श्री मेघ:श्याम सोनावणे
इंद्रधनुष्य
☆ मदतीचा हात… लेखक : श्री रियाज तांबोळी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
नाव : सातप्पा लक्ष्मण पाटील. राहणार : मु. पो. जित्ती, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर… हे शेतकरी आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत… त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झालं…. घर मंजूर झाल्यानंतर स्वतःच्या घरात आनंदाने राहण्याचं स्वप्न हे कुटुंब बघू लागलं…. पण कशाचं काय!!! नियतीने काही वेगळाच डाव मांडला होता…
जसं प्रत्येक शेतकरी उद्याच्या आशेवर त्याच्या आजच्या गरजा तेवत ठेवतो तसंच उद्या स्वतःच्या घरात आपल्याला राहायला मिळणार या दृढ विश्वासावर हे आज बांधकाम करत होते….. बांधकामासाठी त्यांनी सिमेंट मागवलं होतं… सिमेंट उतरवून चालक गाडी मागे घेत असताना रात्रीच्या अंधारात लक्षात न आल्यामुळे त्या गाडीचे चाक सातप्पा यांच्या पायावरून गेले…. सिमेंटची ट्रॉली किती जड असते हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही.. या अपघातात त्यांचा पाय तुटला आहे…
हातावर पोट असलेल्या या कुटुंबाकडे जमापुंजी असण्याचा विषयच नाही… त्यांचे काही हितचिंतक मित्र एकत्र येऊन त्यांनी सातप्पांचे ऑपरेशन करून घेतले आहे…. ऑपरेशनचाच खर्च दीड लाखांच्या घरात गेला असून पुढील 6 ते 8 आठवडे यांचा पाय सडू नये किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली अति दक्षता विभागात ठेवावे लागणार आहे. त्यासाठी व अन्य काही उपचारांसाठी अजूनही बराच खर्च येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली असून त्याबद्दलचा तपशील मी आपल्यासमोर सादर करेनच…. तर घराचे सुखासीन स्वप्न बघणारे सातप्पा आज रुग्णालयात दुखण्याशी झुंज देत आहेत…. आपण त्यांचं दुखणं वाटून घेऊ शकत नाही पण दुःख मात्र नक्की वाटून घेऊ शकतो. चला तर मग या शेतकरी कुटुंबाचे दुःख वाटून घेऊयात… प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात देऊयात. त्यांचे स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न न मावळता त्यांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी सहकार्य करून त्यांच्यात नवी उमेद भरूयात…
जर कोणाला रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घ्यायची असेल तर पुढील पत्त्यावर आपण भेट देऊ शकता… ते सोलापूर येथील मार्केट यार्ड जवळच्या यशोधरा रुग्णालयात दाखल आहेत… ज्या दात्यांना संपर्क साधून चौकशी व सहकार्य करायचे आहे त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक आणि गुगल पे, फोन पे क्रमांक पुढे देतो आहे…. फोन पे क्रमांक सातप्पा पाटील यांचे चिरंजीव समर्थ सातप्पा पाटील. 9325306202
गुगल पे क्रमांक सातप्पा पाटील यांच्या सुविद्य पत्नी वैशाली सातप्पा पाटील. 8446183318 यापैकी आपण कोणाशीही संपर्क साधून माहिती मिळवू शकता व सहकार्य करू शकता….
थोडं मनातलं…. ही घटना घडल्यानंतर माझ्या बऱ्याच मार्गदर्शक स्नेहींनी त्यांना भेट दिली. ते जेव्हा तिथली परिस्थिती कथन करत होते तेव्हा प्रचंड वाईट आणि हळहळ वाटत होती…. आम्ही सगळे मित्र मिळून आपण सहकार्य करायचं तर कसं आणि किती याबाबतीत विचार करत होतो. तेव्हा मनात एक कल्पना आली… आपल्यातले अनेक जण बाहेर चहा पितो किंवा नाश्ता करतो. एखाद्या दिवसाचा चहा नाष्टा वगळून, वगळून म्हणण्यापेक्षा त्यागून जर ती रक्कम मदत म्हणून यांना पाठवली तर थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती सार्थ ठरेल व पाटील कुटुंबीयांवर ओढवलेले हे संकट दूर होईल… आम्ही मित्रमंडळी तर असे करतो आहोत, जर ही कल्पना आपल्याला आवडली असेल तर आपणही असं करू शकता…. किंवा आपल्या परीने वेगळी पद्धत अवलंबून खारीचा वाटा उचलू शकता…. हा लेखन प्रपंच करण्यामागचा एकमेव हेतू हाच आहे….
सातप्पा पाटील यांना आपल्या मदतीने रुग्णालयातून बाहेर काढूयात आणि त्यांच्या स्वप्नातल्या हक्काच्या घरात आनंदाने राहायला सहकार्य करूयात…
बदल फक्त चेहऱ्यावरील एका छटेचा आहे… आज ही संकटग्रस्त परिस्थिती आ वासून उभी असताना उमटलेली दुःखद छटा व उद्या आपल्या सर्वांच्या मदतीने पाटील कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटणारी प्रसन्नतेची छटा.
मी शेवटी सर्वांना अगदी कळकळीची नम्र विनंती करतो की, आपण प्रत्येक जण शक्य तितका हातभार लावून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवूयात. वाचक हो हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवूयात आणि यांना योग्य तितकी मदत मिळवून देऊयात….
लेखक – श्री रियाज तांबोळी
सोलापूर मो 7775084363
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈