सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ कथा नऊवारी साडीची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
“अगं स्वानंदी आजच आत्याचा फोन आलाय.आपल्याकडे मुक्काम आहे बरं का तिचा “असं म्हणतच मी घरात शिरलो.मला वाटलं आश्चर्याने आणि आनंदाने टाळ्या वाजवील स्वानंदी.
.इतकी तिला माझी आत्या आवडायची.पण बाईसाहेब आपल्याच नादामध्ये होत्या. हातात साडीची घडी आणि डोळ्यातून वहाणाऱ्या अश्रूंच्या सरी.. हुंदका दाबतच त्या नऊवारी साडीवर तिने डोक टेकवलं.मी निरखून बघितलं तर ती माझ्या सासूबाईंसाठी आणलेली नऊवारी साडीची घडी होती.
सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहीला…हो देवयानीच्या आमच्या लेकीच्या लग्नातली गोष्ट. सिमंत पूजन झालं.. मानपान यथोचित, यथास्थित पार पडले. सगळे खुश होते. कुजबूज ऐकायला आली. सकाळी लवकर चा मुहूर्त म्हणून अंथरूणावर अंग टाकणार, एवढ्यात स्वानंदी धावत पळत आली,आणि म्हणाली, “अहो ऐका ना,आत्ताच वर पक्षाकडे चाललेली कुजबूज कानावर आली. युगंधरच्या आजी म्हणे हट्टाला पेटल्या आहेतआणि म्हणताहेत , माझ्या बहिणीचा मानपान कां नाही केला मुलीकडच्यांनी.?आत्ताच्या आत्ता तिला नऊवारी साडी नेसवा.नाहीतर मी चालले घरी.उद्या अक्षता टाकायला पण येणार नाही म्हणावं मी. हंसून मी हीला म्हणालो, ” अग त्यात काय एवढं ? मग दे की आपल्या जवळची एखादी चांगली भारी साडी. पण हे बघ आजींना दुखवायला नको हं!, हो व्याह्यांनी बजावून सांगितल आहे, ‘आमच्या घरात आईचा शब्द प्रमाण असतो. आम्ही सगळे तिला जपतो.शब्दानेही कधी दुखवत नाही. आनंदी म्हणाली, ” अहो हे सगळं मला माहित का नाहीय्ये,अहो पण आपल्याआहेराच्या बॅगेत नऊवारी साडीच नाही. आणि आणू म्हटलं तर ती आणायची कशी ? आणि कुठून? आत्ता रात्रीचे बारा वाजलेत. आणि सकाळी लवकरचा साडेसहाचा मुहूर्त आहे लग्नाचा. आत्ता रात्रीचे बारा वाजलेतआणि सकाळी सातला दुकानं तर उघडी हवीत ना ? ऐन वेळेला नऊवारी कुठून आणायची ? स्वानंदी रडकुंडीला येऊन मला सांगत होती.एक तर हे लग्न युगंधर कडे कुणालाच पसंत नव्हतं, कारण त्यांनी पसंत केलेली मुलगी नाकारून युगन्धरचा आमच्या देवयानी शीच लग्न करण्याचा हट्ट होता.तो मला म्हणाला होता,” बाबा आमच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तुम्ही माझ्या माणसांना सांभाळा. ते म्हणतील तस्स करा प्लीज. पुढचं मी बघतो पण ती वेळ फक्त माझ्यासाठी.. फ़क्तमाझ्या साठी निभाऊन न्या. “आणि मग मीही शब्द दिला होता जावयाला. मनात आलं नऊवारी साडी देणं म्हणजे कित्ती साधी गोष्ट आहे. पण ती आणणं किती अवघड आहे. याची कल्पना मला बायकोने दिल्यावर मी हादरलो. देवयानीचा माझ्या मुलीचा रडवेला चेहरा, स्वानंदीची उलघाल, आणि माझी हतबलता,माझ्या सासूबाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्या म्हणाल्या, ” जावई बापू , स्वानंदी,अगं काय झालंय ? मला सांगाल का ? किती अस्वस्थ आहात तुम्ही! मुलाकडच्यांनी गाडी , स्कूटर, मागितली आहे का ?”..” अगं आई गाडी काय! अगदी विमान मागितल असत तरी कॅश दिली असती आपण.” असं म्हणून आमच्या अर्धागिनीने सारी कथा कथन केली. ती ऐकल्यावर सासूबाई जरा विचारत पडल्या.कारण परिस्थितीच तशी होती बहिणीला नऊवारी नेसवल्याशिवाय आजी मांडवात येणारच नव्हत्या . आणि आजी शिवाय लग्न होणारच नव्हतं.आत्ता यावेळी सगळे दुकानदार दुकानं बंद करून घरी घोरत असतील. आणि थंडीच्या साखर झोपेतून ते लवकर दुकानात येणं म्हणजे अशक्य बाब होती. आता काय करायचं ? युगंधरचा अगदी कळवळून हात जोडून सांगितलेला अगदी केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मागणी साधी होती, पण गहन विचारात टाकणारी होती.सासूबाई लगबगीने उठल्या. आणि उजळत्या चेहऱ्याने परतल्या.त्यांच्या हातात साडीची पिशवी होती. ती स्वानंदीच्या हातात देत त्या म्हणाल्या,” घ्या काखेत कळसा आणि गावाला वळसा,’ स्वानंदी अगं ही नऊवारी साडी दे देवयानीच्या मावस आजे सासूबाईंना. ” माझा चेहरा उजळला. केवढं मोठ्ठ कोडं सोडवलं होतं सासुबाईंनी. पण देवयानीच्या, माझ्या मुलीच्या बोलण्याने मी भानावर आलो. नात आजीला म्हणत होती, “अगं काय हे आजी? अगदी खूप दिवसापासून ची तुझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आईने खास तुझ्यासाठी ही हिरव्या रंगाची साडी मुद्दाम येवल्याहून तयार करून आणलीय.आई सांगत होती, घरची गरिबी, आत्या काकांचं आजी-आजोबांचं व इतर गोतावळ्यांच् करण्यातच तुझं सारं आयुष्य त्या धबड्ग्यातच गेलं म्हणे. आजोबांच्या कमी पगारात तु नेहमी स्वतःच्या मनाला मुरड घालायचीस. सोनं काय साधी भारी साडी पण तुझ्या अंगाला कधी लागली नाही. नंतर आजोबांच् आजारपण, . औषध पाणी, ऑपरेशनचा खर्च. आईने सगळं लक्षात ठेवलय आणि मुद्दाम तुझ्यासाठी नऊवारीचा खास वाण येवल्यावरून आणला आहे.” नातीचा धबधबा थांबवत आजी म्हणाली, देवयानी बाळा खरंय तुझं म्हणणं, राणी तुमच्या भावना कळतात गं मला, पण आता वेळ साजरी करणं महत्वाचं आहे . लग्नात झालेल्या कुरबुरी आयुष्यभर सुनेला ऐकाव्या लागतात आणि तुझ्या सासरच्यांना दुखावून कसे चालेल ?तरीपण देवयानी आपलं घोडं पुढे दामटतच म्हणाली, ” आजी तुमच्याकडे हिरवं घ्यायचं नाही ना म्हणून ही नऊवारी खास कारागिराकडून आणलीय. तुझ्या हौसेला मुरड घालावी लागलेली आम्हांला नाही आवडणार. आयुष्यभर मन मारूनच राहणार आहेस का तू ? ठेव ती साडी बॅगेत. उद्या नेसायचीय ती तुला माझ्या लग्नात. या संभाषणात मी आणि स्वानंदी गोंधळून गेलो होतो.
काय करावं ? काही कळतच नव्हतं. सासूबाईंनी अखेर हीच्या हातात साडी ठेवली आणि म्हणाल्या, “स्वानंदी चल लवकर ओटीची तयारी कर. आपण आत्ताच त्यांना मानाची साडी देऊया.उद्या त्यांना नेसता येईल. आणि चिडलेल्या देवयानीला त्यांनी समजावलं,. “पोरी सासरच्यांवर रागावू नकोस . हीच वेळ आहे भावी संसार सांवरण्याची . आपल्या माणसांची मन जिंकण्याची. मनाचा तळ कधीही गढूळ नाही होऊ द्यायचा. नितळ मनाने केलेला संसारही नितळच होतो.” आणि मग सासूबाई मानाचे पान घेऊन निघाल्या, विहीण बाईंकडे. इतका वेळ आता काय करायचं? हे विचारायला प्रश्नचिन्ह घेऊन दाराआड उभा राहिलेला युगंधर पुढे झाला. स्वानंदी कडे वळून तो म्हणाला,” भाग्यवान आहात तुम्ही. अशा आभाळा एवढ्या स्वच्छ मनाच्या आई तुम्हाला मिळाल्यात.असं म्हणून तो पुढे होऊन आजीच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या पायाशी वाकला.सारे संवाद त्यांनी ऐकले होते.भारावून तो म्हणाला, ” आजी ग्रेट आहात तुम्ही. दोन घरं सलोख्यांनी जोडण्याचं तुमचं कसब अजब आहे. माझ्या माणसांना न दुखवता मला हे लग्न करायचं होतं.
माझ्या भावना जाणल्यात तुम्ही. माझी आजी तशी चांगली आहे हो! पण कुणीतरी कानाशी लागलं असावं म्हणून तिच्या मनांत हे असं आल, आणि तिचं मन भरकटल.
तर मित्र-मैत्रिणींनो इतकं सगळं रामायण सांगण्याचं कारण महाभारत न घडता लग्न खेळीमेळीत पार पडलं. मावस आजी कमालीच्या खुश झाल्या . नऊवारी नेसून हरखल्या आणि आनंदाने बहिणी बहिणी लग्नात मिरवल्या. युगंधर च्या आजी म्हणाल्या, “वय झालं म्हणून काय झालं ? म्हातारपणीही हौस, ही असतेच की.शिवाय व्याह्यांनी मानाने दिलेली साडी मिरवण्यात आनंद असतो. “.माझ्या मनांत आलं,एखाद्याचं आयुष्य मनाला मुरड घालण्यातच सरतं. परिस्थितीमुळे अगदी साध्या गोष्टीही त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. सासूबाईंच्या बाबतीत तेच झालं आणि अजूनही होतंय. पण सासूबाई समाधानी होत्या . घेण्यापेक्षा देण्यातच त्यांना आनंद वाटायचा. तर अशा या गोडव्यात शुभमंगल मंगलमय रितीने पार पडलं. मंडळी खरी कथा आणि व्यथा पुढेच आहे. नंतर आम्ही छान नऊवारी घेण्यासाठी दोन वेळा बाहेर पडलो. पण कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते.कारण पहिल्यावेळी सासुबाई आजारी पडल्या.आणि आणि दुसऱ्या वेळी तर….तर…त्या स्वर्गवासी झाल्या. एखाद्याचं नशीबच असं असतं. कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते ते अगदी खरंय …काळ सरला… पण राहून गेलेल्या दुःखाची बोच स्वानंदीच्या मनात बोचतच राहयली.तिच्या दुःखावर मलमपट्टी करायलाच हवीय नाही का! मी तिला समजावलं “अंथरुणावर पडून वेदनेने त्रासलेल्या सासूबाईची दया येऊन देवाने त्यांचं सोनंचं केलं . हे बघ कुणी कुणाचं दुखणं आणि दुःख नाही वाटून घेऊ शकत. तुमचे मुलांचे सुखाचे संसार बघून तृप्त मनाने त्या गेल्या .दैवगती आहे ही. स्वतःला सांवर.” रडवेली माझी बायको अगतिक होऊन म्हणाली ,”सगळं कळतय हो मला , पण अधिक महिना आलाय. ही साडीची घडी कुणाला देऊ मी ? माझी अपुरी इच्छा आईची ओटी भरायची कशी पुरी होईल हॊ ? स्वानंदीचे डोळे पुन्हा भरून आले.
” अगं त्यात काय ! मी आहे ना.!.मी होईन तुझी आई .” डोळे पुसत स्वानंदी म्हणाली, “कोण ?आत्या ! तुम्ही.?..
तुम्ही..कधी आलात?” , “पोरी अगं सारं बोलणं ऐकलय मी . तुझ्या नवऱ्याने तुझी खंत मला सांगितली.आणि आम्ही एक प्लॅन आखला. अधिक मासात दुर्देवाने आई नसली तर मावशी, जाऊबाई कुठलीही मायेची माय
चालते. आपण नवीन पद्धत पाडू . आज पासून तू माझी मुलगी झालीस .चल ! पूस ते डोळे , उठ पटकन् ! ओटी ची तयारी कर …..पण काही म्हण स्वानंदी , हिरव्या नऊवारीची मला खूप हौस होती हं.लगेच घडी मोडीन मी.
मग काय ! उत्साहाने उठत डोळे पुसत, विजेच्या चपळाईने आमच्या बायकोने ओटी सोहळा पार पाडला.साडीची घडी आत्त्याच्या हातात दिली.
गोऱ्या पान आत्त्या च्या अंगावर हिरवीगार साडी खूपच छान दिसत होती. आणि मग नऊवारीत खुलून दिसणारी आई आणि अपुरे स्वप्न पुर्ण झाल्याच्या तृप्तीने , आईकडे बघणाऱ्या लेकीच्या भारावलेल्या डोळयांत आनंदाश्रू चमकले. वातावरण हंसर व्हायला हव, म्हणून मी म्हणालो,” ऐक नां आत्त्या
ही तुझी लेक नां ? मग मी जावई झालो तुझा. पण मग जांवयाला चांदीच्या ताटात अनारशाच वाण दे ना मलालवकर , “
मला चापट मारून आत्या म्हणाली,”अरे लबाडा ! सरळ सांग ना मला अनारसे आवडतात म्हणून.” आणि मग स्वानंदी पण खुदकन् हंसली.
मित्र मैत्रिणींनो आता यापुढे कितीतरी अधिक मास येतील आणि जातीलही .पण हा अधिक मास आमच्या कायम लक्षात राहील. सण साजरे करायचे ते आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी.मग हा बदल तुम्हाला आवडला तर सांगाल कां मला ?
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈