”
“काळजी करू नका.तसंही आपण जास्त गोड कुठं खातो”
“आपल्याला वाटतं पण रिपोर्ट काही वेगळंच सांगतायेत.आजपासून चहा बंद”अट्टल चहाबाज अनंतचा गळा दाटून आला.
“पथ्य म्हणजे अवघड आहे.तुम्हांला गोड तर अतिप्रिय.”
“फक्त मलाच???तू पण गोड खाण्यात तोडीस तोड आहेस”
“मग असं करू आपण दोघंही मिळून पथ्य पाळू.दोघात तिसरा आता गोड विसरा.”अनीतानं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
“मग काय काय खाणं बंद करायचं.”
“जे जे आवडतं ते सगळं..”
“इतक्या वर्षांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी एकदम कशा बदलायच्या.तुम्हांला जमेल”
“जमवावं लागेल.नाहीतर.. ”
“काय होईल”
“औषधाबरोबरच इन्सुलिन सुरू करावं लागेल.”
“बाप रे.त्यापेक्षा नव्या नातेवाईकाचा पाहुणचार जोडीनं करू या.एक से भले दो.”
“नको.माझ्यासाठी इच्छा मारू नकोस.बिनसाखरेचा चहा,कारल्याची भाजी यागोष्टी झेपणार नाहीत.खूप त्रास होईल.”
“चॅलेंज देऊ नका.मी ठरवलं तर काहीही करू शकते.”
“रोज किमान अर्धा-पाऊण तास चालायला सांगितलेय.मला चालण्याचा जाम कंटाळा.तू बरोबर येशील.”
“हे बरंयं.बोट दिलं तर तुम्ही हात पकडताय.असं वाटतयं की डायबेटीस मलाच झालाय”
“शुभ बोल.”
“त्रास होतो म्हणून तपसण्या केल्या अन भलतंच झालं.माझे रिपोर्ट नॉर्मल आले आणि तुम्हांला….”
“शंका असेल तर चेक कर”
“अहो,तसं नाही तुमच्यावर विश्वास आहे.या साखर बंदीचा फार त्रास होणार.”
“तो कसा काय?”
“मनाला आणि शरीराला बदल झेपायला पाहिजे ना.”
“आता यावर नंतर बोलू.चल आवर फिरायला जाऊ.”
“आजपासूनच..”अनीता
“कल करे सो आज कर म्हणूनच आता डायबेटीस लाईफचा श्रीगणेशा आजच..”
“हे किती दिवस”
“सध्या तरी तीन महीने नंतर पुन्हा तपासण्या करू आणि मग डॉक्टर सांगितल तसं..”अनंत-अनीताचं नवीन रुटीन सुरू झालं.गोड खायची खूप इच्छा व्हायची पण मोह आवरला.बिनसाखरेचा चहा घशाखाली उतरायचा नाही म्हणून दिवसातून चार-पाच वेळा होणारा चहा दोनवर आला.जेवणात कारल्याचं प्रमाण वाढलं.सकाळी व्यायाम आणि संध्याकाळी चालणं सुरू झालं.तीन महिन्यांनी तपासण्या करून डॉक्टरांकडे गेले. अनीता रिसेप्शनिस्टशी बोलत असताना अनंत लगबगीनं आत गेले.
“डॉक्टर,एक महत्वाचं सांगायचंय”
“बोला”
“हिला डायबेटीस विषयी..”तितक्यात अनीता आल्यामुळे अनंत गप्प बसले.
“डायबेटीस विषयी काय म्हणत होता”डॉक्टरांनी विचारलं.
“काही विशेष नाही.तुम्ही सांगीतल्याप्रमाणे पथ्य पाळीलीत.अजून काही काळजी घ्यायची का?’
“सांगतो.”
“वा,वा!!वहिनी,रिपोर्ट एकदम नॉर्मल.काळजीचं कारण नाही”डॉक्टर.
“थॅंकयू डॉक्टर!!यांचा डायबेटीस काय म्हणतोय”
“मला शुगरचा त्रासच नाहीये”गडबडलेले अनंत पटकन म्हणाले.
“तेच तर …डायबेटीस तुम्हांला आहे.त्यांना नाही.”डॉक्टरांचं बोलणं ऐकून अनीताला धक्का बसला.
“डायबेटीस आहे म्हणून यांनी तीन महीने कडक पथ्य पाळलीयेत”
“चांगलयं की मग!!अनंतराव ठणठणीत आहेत.बिनधास्त गोड खाऊ शकतात.तुम्ही मात्र पथ्य आणि व्यायाम असाच चालू ठेवा.काहीही प्रॉब्लेम होणार नाही.”रिक्षातून येताना अनीता एकही शब्द बोलली नाही.त्यामुळं आता काय होणार या विचारांनं अनंताला टेंशन आलं.
“खोटं का बोललात”घरात पाऊल टाकताक्षणीच अनीताचा प्रश्न.
“खोटं बिटं काही नाही उलट डायबेटीस होऊ नये म्हणून मी सुद्धा काळजी घेतली”
“मन मारून..”
“इतकी वर्षे गोड खातोय.काही दिवस बंद केलं तर काही बिघडत नाही. ”
“माझ्यासाठी केलंत ना” भरल्या डोळ्यांनी अनितानं विचारलं.
“आपल्यासाठी..”
“डायबेटीसचं कळल्यावर घाबरले असते आणि माझं गोडावरचं प्रेम बघून कोणतीच पथ्य पाळली गेली नसती म्हणूनच हा खेळ केलात ना”
“यामुळे फायदाच झाला ना.तुझी शुगर कंट्रोल मध्ये आली आणि माझंही थोडं वजन कमी झालं.”
“चहा चालेल”
“पळेल”अनीतानं चहाचा कप दिला.पहीला घोट घेतल्यावर अनंतानं विचारलं “हे काय”
“अडीच चमचे साखर घातलीये.गोड चहा आवडतो ना.बिनधास्त प्या”
“अगं पण तुला..”
“तुमच्या प्रेमामुळे माझाही चहा एकदम गोड आहे.” अनीता अशी काही लाजली की अनंतच्या काळजाचं पाणी पाणी झालं.त्याच वेळी रेडिओवर सुरु असलेलं “बहोत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो….. ” हे गाणं अनुराधा पौडवाल आपल्यावतीनं गात आहेत असचं दोघांना वाटलं.
[२] “नव्या वळणावर…”
सकाळची गडबडीची वेळ, किचनमध्ये आवराआवर सुरू होती.नवरा मित्राला भेटायला निघाला.
“अहो,बाहेर जाताय तर एक काम करणार”जरा भीत भीतच विचारलं.
“बोला”
“टोमॅटो अन बटाटे आणता”काही बोलले नाहीत पण चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसला.
“आणतो”
“आधी बटाटे घ्या आणि नंतर ..”पिशवी देताना म्हटलं तर नवरोबा प्रचंड चिडले.
“विनाकारण अक्कल शिकवू नकोस”
“धांदरटपणा माहितीये म्हणून सांगितलं”
“तुझा बावळटपणा काढू का?” झालं!! रोजच्याप्रमाणं ‘तू तू .. मै मै..’ सुरू झालं.शेवटी हातातली पिशवी फेकून दार आपटून नवरा बाहेर गेला. संतापानं लाही लाही झाली. सणसण डोकं दुखायला लागलं.कामं बाजूला ठेवून बसून राहिले.डोकं शांत झाल्यावर ताईला फोन केला “आहेस का घरी”
“हो.आहे की”
“दहा मिनिटात येते”
“काही विशेष”
“सहजच”आवरून ताईच्या घरी गेले.चहासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या असताना एकदम ताईनं विचारलं “सगळं काही ठिक ना.”
“हो,असं का विचारतेस”
“बोलतेस वेगळे पण चेहरा निराळचं सांगतोय अन डोळे तर..”
“काही नाही.यांच्याशी वाद झाला”
“संसारात असल्या गोष्टी चालयच्याच”
“तसं नाही गं.आजकाल आम्ही बोलतो कमी आणि भांडतो जास्त.मग त्यासाठी कोणतही निमित्त पुरतं.रोजच कटकट.कुठंतरी निघून जावंसं वाटतं पण जायला जागा नाहीये.”
“लग्नाची पंचवीशी उलटल्यावर हे असं होतच”ताईनं अनुभवाचे बोल सांगितले.
“हो,पण सहन करायला पण काही मर्यादा असते.किती अडजेस्ट केलं,मन मारलं ते माझं मलाच माहिती.”
“हे सगळं तुझ्याच संसारासाठी केलं ना’
“पण संसार माझ्या एकटीचा नाहीये.”
“पण तुझा नवरा तर चांगलायं ना”
“जगासाठी.खरं काय ते मला विचार.फक्त पैसे कमावले म्हणजे झालं का?घरात बाकीच्याही जबाबदाऱ्या असतात.दुखणी-खुपणी असतात ते सगळं मीच बघते.”
“म्हणजे नवरा बिनकामाचा आहे.”ताईनं हसत हसत विचारलं.
“अगदीच तसं नाही.चांगलं वागत नसले तरी वाईटही वागत नाही फक्त नीट बोलत नाही.इतरांशी किवा फोनवर मात्र गुलूगुलू बोलतात.त्याचाच जास्त राग येतो.”
“असं का वागता म्हणून विचारलं नाही का?”
“तुला काय वाटतं.विचारलं नसेल.दहादा विचारलं पण उत्तर दिलं नाही उलट मीच खूप चिडकी आणि विसराळू झालीय असं म्हणाले.नाही नाही ते सुनावलं मग मी पण आख्ख खानदान खाली आणलं.”
“एवढं करून काय मिळवलं”ताई.
“मनस्ताप,चिडचिड आणि अबोला,घरातली शांतता घालवली.”
“सगळं कळतय ना मग वाद का घालतेस”
“मुद्दाम करत नाही.चाळीशी नंतरच्या बदलांचा परिणाम होणारच ना.अशावेळी हक्काच्या माणसानं समजून घेतलं पाहिजे ना पण यांना काही कळतच नाही.सतत आपलं ‘तू बदललीस, बदललीस’ हा धोशा चालू.मुलीसुद्धा वडिलांची री ओढतात.कोणाला माझी किंमतच नाही.”एकदम भरून आलं अन ओक्साबोक्सी रडायला लागले. ताई पाठीवरून हात फिरवत होती.मायेच्या,वडीलकीच्या स्पर्शनं जास्तच रडायला आलं.
“शांत हो,”
“आजकाल मूड सारखे बदलतात.सारखी चिडचिड होतेय हे मला समजतं.त्यामुळं वाद,कुरबुरी होतात हे मान्ययं. बाईच्या आयुष्यात ही फेज येतेच.सांभाळून घ्यावं एवढी साधी अपेक्षा पूर्ण होत नाही. गेल्या काही वर्षांपासून आमचं अजिबात पटत नाहीये.धड बोलणं तर दूरच पण सारखी भाडणं नाहीतर अबोला.खूप वैताग आलाय.एकमेकांची तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही पण नाईलाज.”
“तुला असं का वाटते की भाऊजीनी समजून घेतलं नसेल”ताई.
“१०० टक्के खात्री आहे.”
“शांतपणे विचार केला तर अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील.”ताई बोलण्यानं विचारचक्र सुरू झालं.एकेक गोष्टी आठवल्या.नवरा घर कामात करत असलेली मदत,अनेकदा क्षुल्लक कारणावरून मी चिडले तरी त्यांचं शांत राहणं.चूक नसताना माघार घेऊन टाळलेले वाद अशा अनेक गोष्टी आठवल्यावर रागाची धार बोथट झाली.
“नवरा अगदीच वाईट नाहीयं” सहजच बोलून गेले.
“चला,तुझं तुलाच समजलं यातच सगळं आलं.”
“आता निघते.त्यांच्या आवडीची कांद्याचं थालपीठ करते.खूष होतील.”
“काळजी घे ”
“येस,नक्की,काळजी घेईन ”
“मी भाऊजींविषयी बोलतेय.”
“म्हणजे”
“बायकांच्या आयुष्यात जसे हार्मोन्समुळे वागण्या-बोलण्यात बदल होतात.मूड स्विंग होतात. इमोशनल उलथापालथ होते.चाळीशीनंतर पुरुषांच्या आयुष्यात देखील तशाच घडामोडी होतात.मिडलाईफ क्रायसिस.मन सैरभैर होतं.अस्वस्थता वाढते. शारीरिक तक्रारी सुरू होतात.पुरुषांनाही त्रास होतो. फरक एवढाच की आपण बायका निदान बोलतो तरी ….पण पुरुष यावर व्यक्तच होत नाहीत.एकदम गप्प राहतात नाहीतर चिडचिड करतात.अनेकांना तर होणारा बदल समजतच नाही तर बरेचजण स्वीकारत नाही.”
“फक्त स्वतःला कुरवाळत बसले.त्यांच्या बाजूनं कधी विचारच केला नाही..”
“जगण्याचा मार्ग बदलणाऱ्या ‘नव्या वळणावर’ एकमेकांना सांभाळलं ना मग पुढचा प्रवास सोप्पा होतो.”ताईनं जगण्याचं मर्म सोप्या शब्दात सांगितलं. इतक्यात नवरोबांचा फोन “हे बघ,टोमॅटो घेतलेत आता बटाटे किती घ्यायचेत” त्यांचं बोलणं ऐकून मला हसायला आलं.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈