श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ९ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- निघताना बाबांनी त्यांचे आशिर्वाद म्हणून दिलेला तो छोटासा कागदी फोटो म्हणजे पिवळ्या धमक रंगाचं जरी काठी सोवळं नेसलेलं, हसतमुख, प्रसन्न मुद्रा असलेलं दत्तरूप होतं. आज इतक्यावर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय. आजही त्याचं दर्शन घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडित असणारी माझ्या बाबांची त्या क्षणीची ही आठवणसुद्धा!)
आईबाबांचा निरोप घेऊन मी निघण्यासाठी वळलो. बाहेर पडलो. आई मला निरोप द्यायला दारापर्यंत आली…
“जपून जा. गेल्यावर पोचल्याचं पत्र टाक लगेच. सांभाळ स्वत:ला…” तिचा आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. मी कसंबसं ‘हो’ म्हंटलं.. आणि चालू लागलो. आता क्षणभर जरी रेंगाळलो तरी हे मायेचे पाश तोडून जाणं कठीण जाईल याची मला कल्पना होती.
माझा लहान भाऊ शाळेत गेलेला होता. मोठा भाऊ बँकेत मॅनेजरना सांगून मला बसमधे बसवून द्यायला आला होता.
“कांही अडचण आली, तर माझ्या ब्रँचच्या नंबरवर मला लगेच फोन कर” तो मनापासून म्हणाला. एरवी अतिशय मोजकंच बोलणारा तो. पण त्याचं प्रेम आणि आधार मला त्याच्या कृतीतून जाणवायचा. आम्हा दोघात सव्वा दोन वर्षांचं अंतर. त्यामुळे माझ्या अजाण वयात माझ्याशी माझ्या कलानं खेळणारा माझा हक्काचा जोडीदार तोच. तो पहिलीत गेला तेव्हा हट्ट करून मीही त्याच्या मागे जाऊन वर्गात बसलो होतो.आई रोज त्याचा अभ्यास घ्यायची, तेव्हा त्याच्याबरोबर मीही अभ्यासाला बसायचो. पहिली आणि दुसरी अशी दोन वर्ष मी त्याच्याजवळ रोज वर्गात जाऊन बसत दोन इयत्ता एकदम करुन त्याच्याबरोबर थेट तिसरीतच प्रवेश घेतला होता. पूर्वी हे सगळे अधिकार मुख्याध्यापकांकडे असल्याने माझी वेगळी परीक्षा घेऊन मला थेट तिसरीत प्रवेश मिळाला होता. पुढे पूर्वीच्या एसएससी म्हणजे ११ वी पर्यंत आम्ही दोघेही एकाच वर्गात एकाच बाकावर बसून शिकलो. त्यामुळे आम्ही दोघे सख्खे भाऊ वर्गमित्रही. परिस्थितीवशात हेच त्याच्यावर खूप मोठा अन्याय करणारं ठरलं होतं. तो माझ्यापेक्षा खूप हुशार असूनही माझे नोकरीचे वय नसल्याने मी पुढे शिकू शकलो आणि तो मात्र आम्हा सर्वांसाठी शिक्षण तिथंच थांबवून मिळेल ती नोकरी करीत भटकंती करत राहिला. त्याची सुरुवातीची अशी कांही वर्षें संघर्ष आणि तडजोडीत गेल्यानंतर एस् एस् सी मधल्या चांगल्या मार्कांमुळे त्याला नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळाला होता. तरीही आम्हा सर्वांच्या जबाबदारीमुळे त्याचा त्यावेळचा सुरुवातीचा सगळा पगार घरखर्चासाठीच संपून जायचा. तरीही त्या वयातल्या स्वतःच्या हौसामौजा बाजूला ठेवून तो हे मनापासून करीत राहिला. मला आठवतंय, पगार झाला की तो स्वतःसाठी अगदी मोजके पैसे ठेवून बाकी सगळे आईकडे घरखर्चासाठी द्यायचा. मी इस्लामपूरला रहायला गेल्यानंतरच्या त्याच्या पगाराच्या दिवशी त्याने मला बाजूला बोलवून घेतले आणि स्वतःसाठी ठेवून घेतलेल्या दहा रुपयातले पाच रुपये माझ्या हातावर ठेवले.
“हे काय? मला कशाला? नको” मी म्हणालो.
“असू देत”
“पण का?.. कशासाठी? मला लागलेच तर मी घेईन ना आईकडून. आणि तसेही मी इथे असताना मला कशाला लागणारायत?”
त्याला काय बोलावं सूचेना. त्यानं मला आधार दिल्यासारखं थोपटलं. म्हणाला,
“नाही लागले, तर नको खर्च करूस. तुझे हक्काचे म्हणून वेगळे ठेव. कधीतरी उपयोगी पडतील.”
खरंतर म्हणूनच माझं मुंबईला जायचं ठरलं तेव्हा माझ्या भाडेखर्चाची जुळणी करायचा विषय निघाला तेव्हा त्यानेच दर महिन्याला मला दिलेले ते पैसे खर्च न करता मी साठवलेले होते, ते त्याला दाखवले.
“हे पुरेसे आहेत अरे.वेगळी तजवीज कशाला?”मी म्हंटलं.तो अविश्वासाने बघत राहिला होता..!
त्याचेच पैसे बरोबर घेऊन मी आज मुंबईला निघालो होतो.
त्याचा हात निरोपासाठी हातात घेतला, तेव्हा हे सगळं आठवलं न् माझे डोळे भरून आले.
रात्रभरच्या संपूर्ण बस प्रवासात मी टक्क जागा होतो. न कळत्या वयापासूनच्या या अशा सगळ्या आठवणी मनात गर्दी करत होत्या. रात्र सरेल तसा मनातला हा अंधारही दूर होईल असं वाटलं.’सगळं सुरळीत होईल. काळजी करू नको ‘ घर सोडतानाचे बाबांचे हे शब्द आठवले आणि मनातलं मळभ हळूहळू दूर झालं.
मुंबई मी पूर्वी कधी पाहिलेलीही नव्हती. माझं असं ध्यानीमनी नसताना मु़बईला येणं माझ्या आयुष्यातल्या निर्णायक वळणावर मला घेऊन जाणाराय याची त्याक्षणी मला कल्पना कुठून असायला?पण यानंतर घडणाऱ्या घटनांची पावलं सूत्रबध्दपणे त्याच दिशेने पडत होती हे आज मागे वळून पहाताना मला लख्खपणे जाणवतंय.आणि या जाणिवांमधेच ‘त्या’च्या दत्तरुपातल्या आस्तित्वाच्या दिलासा देणाऱ्या गडद सावल्याही मिसळून गेलेल्या आहेत!
मुंबईतलं सुरुवातीचं माझं वास्तव्य अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडी दादरलाच होतं.त्यामुळे माझं ‘घरपण’ शाबूत होतं!एकच रुखरुख होती ती म्हणजे माझ्या बालवयापासून इतकी वर्षं विनाविघ्न सुरु असलेल्या दत्तसेवेत मात्र खंड पडणार होता. एरवीही ते तसं सगळं इथं शक्यही नव्हतंच.इथं गुरुचरित्राची ती पोथी नव्हती.बाबांना मिळालेल्या प्रसाद पादुका नव्हत्या. ही सगळी हरवलेपणाची भावना मनात घर करू लागली. पहिल्या दिवशी आंघोळ होताच मी तिथल्या देवघरातल्या दत्ताच्या तसबिरीकडे पाहून हात जोडले. अलगद डोळे मिटले. पण मिटल्या डोळ्यांसमोर ती तसबिरीतली दत्तमूर्ती साकार झालीच नाही. अंत:चक्षूंना दिसू लागलं होतं, बाबांनी मला दिलेल्या फोटोतलं पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, लालचुटूक रंगाचं उपकरण घेतलेलं हसतमुख, प्रसन्नमुद्रा असणारं ते दत्तरुप!! त्याच्या नजरेचा स्पर्श होताच मनातली कांहीतरी हरवलेपणाची भावना खालमानेनं निघून गेली!
एक-दोन दिवस असेच गेले. मग एक दिवस रात्री माझी बहीण आणि मेहुणे दोघांनीही मला दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे जाऊन माझं नाव नोंदवून यायला सांगितलं. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस कुठे आहे, तिथे किती नंबरच्या बसने, कोणत्या दिशेला कसे जायचे हे सगळे समजावूनही सांगितलं. मुंबईत कुणीही बरोबर नसताना एकट्यानेच हे सगळे करायचे याचं दडपण होतंच शिवाय मला त्याची काही गरजच वाटत नव्हती. कारण माझी स्टेट बँकेच्या टेस्ट इंटरव्ह्यूमधून नुकतीच निवड झाली होती. फक्त पोस्टिंग व्हायला काही दिवस वाट पहायला लागणार होती. थोडा उशीर झाला तरी अनिश्चितता नव्हती. शिवाय तोपर्यंत एका खाजगी नोकरीच्या बाबतीत मेव्हण्यांनी स्वतःच बोलणीही पक्की करत आणली होती. असं असताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे नाव कशाला नोंदवायचं असंच मला वाटत होतं.
“नाही..नको.आता त्याची काय गरज आहे?” मी म्हणालो.
“हे बघ. आता गरज नाहीय असं वाटलं तरी अचानक गरज उद्भवलीच तर? त्यानंतर नाव नोंदवायचं म्हटलं तर वेळ हातातून निघून गेलेली असेल. आत्ता मोकळा आहेस तर ते काम उरकून टाक.त्यात नुकसान तर कांही नाहीये ना? हवं तर मी रजा घेऊन येतो तुझ्याबरोबर.”मेव्हणे मनापासून म्हणाले. ‘ते माझ्या हिताचंच तर सांगतायत. त्यांना विरोध करून दुखवायचं कशाला?’असा विचार करून मी ‘ एकटा जाऊन नाव नोंदवून यायचं कबूल केलं.
प्रत्येकाला भविष्यात घडणाऱ्या विविध घटना, त्यांचा घटनाक्रम, त्यांचं प्रयोजन..हे सगळं पूर्णत: अज्ञातच तर असतं. पण घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग विनाकारण घडत नसतोच. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच. माझ्या बहिण आणि मेव्हण्यांचं मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं. कारण नंतर पुढे घडणाऱ्या सगळ्याच अनपेक्षित घटना त्या त्या वेळी नकारात्मक परिणाम करणाऱ्या असल्या तरी त्यांतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचं ‘त्या’नेच माझ्यासाठी केलेलं हे नियोजन होतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!
ते सगळंच अघटीत वेळोवेळी मला कडेलोटाच्या काठावर नेऊन उभं करणारं,माझी कसोटी पहाणारं ठरणार तर होतंच आणि माझ्या मनातलं ‘त्या’चं स्थान अधिकाधिक दृढ करणारंही!
क्रमश:.. (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈