☆ उद्या पालकांना घेऊन ये…☆ श्री मयुरेश देशपांडे ☆
उद्या बाहेरगावी जायची त्याची लगबग त्याच्या आत्ताच्या घाईत स्पष्ट जाणवत होती. जेवणं लवकर उरकली, माझा बिछाना लवकर घातला आणि आपल्या खोलीकडे लवकर गेला. दाराच्या फटीतून बाहेर येणारा प्रकाश अद्याप तो जागा असल्याचे सांगत होता, उद्या प्रवासात न्यायचे सामान भरत असेल बहुधा. पूर्वी हे सामान त्याच्यासाठी दुसर कोणी भरत होतं. त्यामुळे लक्षात ठेवून सगळे सामान, रोजची औषधे आणि हो ज्या कामासाठी जायचे आहे त्या संदर्भातील कागदपत्रे असे खूप काही. मला त्याला उद्याबद्दल सांगायचं होतं, विचारायचं होतं, थांबवायचं होतं, पण तो आज माझ्याशी नीट बोललाच नाही, आज त्याने मला काही विचारलेही नाही.
मला माझ्या वर्गशिक्षकांनी उद्या पालकांना घेऊन ये, असे सांगितले होते आणि नेमके तेच मला त्याला सांगायचे होते. पालकांमध्ये आई आणि बाबा दोघे आले ना? पण माझी आई कुठे आहे? कुठे आहे म्हणजे खरेच कुठे आहे मला माहित नाही. रडायला लागले की चित्रपटातला बाबा सांगतो, तसा माझा बाबा मला आकाशातला एखादा तारा दाखवतो आणि माझ्या आईचा पत्ता सांगतो. शाळेतल्या बाईंना पण तो हेच सांगेल काय? हो, पण त्यासाठी आधी तो शाळेत तर आला पाहिजे, तो तर उद्या बाहेरगावी चालला आहे, निदान त्याची धावपळ तरी हेच सांगतीये. आता काय करायचे?
वर्गशिक्षिकांनी “पालकांना घेऊन या”, असे नक्की का सांगितले असावे? प्रश्नांचे जाळे शाळेतून निघाल्यापासून मला गुंत्यात अडकवत होते. अगदी रात्री बिछान्यात अंग टाकल्यावरसुद्धा. म्हणजे एरवी बाबाने अंगावर दुलई घातली की अंगाई गीताची गरज नाही की काऊ माऊच्या गोष्टीची गरज नाही. पण आज तसे झाले नाही. बाबाने त्याच्या खोलीत जावे म्हणून मी काहीवेळ डोळे मिटलेही, पण त्याने दार ओढून घेताच ते उघडलेही. आता तो त्याच्या आणि मी माझ्या खोलीत जागे होतो. समजा उद्या बाबा शाळेत आलाच, तर बाई त्याला काय सांगतील? तुमची मुलगी खिडकीतून बाहेर बघत असते, वर आकाशात कोणाला तरी शोधत असते, अभ्यासात ठीक आहे पण वर्गात अजिबात लक्ष नसते, आताशी मित्र मैत्रिणींपासूनही लांब राहु लागली आहे वगैरे सगळे तर नाही ना सांगणार? आणि हे ऐकून बाबाला काय वाटेल? तो खरेच माझ्यासाठी खूप काही करत आहे. अगदी त्याचा व्याप पूर्वी इतकाच सांभाळत. मग त्याला अपयशी तर वाटले तर? तो माझ्यावर रागावला तर? नाही नाही मी यातले काहीच होऊन देणार नाही. उद्या सकाळीच वर्गशिक्षिकांना जाऊन भेटीन, त्यांची माफी मागेन आणि त्यांना हवे तसे वागण्याचे आश्वासन देईन. फक्त माझ्या पालकांना, म्हणजे फक्त माझ्या बाबाला शाळेत बोलवू नका. आता मात्र विचारांनी थकलेले माझे डोके कधी शांत झोपेत गेले कळालेच नाही.
सकाळी बाबा लवकर उठला असावा बहुधा. आज त्याला बाहेरगावी जायचे असावे. मग आजी तरी इकडे येईल किंवा मला तरी आजीकडे पाठवेल, म्हणजे धम्मालच धम्माल. इतक्यात कालची शाळा आठवली, बाईंचे पालकांना बोलावणे आठवले. बाबाला सांगू का? तो बिचारा बाहेरगावी चालला आहे. सगळेच रद्द करावे लागेल त्याला. नको कालरात्री ठरवल्याप्रमाणे मीच जाऊन भेटीन बाईंना.
एखाद्या शहाण्या मुलीसारखे माझे सगळे आवरूनच मी खोली बाहेर आले. दिवाणखान्यात शाळेचे दप्तर ठेवले. स्वयंपाकघरात जाऊन बाबाला काही मदत हवी आहे का विचारले. “अरे वा! आज माझे पिल्लू स्वतःहून उठले आणि तुझे आवरूनही झाले.”, बाबा खूप खूश झाला. मग मी पटकन दुध प्यायले, दोघांनी नाष्टा उरकला आणि शाळेत खेळांची तयारी आहे असे सांगून मी सायकल काढत लवकर घरातून बाहेर पडले. शाळा सुरू व्हायच्या आधी वर्गशिक्षिकांना भेटायचे होते.
मी सायकल घाईने दामटत शाळेत पोहचले. सायकल लावली आणि समोरच्याच झाडाखाली जाऊन बसले. बाईंशी बोलायची हिंमत होत नव्हती. काय आणि कसे बोलायचे याची वाक्ये मनात जुळवत होते, पुन्हा पुन्हा उजळणी करत होते. मी हे सगळे बोलल्यावर बाई काय म्हणतील? रागावतील, घरी पाठवतील की प्रेमाने जवळ घेत पाठ थोपटतील.
ते काही नाही जाऊच आत्ता असे म्हणत दप्तर पाठीवर घेत मुख्य इमारतीकडे चालू लागले. बाहेरच प्रवेशद्वाराजवळ बाबाची भली मोठी गाडी दिसली आणि छातीत धडधडायला लागले. बाबा इथे कसा आला, बाबाला हे सगळे कसे कळाले, तो तर बाहेरगावी चालला होता, मग इथे कसा आला, पुन्हा प्रश्नांचा गोंधळ. मी शिक्षकांच्या खोलीकडे वळाले. अर्ध्या वाटेतच बाबा परत येताना भेटला.
“अग वेडे कालच नाही का सांगायचस? यात घाबरण्यासारखे काय? बरे, मी वर्गशिक्षिकांशी बोललो आहे. तू थेट वर्गाकडेच जा आता आणि हो, त्या तुझे खूप सारे कौतुक करत होत्या. तेव्हा मी बाहेर गावावरून येताना तुझ्यासाठी मोठे बक्षिस आणणार आहे.”
मला नक्की काय बोलावे हेच कळत नव्हते. त्याच्या भल्या मोठ्या गाडीत बसताना बाबा मला गाडीपेक्षाही मोठा भासत होता, माझे आभाळजणू. मी वर्गात पोहचून बाकावर दप्तर ठेवले आणि वर्गाबाहेरच वर्गशिक्षिकांची वाट बघत उभे राहिले. त्या आल्या तशी त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि आईजवळ रडावे तसे हमसून हमसून रडायला लागले.
“हं चला आता वर्गात, प्रार्थनेची वेळ झाली आहे”, बाई मात्र हसून इतकेच म्हणाल्या.
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९ https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈